भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. कार्तिकेयांना दक्षिण दिशेचे स्वामी मानले जाते.
कार्तिक महिन्यातील पूर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो.बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते. उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात.वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते असे मानले जाते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते हे या पूजेचे विशेष महत्त्व आहे. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहिली जाते परंतु या पूजेचा त्याला अपवाद आहे. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा 'हरिहर' पूजा केली जाते.
त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते.मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात.
दीपोत्सव झाल्यानंतर कार्तिक पौर्णिमेला देशातील काही ठिकाणि देवदिवाळी साजरी केली जाते. तर काही ठिकाणी मार्गशीर्ष प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते. काही ठिकाणी या दिवशी बैलांच्या झुंजी लावण्याची चाल आहे. कार्तिक पौर्णिमेला बनारसमध्ये संपूर्ण नगरीला दिव्यांनी सुशोभित केले जाते. गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते.
दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला देवी-देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी-देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते. या दिवशी लक्ष्मी-नारायण पूजन करणे अतिशय शुभ मानले गेले आहे. शक्य असल्यास सत्यनारायण पूजनही या दिवशी करणे उत्तम मानले गेले आहे. कार्तिक पौर्णिमेला शक्य असेल, त्यांनी आवर्जुन दीपदान करावे, असे सांगितले जाते.
प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्व असते, परंतु कोजागिरी पौर्णिमे प्रमाणेच कार्तिक पौर्णिमेस सुद्धा अतिशय महत्व आहे. असे म्हटले जाते कि सृष्टीच्या निर्माणा पासूनच कार्तिक पौर्णिमेचे मोठे महत्व राहिले आहे. ह्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान पुण्य करण्याचे व श्री सत्यनारायण पूजा करून त्याची कथा श्रवण करणे हे अधिक महत्वाचे आहे. ह्या व्यतिरिक्त भगवान श्री शंकर व माता पार्वती ह्यांच्यासह कार्तिकेय व श्रीगणेश ह्यांचे सुद्धा ह्या दिवशी पूजन करणे आवश्यक आहे. शिव परिवारावर मध व दुधाने अभिषेक केला असता अक्षय फल प्राप्ती होते.
ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पोर्णिमेसह सर्व पौर्णिमेस चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे. माता लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी ह्या दिवशी भगवान श्री विष्णुसह माता लक्ष्मी देवीची पूजा करावी. श्रीसूक्त पठण कराव.
दंतकथा
त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.
तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते. त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की, देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. मात्र, तसे झाले नाही आणि शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी शंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली. जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे, हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.
काही पौराणिक कथांनुसार, श्रीविष्णूंनी यात दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलायापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. अठरा पुराणांमध्ये मत्स्यपुराणाचा समावेश आहे. श्रीविष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला, तो पुढे मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले.
त्रिपुरी पूर्णिमे बद्दलची माहिती काही सोशेल साईट वरून संकलित केली आहे आणि तुमच्या सोबत शेयर केली आहे.

























