संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादश्या येतात. प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात एक व अधिक मास असल्यास त्या दोन एकादश्या जास्त येतात. कार्तिकी एकादशी व आषाढी एकादशीमध्ये आषाढी एकादशीला जास्त महत्व आहे. आषाढी एकादशीस शायनी व कार्तिक शुद्ध एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी (विष्णूशी) लावतात.
पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस.कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पायी पंढरपूर येथे पायी चालत जातात, त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी वारीही केली जाते. वैष्णव संप्रदायात आणि भागवत संप्रदायात या एकादशीला उपवास केला जातो. साधारणपणे सर्वच मराठी माणसे आषाढी आणि कार्तिकी एकादशांना उपवास करतात.
आवळी भोजन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला कुटुंबाची आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल. या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात.
आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते . आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते.
पंढरपूर मंदिर परिसर
या दिवशी लोक उपवास करतात. भजन-कीर्तनात दिवस घालवितात. विठ्ठलाची महापूजा करतात.
क्षीरसागरात शयन करत असलेले श्री विष्णूंना उठवून मंगळ कार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते.
मंदिर आणि घरामध्ये उसांचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांना बोर, आवळ्यासह इतर मोसमी फळांचा नैवेद्य दाखवला जातो.
मंडपात शालिग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा आयोजित केला जातो.
मंडपाची प्रदक्षिणा घालून अविवाहित लोकांच्या विवाहासाठी प्रार्थना केली जाते.
या एकादशीला शालिग्राम, तुळस आणि शंख यांचे पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं.
एकादशीला दिवे प्रज्वलित केले जातात आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात.
दिवशी लवकर उठून नदी किंवा समुद्रावर जाऊन स्नान करावे. आपल्या कुलदैवतांची व विष्णूची पूजा करून तुळशीपत्र वाहवीत.
या एकादशीबद्दल एक कथा आहे -
मृदुमान्य राक्षसाने भगवान शंकरांची भक्तिपूर्वक आराधना केली. त्याचा भक्तिभाव पाहून भोलानाथ शंकर प्रसिद्ध झाले. त्यांनी मृदुमान्य राक्षसाला वर दिला कि, "तू कोणाकडूनही मारणार नाहीस. पण एका स्त्रीच्या हातून मारशील." असा वर मिळताच या राक्षसाचा मृदू पण नष्ट झाला. त्याने प्रथम देवांचा पराभव केला. परंतु शंकरानेच त्याला वर दिल्यामुळे कोणाचेच काहीच चालले नाही. सर्व देव व भगवान शंकर एका गुहेत लपले. त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिचे नाव एकादशी होते. तिने मृदुमान्याला ठार मारले. तेव्हा भरपूर पाऊस कोसळला. त्यामुळे देवांची अंघोळ झाली व भुयारात लपून बसल्यामुळे उपवासही झालाच. त्या दिवशीच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरु झाली. या दिवशी लवकर उठून नदी किंवा समुद्रावर जाऊन स्नान करावे. आपल्या कुलदैवतांची व विष्णूची पूजा करून तुळशीपत्र वाहवीत.
पंढरपूर – हे श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे. पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुन पण प्रसिध्द आहे. सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ७२ कि.मी. अंतरावर वसले आहे. पंढरपूर रेल्वे स्थानक मिरज-कुर्डूवाडी-लातूर ह्या रेल्वे मार्गावर आहे.
श्री विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराचे ई स ११९५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आले. शहरात इतर हिंदू देवतांचे मंदिरे व अनेक संतांचे मठ (धर्मशाळा) आहेत. पंढरपूर शहर चंद्रभागा (भीमा) नदीच्या काठावर वसले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी व्यतिरिक्त पंढरपुरात १२ महिने नेहमीच महाराष्ट्रातील व लगतच्या राज्यातून असंख्य संख्येने भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. आषाढी व कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या निघून वाखरी येथे जमतात.
विठ्ठल मंदिरात काकडा आरती, महापूजा, महानैविध्य, पोशाख, धुपारती, पाद्यपूजा, शेजारती इत्यादी विविध नित्योपचार केले जातात. मुख्य मंदिरात नामदेव पायरी दरवाजातून प्रदेश करून पश्चिम दरवाजातून मंदिरातून बाहेर पडताना खालील देव देवतांचे दर्शन होते.
!!बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!!
!!श्री ज्ञानदेव तुकाराम!!
!!बोला पंढरीनाथ महाराज कि जय!!

