गणपती बाप्पा मोरया

 



गणपती बाप्पा मोरया !!!!!

श्रावण संपून भाद्रपद सुरू झाला की वेध लागतात ते गजाननाच्या आगमनाचे. हे गौरी-गणपती चे दहा दिवस अतिशय प्रसन्नतेने आणि उत्साहाने साजरे केले जातात. प्रत्येक जण आपापल्या घरी जशी परंपरा असेल तशीच देवाची पूजा आराधना करत असतात. या बद्दलची माहिती आणि अनुभव शेयर करण्याचं धाडस करणार आहे. 

गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।

गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ।

गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।

एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।

गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥ 

गणपती... 

आपलं सगळ्याचे आराध्यदैवत प्रत्येक गोष्टीचा श्रीगणेशा केल्या शिवाय आपण पुढे जात नाही. श्रीगणेशाय नमः या ओळीं शिवाय कोणतेही स्तोत्र किंवा श्लोक सुरू होत नाही. असे हे आपल्या सगळ्यांचे लाडके दैवत "श्रीगणेश" माझी स्वतःची आणि बाप्पांची ओळख अगदी जन्मा पासूनची; आमच्या काकांकडे गणपतीला जायचे म्हणजे मोठी जंगी तयारी असायची. मला आठवत ते वय वर्ष जेमतेम ६-७ असेल जेव्हा आम्ही सांताक्रूझला सगळे एकत्र येऊन गणपतीची पूजा, आरती करायचो; गणपती अथर्वशीर्ष ऐकून पाठ झालेलं. आरती नंतरची मंत्रपुष्पांजली ही तशीच ऐकून ऐकून पाठ झालेली. सगळे घरातलेच मिळून आम्ही २५-३० जण नक्कीच असू...आम्हा बच्चेकंपनीची मजा असायची. पानात वाढलेलं सगळं कोण संपवतो याकडे लक्ष असायचे..गप्पा आणि हशा जोरदार असायचा...त्यात आज चन्द्र पहायचा नाही हेही ठरवलेलं असायचं पण नेमकं वर लक्ष वेधले जायचे आणि चांदोबा पहिला की मनात धास्ती असायची आता आपल्यावर चोरीचा आळ येणार की काय??😢 अशी खूप गम्मत असायची अन खूप आनंदात दिवस साजरा व्हायचा. 

त्या नंतर आठवतो तो आमच्या बिल्डिंग मधला पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव. त्यातही आरती, प्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यायचे. हे दिवस अतिशय उत्साहाने साजरे केले जायचे. आधी ची तयारी, डेकोरेशन, नेवैद्य कोण कधी दाखवणार यावर चर्चा वजा थोडी चुरस असायची. रोज पूजा कोण करणार हे ठरायचे. एक दिवस सत्यनारायण पूजा असायची त्या दिवशी नवीन लग्न झालेले जोडपे पूजेला बसणार असे ठरायचे..गणपती आणताना आणि विसर्जन करताना बेंजो अरेंज करणे. या पाच दिवसात आम्ही घरी कमी आणि गणपतीच्या अवती भोवती जास्त असायचो. 

त्यानंतर आमचा देवळेकरांचा गणपती...आमच्याकडे ७ दिवसांचा गणपती असायचा म्हणजे गौरी सोबत विसर्जन करायचे. एखाद्याकडे गणपतीच्या दर्शनासाठी जाणे आणि आपल्याच घरी गणपती बसवणे यात जो फरक असतो तो मला लग्नानंतर च कळला. घरातील आवरआटोप, धान्य भरणे, नवीन पडदे, चादरी, सोफा कव्हर, इतर लहानसहन गोष्टी; ही सर्व तयारी सुरू व्हायची. पाहुण्यांना चिवडा-लाडू, सरबत अन प्रसादासाठी मिक्स ड्रायफ्रूटस. रोजच्या नेवेद्याची तयारी आणि त्याप्रमाणे भाज्या आणि आमटीची तयारी.. बाप्पाच्या पूजेला लागणारे सर्व साहित्य, फुलं, पत्री, कवंडाळ अश्या सगळ्या वस्तूंची आधी लिस्ट तयार करून मग न विसरता त्या मार्केट मधून आणायच्या. या सगळ्यात डेकोरेशनचे कामही असायचेच...पण मनाला एक समाधान आणि आनंद मिळायचा हे सगळं करताना....सासरच्या निधनानंतर आम्ही गणपती चे उद्यापन केले. पण हा दिवस आला की सगळ्या गोष्टी ओघाने आठवतातच...अश्या बाप्पाच्या खूप आठवणी आहेत ...

एक आठवण जी आयुष्य भर चटका लावून गेली ती म्हणजे आजच्याच तिथीला माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली...पण मन उदास होत नाही कारण बाप्पाने त्यांना यातनातुन मुक्त केले ही भावना आहे. त्यांची पोकळी निर्माण झाली आहे पण आठवणी अमाप आहेत अन त्यांनी दिलेल्या शिकवणी संस्कार साथीला आहेतच. असो माझ्या आठवणी आणि त्यांची उजळणी आता या दहा दिवसात होईलच. आजचा भाग संपवतांना ल. म. जोशी आजोबांच्या साधना ते साक्षात्कार या पुस्तकातील एक पद आठवते ते असे 

मोरया काय करू ते सांग

अजूनही माझी बुद्धी वळे ना 

घेण्या तुझे नाव 

मोरया काय  करू ते सांग 


काही करावे मनी ठरविता 

सांगितल्या मार्गाने जाता 

आळस, निद्रा देहग्रासती 

मन बनले नादान 

मोरया काय करू ते सांग

अजूनही माझी बुद्धी वळे ना 

घेण्या तुझे नाव 

मोरया काय  करू ते सांग 


विकल्प नाना काहुर करती 

क्षुल्लक कामे वेळची खाती 

चहूंबाजुंनी हल्ला होई 

कसली पूजा ध्यान 

मोरया काय करू ते सांग

अजूनही माझी बुद्धी वळे ना 

घेण्या तुझे नाव 

मोरया काय  करू ते सांग 


अहंकार मज अजुनी फुगवितो 

काम, क्रोध, लोभा मी भुलतो 

प्रगती सांगसी परी दिसेना 

शोभे ठोंम्ब्या छान 

मोरया काय करू ते सांग

अजूनही माझी बुद्धी वळे ना 

घेण्या तुझे नाव 

मोरया काय  करू ते सांग 


प्रमुख वेळी सेवा चुकते 

करण्या हवे ते हटकून राहते 

सांगसी तरीही हातून न घडते 

नसते त्याचे भान 

मोरया काय करू ते सांग

अजूनही माझी बुद्धी वळे ना 

घेण्या तुझे नाव 

मोरया काय  करू ते सांग 


नित्यकर्मा वेळ न राही 

खळगी भरण्या आयु जाई 

नाम घ्यावंया फुरसत नाही 

हे थांबे कधी सांग

मोरया काय करू ते सांग

अजूनही माझी बुद्धी वळे ना 

घेण्या तुझे नाव 

मोरया काय  करू ते सांग 


गुरू परमगुरू मार्ग दाविती 

ज्ञान देऊनी प्रचिती देती 

आळश्यावरूनी गंगा जाई 

धिक माझे अज्ञान 

मोरया काय करू ते सांग

अजूनही माझी बुद्धी वळे ना 

घेण्या तुझे नाव 

मोरया काय  करू ते सांग 


मुखी नाम तव सदा असावे 

नयनी गॉड रूप भरूनी रहावे 

चित्ती पाय तव पूर्ण ठसावे 

हेचि करी मम काम 

मोरया काय करू ते सांग

अजूनही माझी बुद्धी वळे ना 

घेण्या तुझे नाव 

मोरया काय  करू ते सांग

पुढील आठवनींचा संच उद्याच्या भागात 

क्रमशः


8 comments:

  1. छान आठवणी
    सुप्रिया

    ReplyDelete
  2. सुखद आठवणी.
    वडिलांची आठवण येताच उमाळा येणारच.

    ReplyDelete
  3. खरंच खूप ह्रदयस्पर्शी आठवणी आहेत.

    ReplyDelete
  4. सुंदर लिखाण..गणपती बाप्पा मोरया!!

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...