राम मारुती महाराज देवस्थान (कल्याण )
माझ्या वडिलांनी सद्गुरू श्री राममारुती महाराज यांच्या आठवणी त्यांच्या वहीत लिहून ठेवलेल्या होत्या त्याच मी इथे लिहिल्या आहेत.
श्री राममारुती महाराजांचा उत्सव भाद्रपद व. प्रतिपदा ते भाद्रपद व. नवमी असा नऊ दिवस साजरा केला जातो. या नऊ दिवसात भजन, कीर्तन, नामजप, महाप्रसाद असे सर्व आयोजित करण्यात येते.
माझे पणजोबा श्री वामनराव रामचंद्र प्रधान हे पूर्ण गुरुकृपा लाभलेले सतपुरुष होते. त्यांना अनेक सत पुरुषांचा सहवास लाभला होता. त्यापैकी श्री सद्गुरू वाघदेव महाराज आणि श्री सद्गुरू गाडगे महाराज व श्री राममारुती महाराज. पणजोबा आणि श्री सद्गुरू राम मारुती महाराजांची भेट कधी आणि केव्हा झाली हे नमूद केलेले नाही. पण महाराजांनी पणजी आज्जी आणि पणजोबांना एका बंद खोलीत यथासांग पूजे नंतर अनुग्रह दिला होता व तुझ्या घराण्यावर माझी कृपा राहील असे वचनही दिले होते. श्री सद्गुरू राम मारुती महाराज दादर मुक्कामी असलेल्या माझ्या पणजोबांकडे नेहमी येत असत. माझ्या दोन आत्या आजींना त्यांच्या कृपेचा लाभ झाला होता.
महाराज हे बाल ब्रम्हचारी होते. त्यांचे मूळ नाव श्री रामजी देशपांडे आणि श्री शंकर हे पाळण्यातील नाव. मूळ नक्षत्रात त्यांचा जन्म झाला त्यामुळे घरातील मंडळी चिंतेत असत. महाराजांचे वय ५-६ असताना त्यांच्या वडिलांना मोठा आजार झाला होता. महाराजांच्या मामांचे सदगुरू श्री बाल मुकुंद स्वामी यांची मामांवर कृपा होती. एकदा अचानक स्वामी मामांना भेटायला आले तेव्हा राजाराम पंत (श्री सदगुरू राम मारुती महाराजांचे वडील) यांचा आजार व महाराजांचा मूळ नक्षत्रात झालेला जन्म या सर्व गोष्टी सांगितल्या. महाराजांच्या मातोश्री सौ. सीताबाई यांनी श्री राम मारूती महाराजांना स्वामींच्या चरणावर ठेवले; तेव्हा श्री परमगुरू बाल मुकुंद स्वामीं म्हणाले "आता हा आमचा मुलगा आहे; तुम्ही याचा सांभाळ निर्भयपणे करा" आणि श्री राजाराम पंतांना आशिर्वाद देऊन आजार बरा होईल असे अभय दिले. पुढे राजाराम पंतांना आराम पडून ते कामावर रुजू झाले.
श्रीराममारुती महाराज मोठे होताना त्यांच्या वृत्तीत खूपच फरक पडला. त्यांचे खेळ देवाशी निगडित असत, मंदिरात जाणे, कीर्तनाला जाणे, शंकर किंवा राम मंदिरात एकटे जाऊन बसणे. शाळेत जाताना दप्तरात तुकाराम महाराजांची गाथा नेणे. असे जगावेगळे कार्य सुरू झाले व त्याचा प्रत्यय शिक्षकांना येऊ लागला. श्री महाराज आठ वर्षाचे असताना नाशिक जवळील टाकळी येथे समर्थ मठातील गंगाधर महाराज नावाचे सत पुरुष आले होते; त्यांनी महाराजांना जवळ बोलावून त्यांच्या कानात काही सांगितले तेव्हा पासून महाराजांच्या बाल वृत्तीत व बाह्यवर्तनात फरक झाला.
महाराजांचे नाव शंकर असूनही श्री गंगाधर महाराज त्यांना रामजी म्हणून संबोधू लागले. तेव्हा पासून महाराज रामजीच झाले. राजाराम पंतांची बदली पेण ला झाली अन महाराज पेण मुक्कामी आले. तिथे दिवसेंदिवस मंदिरात रहाणे, कथा कीर्तनात रंगुनी जाणे, पालखी समोर लोळणे, उंच उड्या मारणे असे भक्तीचे प्रकार दिसू लागले. एकदा भगवंताच्या चिंतनात असताना महाराजांच्या कानात एक मंजुळ आवाज कानी पडला " मुंबईत श्री बालमुकुंदस्वामी आहेत; त्यांच्याकडे तू जा कृतार्थ होशील" असे ऐकताच महाराजांना गुरू दर्शनाचा ध्यास लागला. ती संधी लवकरच चालून आली. महाराज मामानं सोबत मुंबईत गुरूंच्या भेटीला आले.
आत्म्याचे परमात्म्या सोबत मिलन व्हावे तसे सद्गुरू अन सतशिष्याचे मिलन घडले.
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथेचि जिव्हाळा तेथे बिंबे ।।
शिष्याची आस ही गुरूंना लागलेली असते. श्री सद्गुरू बाल मुकुंद स्वामींनी महाराजांना योगाभ्यासासाठी हिमालयात नेले १०-१२ वर्ष तपसाधना करवुन त्यांनी पूर्ण गुरू कृपेचा प्रसाद दिला व आपल्या कडील सर्व श्री महाराजांना देऊन त्यांना "राममारुती" हे नामभिदान दिले. या नावात "नाम व नामी" हा अतूट सबंध दाखविला आहे. "राममारुती" या नावात "राम" हे नाम आहे आणि "मारुती" हे नामी म्हणजे नाम घेणारा आहे. तसेच देव आणि भक्त असाही अतूट सबंध इथे दिसून येतो. श्रीबालमुकुंद स्वामींनी श्री राम मारुती महाराजांना आपल्या कडील सर्व योग दिक्षा देऊन योगी स्थितीला नेऊन ठेवले; त्यात उपजत भक्तीचा अखंड ठेवा घेऊन आलेल्या श्री राममारुती महाराजांनी अविरत प्रयत्नांनी, साधनेने परमसुख अशी सहजवस्थेतील समाधी स्थिती प्राप्त केली. ते सतत अजपा-जपात श्रीराम नामात रत असत.
श्रीराम नामा बद्दल असे म्हणतात
राम एवं परब्रह्म राम एवं परम तप:।
राम एवं परम तत्व श्रीरामो ब्रह्म तारकम।।
श्रीराम या पदाने परब्रह्म अभिप्रेत आहे. या पासून होणारा प्रणव मोक्षदायी व तत्वमसि रूप आहे.
"र" कार हे तप्तदवाच्य परमेश्वर, "म" कार हे त्व पदवाच्य जीव आणि "आहेस" हा अर्थ ज्या पदाने होतो ते अस्तिपद म्हणजे "अ" होय.
राम या नावात "र" कार हे अग्निबीज आहे. हे मनोमलाच नाश करते.
"अ" कार हे सूर्य बीज आहे हे तम म्हणजे अज्ञानाचा नाश करते.
"म" कार चन्द्र बीज हे त्रिविध ताप हरण करून शीतलता उत्पन्न करते.
रकार वैराग्य हेतू, अकार हा ज्ञान हेतू,व मकार हा भक्ती हेतू
ह्याचमुळे हे राम नाम वैराग्य, ज्ञान व भक्ती प्राप्त करून देते.
रामनामा सोबत आता मारुती या नामा बद्दलही माहिती घेणे क्रमप्राप्त आहेच.
मारुती हे दास्य भक्तीचे सर्वोच्च स्थान होय. ब्रम्हचारी, प्रतापी, बुद्धिवान, ज्ञानी व आदर्श राम भक्त आणि दास म्हणजे "श्रीमारुतीराय". असे म्हणतात की राम- रावण युद्धात विश्रांतीच्या काळातही श्रीमारुतीराय श्रीरामचिंतनरत असत. रोमारोमात श्री राम असलेले श्रेष्ठ भक्त श्री मारुती रायांना श्रीरामानी चिरंजीव पद दिले होते. श्रीमारुतीराय हे रुद्रावतार होते.
अश्या नाम श्रीराम व नामी श्री मारुती राय ह्या दोघांचे नाव धारण करणारे म्हणजे "श्री राममारुती महाराज"
श्रीराम मारूती माऊली करी कृपेची साऊली या भजन नामस्मरणाने महाराजांची कृपा आम्हा भक्तांवर सदैव राहो.
श्री राम मारुती महाराजांना "गोविंद रामा गोपाळ रामा" हे भजन नामस्मरण खूप आवडायचे.
महाराजांच्या उत्सवात नवमीच्या दिवशी म्हणजे प्रयाण काळीच्या दिवशी वातावरण अष्टसात्विक भाव जागृत करून भक्तास शाश्वत-अशाश्वत गोष्टींची जाणीव करून देणारे असते. प्रयाण काळीच्या भजनानंतर समाधीवरील सर्व दिवे मालवतात. गाभाऱ्यात समाधी जवळ निरांजनी लावतात. जितकी वर्ष तितक्या निरंजन लावतात. धूप घालून महाराजांच्या समाधीवर बरोबर सव्वा पाच वाजता राम मारुती माऊली करी कृपेची साऊली ह्या गजरात गुलाल व फुले उधळली जातात. समाधीवर एक ईश्वरीय वातावरण अनुभवयास मिळते. सगळेच या मंत्रमुग्ध वातावरणात तल्लीन होऊन जातात.
प्रयाण काळानंतरची पालखी
या संस्थेचे संस्थापक श्री शिरीष गडकरी काका यांच्या आणि इतर मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक जण महाराजांच्या चरणी आपली सेवा वाहून कृपेचा आशिर्वाद घेत असतात. आमच्या प्रधान घराण्यावर महाराजांच्या कृपेची साऊली अखंड राहो अन त्यांची सेवा आमच्या कडून सदैव होत राहो हीच प्रार्थना.
माझ्या आई-वडिलांना आणि बहिणीला या उत्सवात मंदिरात राहून सेवा अर्पण करण्याची संधी मिळाली. तसेच माझे काका आजोबा-आजी अजूनही हा उत्सव वयोमानानुसार आणि तब्येती नुसार आता जसा जमेल तसा साजरा करतात. आमच्या कडे श्री राम मारुती महाराजांच्या उत्सवात लोणी-साखरेचा नेवैद्य दाखवला जायचा. घरात नऊ दिवस खूप प्रसन्न वातावरण असायचे. महाराजांची आरती आणि भजन नाम स्मरण "गोविंद रामा गोपाळ रामा" हे रोज म्हंटलं जायचे.
राम मारुती महाराजांची आरती
जय देव जय देव श्री राम मारुती राया
ओवाळू आरती तुजला गुरुवर्या (धृ)
कायस्थ प्रभू ज्ञाती घेऊन अवतार राम मारुती नामे सगुणी संचार
ब्रम्हाचर्य व्रत अखंड साचार श्वासोश्वासी राम मंत्र उच्चार (१)
बाल मुकुंद जाता कैवल्य धामी भाषा त्याज्ली वाणी अर्पियली नामी
शिव शिव विठल मारुती जय जय श्रीराम
सहजावस्थी ओमकार उमटे सप्रेम (२)
कीर्तन भजना रंगी प्रेम अनिवार आनंदे डुल्लत देह विसर
हुंकार उड्डाणे घेउनी अपार दासा भास्वीला हा मारुती अवतार (३)
निजदासा दावूनिया नाव भक्ती सार ज्ञानामृत पाजुनिया नेले त्या पार
शांती सुख आनंद जेथे अपार तया स्थानी नेऊन केले त्या स्थिर (४)
भाद्र कृष्ण नवमी अठराशे चाळीस शनिवारी गार्गी निजधामी वास
आरती ओवाळी रेमे हा दास दर्शन देऊनी तया पुरवावी आस (५)
श्री च्या चरित्रा मधून कै. गुप्ते (कुलाबकर) लिखित
"गोविंद रामा गोपाळ रामा"
Shri Sant Ram Maruti Maharaj Samadhi Sanstha Kalyan Ram Maruti road, Ram Maruti Chowk, Kalyan West - 421 301 Tel: 0251-2207002 / 2201112 Email: info@rammarutimaharaj.org URL: www.rammarutimaharaj.org |
| |