मसला मसाल्याचा भाग - ७ काळीमिरी


नमस्कार मित्र हो मी मिरी मी बहुवर्षायू वेल पायपरेसी कुलातील असून माझे शास्त्रीय नाव पायपर नायग्रम आहे. आज मी तुम्हाला माझी माहिती आणि  माझे औषधी गुणधर्म तुम्हाला सांगणार आहे.   

काळी मिरीला मसाल्याचा राजा असे संबोधले जाते. काळी मिरी जगप्रसिद्ध भारतीय मसाल्यांपैकी एक आहे आणि भारतीय आहारात तिचा आवर्जून वापर केला जातो. असे कोणतेही घर आढळणार नाही ज्यांच्या आहारात गरजेनुसर काळी मिरी वापरत नाही. अनेक स्वादिष्ट भाज्या आणि पदार्थ बनवताना जर त्यात काळी मिरी टाकली नाही तर त्या पदार्थाची चव कुठे ना कुठे कमी राहते. आहारशास्त्रानुसार असेही सांगितले जाते की काळी मिरी हि फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे.

भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्‍कृष्‍ट दर्जा असल्‍यामुळे जाग‍तिक काळी मिरीच्‍या ९०टक्‍के निर्यात एकटया भारतातून होते. तसेच भारतात विविध मसाले पिकांपासून मिळणा-या एकुण परकीय चलनापैकी ७० टक्‍के परकीय चलन एकटया काळ्या मिरीपासून मिळते. मिरीला काळे सोने या नावाने ओळखले जाते.

जगात मिऱ्याची लागवड करणाऱ्या देशात भारत, इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील व श्रीलंका हे प्रमुख आहेत. पैकी भारताचा प्रथम क्रमांक आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी इंडोनेशियात मिऱ्याचे सर्वांत जास्त उत्पादन होत असे परंतु युद्धामुळे तेथील मळे उद्‌ध्वस्त होऊन उत्पादन निम्म्याने घटले.

भारतात उत्‍पादन होणा-या एकूण काळी मिरीपैकी ९८ टक्‍के उत्‍पादन एकटया केरळ राज्‍यात होते. त्‍या खालोखाल कर्नाटक व तामिळनाडुचा क्रमांक लागतो. महाराष्‍ट्रातील कोकण विभागात तुरळक मिरी लागवड आढळते. कोकण किनारपटटीतील हवामान या पिकाच्‍या लागवडीस अनुकूल असल्‍याने आणि काळी मिरीच्‍या वेलास आधाराची आवश्‍यकता असल्‍यामुळे सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या नारळ, सुपारीच्या  झाडांवर वेल चढवून मिरी लागवड करता येते. परसा बागेतील आंबा फणस यासारख्‍या कोणत्‍याही झाडावर वेल चढवून मिरी लागवड करता येते. त्‍यामुळे घरातील सांडपाण्‍याचा योग्‍य उपयोगही केला जातो आणि घरातील काळी मिरीची गरज भागवून आपल्‍या काही प्रमाणात बाजारातही काळी मिरी विकता येईल आणि त्‍यातुन आर्थिक फायदासुध्‍दा होईल. नारळ सुपारीच्‍या बागा नसतील परंतु पाण्‍याची सोय असेल अशा ठिकाणी पानमळयाच्‍या धर्तीवर पांगारा लागवड करुन त्‍यावरही स्‍वतंत्रपणे मिरी वेल लावून उत्‍पन्‍न घेता येईल.

घराच्या किंवा कंपाऊंडच्या भिंती खरखरीत असतील तर भिंतीच्या पूर्वेकडील बाजूवर २-२ मीटर अंतरावर एका ओळीत मिरवेलीची लागवड करून वेलींना भिंतीवर सोडता येते. आधाराच्या झाडापासून ३० ते ४० सें. मी. अंतरावर मिरवेलीची लागवड शक्यतोवर जून महिन्याच्या तिस-या आठवडय़ापूर्वी करावी आणि वेलींना काठय़ांचा आधार न चुकता द्यावा. काठीचे एक टोक वेलीच्या बुंध्याजवळ जमिनीत दीड-दोन सेमी खोल घुसवावे व दुसरे टोक बुंध्यावर टेकवून ठेवावे. काठी सरकू नये म्हणून सुतळीने खोडावर घट्ट बांधावी. या काठीवर मिरवेल ज्युटच्या सुतळीने बांधावी. प्लास्टिकची सुतळी वापरू नये. मिरवेल वाढत जाऊन आधाराच्या झाडावर चढेल. त्यावेळी ती आधाराच्या झाडाच्या खोडावर सुतळीने बांधावी.

काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते. साधारणपणे मे- जून महिन्यात मिरीला तुरे येतात आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घड काढणीस तयार होतात. हिरव्या घडातील एक- दोन दाण्यांचा रंग पिवळा अगर नारिंगी होताच घड तोडावेत, नंतर त्या घडातील मिरीचे दाणे हातांनी वेगळे करावेत किंवा तयार केलेल्या जमिनीवर घडांचे ढीग उन्हात वाळवावेत. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी घड तयार झाले तरच वापरतात. हिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्यासाठी दाणे बांबूच्या करंडीत गोळा करावे लागतात  किंवा पातळ फडक्‍यात गुंडाळावे लागतात. त्यानंतर एका स्वतंत्र भांड्यात पाणी उकळत ठेवतात.

पाण्याला उकळी येण्यास सुरवात झाल्यानंतर ती करंडी अगर फडक्‍यात गुंडाळलेली मिरी त्या उकळत्या पाण्यात सुमारे एक मिनीट बुडवून काढतात. अशा रीतीने उकळत्या पाण्यातून बुडवून काढलेली मिरी उन्हामध्ये चटई अगर स्वच्छ फडके अंथरूण त्यावर वाळत ठेवावी लागते. या पद्धतीचे फायदे म्हणजे दाणे दोन ते तीन दिवसांत वाळतात. दाण्यांना आकर्षक काळा रंग येतो. बुरशी लागत नाही. मिरीची प्रत सुधारते. पन्नीयूर- 1 या जातीच्या वेलापासून सरासरी पाच ते सहा किलो हिरवी मिरी मिळते आणि ही मिरी वाळविल्यानंतर दीड ते दोन किलो होते. 



सर्दी, खोकल्याने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी काळी मिरी अतिशय उपयुक्त उपाय ठरते. आयुर्वेदात काळ्या मिरीच्या सेवनाने सर्दी आणि खोकला ठीक होऊ शकतो सेही सांगितले गेले आहे. म्हणून ज्या लोकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या आहे त्यांनी मधासोबत काळ्या मिरीच्या पावडरचे सेवन करावे. 

ती सुवासिक व उत्तेजक म्हणून तसेच तापानंतरचा थकवा, भोवळ येणे व बेशुद्धी येणे यांवर वापरतात. ती तिखट, उष्ण व कृमिनाशक असून कफ, वात, दमा, घशाचे विकार, रक्त पडणारी मूळव्याध, नाकातील दुर्गंधी व रातांधळेपणा यांवर उपयोगी  आहे.

मिरीच्या फळात पायपेरीन, पायपेरिडीन आणि बाष्पनशील तेले आहेत. संशोधनाने असे सिद्ध झाले आहे की, पायपेरीनमुळे शरीरात सेलेनियम, ब-समूह जीवनसत्त्वे, बीटा-कॅरोटीन (पूर्वगामी अ-जीवनसत्त्व) आणि करक्युमीन यांचे शोषण व्हायला मदत होते. 

सध्या कोरोनाचे संकट आपल्यावर कोसळले आहे. कोरोनापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर रोगप्रतिकार शक्ती मजबूत असायला हवी हे आपण ऐकत आलो आहोत. सध्या कोरोना बाधितांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून त्यांना कोरोनामुक्त करण्यासठी हॉस्पिटलमध्ये जो काढा दिला जातो त्यातही काळ्या मिरीचा वापर केलेला असतो. विश्वास बसत नसेल तर तुम्ही पुष्टी करू शकता. कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासठी काळ्या मिरीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. इतरही अनेक आजारांशी लढण्याकरता रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची असते त्यामुळे आवर्जून काळ्या मिरीचा वापर करा. गरम पाण्यात उकळवून सुद्धा तुम्ही त्या पाण्याचे सेवन करू शकता.

कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित करण्याचा गुणधर्म सुद्ध काळ्या मिरीमध्ये आढळतो. हा गुणधर्म हृदय रोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतो. याशिवाय काळ्या मिरीमध्ये असलेली कार्डियोप्रोटेक्टिव एक्टिविटी सुद्धा हृदयाशी निगडीत गंभीर आजारांचा धोका अतिशय कमी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते. काळ्या मिरीचे सेवन करण्यासाठी तुम्ही काळ्या मिरीच्या पावडरला गरम पाण्यात उकळवून मधासह प्या. हृदय रोगाची समस्या असणाऱ्यांनी अवश्य काळ्या मिरीचे सेवन करा.

रक्तातील सारखेचा स्तर नियंत्रित ठेवण्याचा सर्वाधिक फायदा मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी होतो. दरवर्षी मधुमेहामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. मात्र काळ्या मिरीचे जर नियमित रूपाने सेवन केले तर रक्तातील साखर नियंत्रित होते. त्यामुळे मधुमेहाचा धोका सुद्धा कमी होतो. तुमच्या आसपास वा ओळखीचा कोणी मधुमेहाच रुग्ण असेल तर त्याला आवर्जून काळ्या मिरीचा ग गुणधर्म सांगा आणि काळ्या मिरीचे सेवन करण्याचा आवर्जून सल्ला द्या.

कधी कधी आपल्या शरीरात अचानक सूज निर्माण होते आणि हि सूज दूर करण्यात काळी मिरी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. खासकरून ज्या लोकांना अर्थराइटिसची समस्या आहे त्यांनी प्रामुख्याने काळ्या मिरीचे सेवन करायला हवे. यामागचे वैज्ञानिक कारण हे आहे कि काळ्या मिरीमध्ये सुज विरोधी गुणधर्म असतात आणि या कारणामुळे शरीरात होणारी विविध प्रकारची सूज नि विशेषत: श्वसन नलिकेमध्ये अस्थमाच्या कारणामुळे होणारी सूज दूर करण्यात सुद्धा काळी मिरी रामबाण ठरते. 

तर मित्रांनो असामी मसाल्यांचा राजा कसा वाटलो नक्की सांगा आणि उद्या आपण ऐकणार आहोत माहिती दालचिनीची 




1 comment:

  1. मिरी बद्दल खूप छान माहिती दिली आहे.

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...