मामलेदार मिसळ म्हणजेच तहसीलदार कचेरी कँटीनचे सर्वेसर्वा श्री. लक्ष्मण मुरुडेश्वर यांचे आज कोरोना मुळे निधन झाले. ही बातमी व्हाट्सएपच्या ग्रुपवर आली आणि आठवणींचे चक्र गर्रकन फिरून साधारण पस्तीस-चाळीस वर्ष पाठी गेलं.
त्यावेळी मी दहा ते बारा वर्षाची असेंन; बरेचदा आजी-आजोबांसोबत जिल्हापरिषद जवळील सेन्ट्रल बँकेत मी जायची आणि बॅंकेतील कामं उरकली कि त्यानंतर मामलेदारची मिसळ खाण्याचा ठरलेला कार्यक्रम असायचा. ती झणझणीत, ठसकेबाज, लालभडक मिसळ खाताना मला नुसते डोळ्यातून पाणी अन कानातून वाफा यायच्या पण तरीही पाण्याचे ग्लासच्या ग्लास पीत त्या झणझणीत मिसळीवर ताव मारला जायचा. त्यांनतर मिळणारे ताक मात्र आम्ही आवर्जून प्यायचो. या आठवणींची एक लांबलचक दोर तयार झाली ती थांबेच ना; कारण शाळेनंतर अनेकदा तसेच कॉलेजमध्ये असताना कित्येकदा त्यानंतर मित्र-मैत्रिणीच्या सोबत, आई-बाबा सोबत कोणतेही वेळ काळ आणि निमित्त न लागता मामलेदार मिसळीचा आस्वाद मी न मोजता येईल इतके वेळा घेतला आहे आणि अजूनही आमच्याकडे जरी आम्ही घोड्बंदेरला राहायला गेलो असलो तरी ठाण्यात आल्यावर आवर्जून मिसळीचे पार्सल घेऊन जातो.
काही समीकरण अगदी ठरलेली असत्तात तेच ठाणे आणि मामलेदारची मिसळ हे समीकरण अगदीच जुनं आणि ठाण्याची ओळख ठेवणारे आहे. पाहूया मामलेदार मिसळीची माहिती.
लक्ष्मण मुर्डेश्वर हे त्यांच्या वडिलांसह म्हणजे नरसिंह मुर्डेश्वर यांच्यासह मुंबईत आले तेव्हा ते केवळ ४ वर्षांचे होते. ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी उद्योग करावा, या हेतून आजचे तहसीलदार कार्यालय म्हणजेच त्यावेळच्या मामलेदार कचेरीच्या बाहेरची जागा शासनाकडून भाड्याने घेतली आणि तिथे कँटीन सुरू केले होते. मूळचे कर्नाटकचे असलेल्या मुर्डेश्वर यांनी ठाण्यात १९४६ साली तहसील कार्यालयाबाहेर 'मामलेदार मिसळ' सुरू केली होती. मात्र, काही वर्षांनी म्हणजे १९५२ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर आली. तेव्हापासून ते कँटीन चालवत होते. मामलेदार मिसळीला आज ७० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यानंतर आज 'मामलेदार मिसळ' हा एक ब्रँड झाला आहे. मामलेदार मिसळी'ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक ओळख मिळवून देण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. ठाण्यातील खाद्य ते मिष्टान्न विक्रेता संघाचे २७ वर्ष ते खजिनदार होते.
सर्वात तिखट मिसळ अशी या मिसळीची ख्याती आहे. मामलेदार मिसळ तीन प्रकारांमध्ये मिळते. कमी तिखट, मध्यम तिखट आणि खूप तिखट. यातली खूप तिखट मिसळ खाणं हे साध्यासुध्या माणसाचे काम नाही. पट्टीचा तिखट खाणाराच तिथे पाहिजे. ठाणे स्टेशनजवळ असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयावर एका छोट्याश्या कँटिनमध्ये या मिसळीचा प्रवास सुरु झाला. ५० स्क्वेअर फुटांवरुन हे कँटिन ५०० स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त मोठ्या जागेत गेले. मात्र या मिसळीची चव किंचितही बदलली नाही. इथे मिसळ खायला बसल्यावर तुमच्यासमोर पाण्याचे भरपूर ग्लास ठेवले जातात. नवख्या लोकांना एवढे ग्लास का ठेवले जात असतील हा प्रश्न पडतोच. मात्र मिसळीचा पहिला घास खाल्यानंतर कळते की एवढं पाणी का आणले आहे. मामलेदार मिसळ सुरु करणाऱ्या नरसिंह मुर्डेश्वर यांच्या पत्नीने या मिसळीसाठीचा मसाला सर्वात आधी तयार केला होता.आजही त्याच पद्धतीचा मसाला वापरुन ही मिसळ तयार केली जाते. त्यामुळे मिसळीच्या चवीत फरक पडलेला नाही.
सकाळी चार वाजता या मामलेदार केंतीन ची सुरुवात होते. सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत रोज साधारण तीन ते साडेतीन हजार लोकं या मिसळीचा आस्वाद घेतात आणि शनिवार- रविवार तर हा आकडा पाच ते सहा हजारावर जातो. आता मामलेदार मिसळीच्या शाखाही बर्याच ठिकाणी चालू झाल्या आहेत.
झणझणीत लाल रस्सा आणि ताजे मऊशार पाव असा बेत समोर आला की भल्याभल्यांचे जिभेवरील नियंत्रण सुटते आणि तेलाने काठोकाठ, चमचमीत मिसळीचा घास घेतला जातो. या मिसळी सोबत फरसाण दिले जाते जे याच ठिकाणी बनवले जाते. मिसळ फरसाण कांदा लिंबू आणि छोट्या पुडीतील बटाटा भाजी एकत्र केली कि जी स्वादिष्ट मिसळ तयार होते तिची चव कायम जिभेवर रेंगाळत राहतेच.
अनेकदा गडकरी रंगायतन मध्ये नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर मामलेदार मिसळीचा स्वाद घेतलेले मराठी नट आणि ठाण्यातील सभा किंवा मिटींग्स आवरल्यावर मिसळीचा स्वाद घेतलेले राजकारणी मंडळी यांचे अभिप्राय आपण वाचलेच असतील. जो एकदा या मिसळीचीच घेतो तो परत आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र मंडळींना मामलेदारची मिसळ खाऊ घालतोच. या मिसळीची वाटचाल अशीच पुढे चौ राहो आणि आम्हा ठाणेकरांना अभिमानाने कायम सांगता येवो !!!!! चवीने खाणार त्याला मामलेदार मिसळ खायला मिळणार !!!!