संत गाडगेबाबा





 

संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवणी आजोबा नेहमी सांगायचे ते आपल्या घरी येत असत आणि आपली पणजी आजी- आजोबा त्यांना जेवण व पाणी देत. बाबांचे जेवण म्हणजे भाकरी आणि मिरचीचा ठेचा. मथुराआत्या म्हणून आमची एक मोठी आत्या आजी होती. बायाआत्यापेक्षा मोठी. तिचं अक्षर अतिशय सुंदर होतं. गाडगेबाबा दादरच्या घरी यायचे तेव्हा त्यांचे सगळे हिशोब तिला सांगायचे. त्यांचं इतकं मोठं काम, कोणी किती पैसे दिलेत वगैरे सगळे हिशोब त्यांना तोंडपाठ असायचे. तिच्या वळणदार अक्षरात ते वहीत लिहून ठेवायला सांगायचे. ती तरुणवयातच आजारी पडली आणि सिरियस झाल्यावर गाडगेबाबांनी तिला विचारलं होतं, तुझ्याऐवजी मी जाऊ का? तिने नम्रपणे नकार दिला. बाबांनी तिला मांडी दिली. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ती गेली. किती पुण्यवान.  

काही वर्षानपूर्वी संत गाडगेबाबांच्या आठवणींवर एक पुस्तक लिहिण्यात आले होते त्त्याचे नाव आहे निर्मोही; त्यात माझ्या आजोबांनी बाबां बद्दलच्या काही आठवणी तिथे नमूद केल्या आहेत. त्याची एक प्रत माझ्या काकांकडे आहे.मला आठवतय आमच्याकडे तेव्हा रेकोर्ड प्लेयर होता त्यावेळी गाडगेबाबांच्या अभंगांची एक रेकोर्ड आजोबा नेहमी लावायचे.

खूप जुन्या काळातील आठवणी आहेत. आजोबांनी त्यांच्या आठवणी लिहिल्या देखील होत्या पण आता काळाच्या ओघात कुठेतरी विरून गेली ती पानं, गाडगेबाबां इतके मोठे व्यक्ती आमच्याकडे येत होते. आमच्या घराण्याशी चांगले संबंध होते आणि आपल्या घराला अशा थोर संतांचे पाय लागणे हिच मोठी भाग्याची गोष्ट आहे.

संत गाडगे बाबांच्या बद्दलची संकलित केलेली माहिती मी तुच्या सोबत शेयर करू इच्छिते.

  गाडगेबाबा यांचं जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील शेणगाव हे आहे.ते परीट समाजातले होते.त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी तर आईचं सखुबाई होते.गाडगेबाबा हे अलीकडच्या काळातील हे संत आहेत,त्यांनी समाजातील दारिद्र्य नि जातिभेदांमुळं निर्माण होणारी विषमता, त्याचप्रमाणं देवभोळेपणा याच्यावर आपल्या कीर्तनातून वार केले.देव दगडात नसून माणसात असतो,यासाठीच माणूस घडविणं, हेच आपलं ब्रीद असायला हवं, त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं, असे त्यांचे परखड मत होते.

मुळचे नाव:डेबुजी झिंगराजी जानोरकर

जन्मठिकाण:शेणगाव(जिल्हा अमरावती) फेब्रुवारी २३,१८७६

निर्वाण: डिसेंबर २०,१९५६,वलगाव (जिल्हा अमरावती)

           लहानपणापासूनच गाडगेबाबाना 'डेबू' किंवा 'डेबूजी' म्हणत,घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे ते मामाची गुरं सांभाळत तसेच शेतीची कष्टाची कामे करत.यामुळे त्यांना शेतकर्‍यांच्या काबाडकष्टाची जाणाव झाली.समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्या,सुसंस्कृत,बुद्धिवादी,विवेकनिष्ठ, सुसंस्कारयुक्त समाजाची घडण करावयाची असल्यास,अंधश्रद्धा,कर्मकांड, बुवाबाजी,धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवं असे गाडगे बाबांचे परखड मत होते.त्यासाठी बघ्याची भूमिका न घेता ,त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीस कार्याचा प्रारंभ केला.

'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' हे त्यांचे आवडते भजन होते.

समाजात बदल घडविण्याची ताकत फक्त शिक्षणात आहे.या मताचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला,शाळांसाठी त्यांनी आपल्या जागा दिल्या तसेच जागोजागी गरीबांसाठी धर्मशाळा बांधल्या.

गाडगेबाबा स्वत: तुकड्या तुकड्यांनी शिवलेली गोधडीची वस्त्रं नेसत.ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत.सामान्य माणसाला,मजूरांना,शेतकर्‍यांना धड अंगभर नेसायला मिळत नाहीत,मग आपणही त्यांच्यासारखंच राहायला पाहिजे असे ते म्हणत.नव्या विचारांचं स्वागत नि पूर्वीच्या अनिष्ट प्रथांना त्यांचा विरोध होता.आपले विचार सर्वसामान्य लोकांना कळावेत यासाठी त्यांनी कीर्तन तसेच ग्रामस्वच्छतेचा उपयोग केला.आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणत 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात,तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'.

"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

गाडगेबाबांनी नाशिक,देहू,आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या,गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली,अनेक नद्यांकाठी घाट बांधले,अतिशय गरीब,अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.त्यांचे उपदेशही अगदी साधे,सोपे असत.चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका,देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका,जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.

‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत, 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस' असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा रोवली गेली.


गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ।

सांभाळी ही तुझी लेकरे पुण्य समझती पापाला ॥१॥

ही धोंड्याला म्हणती देवता।

भगत धुंडिती तया जोगता ॥

स्वतःच देती तया योग्यता ।

देव म्हणुनी कुणी न भजावे, फुका शेंदरी दगडाला ॥२॥

कुणी न रहावे खुळी अडाणी

शिक्षण घ्यावे,व्हावे ज्ञानी ॥

यासाठी ही झिजते वाणी।

मी जातीचा धोबी देवा, धुईन कपडा मळलेला ॥३॥

हेच मागणे तुला श्रीहरी

घाम गाळी त्या मिळो भाकरी॥

कुठेच कोणी नको भिकारी।

कुणी कुणाचा नको ऋणकरी, कुणी न विटो नर जन्माला ॥४॥

ग.दि.माडगुळकर


चंपाषष्ठी-येळकोट येळकोट जय मल्हार




मासांना मार्गशीर्षो ऽ हम्’ या वचनाने गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा मागेपुढे मृगशीर्ष नक्षत्र असते. केशव ही त्या महिन्याची अधिदेवता आहे. त्याच महिन्यात वद्यपक्षात धनुर्मासास सुरुवात होते. मकरसंक्रांतीपर्यंत रोज सूर्योदयाबरोबर देवाला आणि सूर्याला गूळपोळी, खिचडी, बाजरीची भाकरी-लोणी असा नैवेद्य दाखवतात व सर्वजण सकाळीच भोजन करतात.

मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे. ‘मल्लारी मार्तंड भैरव’ हे त्याचे संस्कृत नाव. या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की, धनगर, रामोशांपासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरांत त्याची उपासना प्रचलित आहे.

खंडोबाचे नवरात्र माझ्या माहेरी काकांकडे जवळपास शंभराहून अधिक वर्ष बसवले जाते. त्यामुळे या नवरात्राची आणि माझी ओळख माझ्या जन्मापासूनची आहे. त्यांच्या कडे खंडोबाचे टाक असल्याने ह्या नवरात्रातील सहा दिवस अश्विन महिन्यातील नवरात्रा इतकेच मनोभावे केले जाते. 

खंडोबाचे दर्शन मी पाहियांदा अष्टविनायक ट्रीप सोबत केले. जेजुरी गडावरील परिसर आणि प्रसन्न वातावरण न विसरण्या सारखे आहे. गड चढायला कठीण असला तरी मध्ये मध्ये बसण्याची सोय अतिशय उत्तम आहे. ठीक ठिकाणी हळदीचा भंडारा विकायला ठेवलेला असतो. जेजुरी हे गांव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांत असणार्‍या राममंदिरांत एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्‍या ६३ ओर्‍या आहेत.

अनवाणी पायाने गड चढल्याने पायाचे तळवे वर पोहोचे पर्यंत हळदीने पिवळे झालेले असतात. मंदिरात गाभाऱ्यात आणि सर्व सभोवताली हळदच हळद उधळलेली असते. आमचे देवाचे दर्शन अतिशय सुंदर झाले. हळदीचा भंडारा घेऊन आणि कपाळावर हळदीचा मळवट भरून आम्ही प्रसन्न मनाने देवाच्या आवारात जप करत होतो त्यावेळी काही जुन्या आठवणी आम्हा दोघांना एकदम आठवल्या आणि एकाच वेळी आम्ही दोघ एकमेकांनकडे पाहून हसलो. ती आठवण अशी होती कि दरवर्षी आम्ही शिर्डीला जातो. तेव्हा बाबांच्या दर्शना नंतर सहज मागच्या रस्त्यांनी फिरयला गेलो असताना साधारण ४ ते ५ किलोमीटर वर एक खंडोबाचे मंदिर आहे असे आम्हाला तिथल्या ग्रामस्थांनी सांगितले आणि आम्ही तिथे दर्शन घेण्यास गेलो. दर्शन खूप सुदर झाले. आम्हा दोघा उभयतांना ते मन्दिर फार आवडले. आरती आणि प्रसाद घेतला आणि आम्ही हॉटेल रूम वर परतलो. आता हे आमचे मनाशी पक्के झाले होते कि जेव्हा जेव्हा बाबांच्या दर्शनाला यायचे तेव्हा तेव्हा या मंदिराला हि येऊन खंडोबाचे दर्शन घ्यायचे. 

पुढच्या वर्षी आम्ही परत बाबांना भेटायला शिर्डीला निघालो मनात पक्के होते बाबांचे दर्शन झाले कि खंडोबाचे दर्शन घेऊन पुढे शनि-शिंगणापूर आणि भीमाशंकर या ठिकाणी जायचे. खूप गर्दी असल्याने बाबांच्या दर्शनाला वेळ लागला, पुढे शनि-शिंगणापूर आणि भीमाशंकरला जाण्यासाठी कार बुक केली होती, उशीर व्हायला लागल्याने आम्ही खंडोबाचे दर्शन न घेता पुढे जायचे ठरवले. पण मग दोघांच्याही मनात काय आले कलेच नाही आम्ही गाडी परत फिरवली आणि त्या मंदिरात गेलो. जणू काही आमच्याच साठी देव आरतीला थांबले होते आम्ही मंदिरात प्रवेश करतो न करतो तोच तिथल्या गुरुजींनी आम्हाला थेट गाभाऱ्यात नेले आणि आरतीचे ताट आमच्या हातात ठेवले. आम्ही हि मग वेळकाळ बाजूला ठेवून मनोभावे आरती केली, प्रसाद घेतला. आणि प्रसन्न मनाने पुढील प्रवासाला सुरवात केली. थोड्यावेळाने माझ्या व्हॉटसएपवर चंपाषष्ठीचे महत्व यावर एक मेसेज आला आणि मला आश्चर्य वाटले कि त्या दिवशीच चंपाषष्ठी होती. आम्हाला खंडोबाच्या आरतीचा लाभ मिळाला आणि तोही आम्ही पुढील द्र्शालाला वेळ होत होता म्हणून ते दर्शन टाळून पुढे जात असताना आम्हला परत बोलवले गेले आरती आमच्या कडून करून घेतली देवांनी. आम्हा दोघांना भरून पावल्याचा आनंद मिळाला आणि तेव्हाच आम्ही जेजुरीच्या दर्शनाला येऊ असे खंडोबाला सांगितले. 

जेजुरी मंदिर परिसर 

कुलदैवत खंडोबाचे नवरात्र...

नमो मल्लारीं देवाय भक्तानां प्रेमदायिने ।

म्हाळसापतीं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः ।।

मल्लारीं जगतान्नाथं त्रिपुरारीं जगद‌्गुरूं ।

मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् ।।

खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण "सदानंदाचा येळकोट’ किंवा "येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात, ताम्हण उचलताना प्रत्येक वेळी भंडारा भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात. दिवटी-बुधली घेऊन आरती केल्यानंतर देवळाच्या दिशेने चार पावले जाऊन देवाला ओवाळतात व पुन्हा भंडारा उधळतात. नंतर दिवटी दूधाने शांत करतात. नैवेद्य झाल्यावर कुत्र्यासही घास देतात. चातुर्मासात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना, नंदादीप, खंडोबाची पूजा, मल्हारी माहात्म्याचा पाठ, एकभुक्त राहणे, शिवलिंगाचे दर्शन, सवाष्ण-ब्राह्मण भोजन, भंडारा उधळणे इत्यादी गोष्टी करतात. चातुर्मासात वर्ज्य केलेले वांगे चंपाषष्ठीपासून खाण्यास सुरुवात करतात. 

चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥

॥ चंपाषष्ठी चा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥

खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व आहे. त्यातील काही सौम्य नवस असे- मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. दीपमाळा बांधणे. मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे. पायर्‍या बांधणे, ओवरी बांधणे. देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठरावीक दिवशी देवदर्शनास जाणे. पाण्याच्या कावडी घालणे. उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या-मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे, यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे. तळी भरणे, उचलणे, दही-भाताची पूजा देवास बांधणे. पुरण-वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांना भोजन घालणे. कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे-भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.

मणीसूर-मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यापूर्वी श्रीशंकराने ‘मार्तंड भैरव’ अवतार धारण केला. त्या युद्धात विजयासाठी त्याच दिवशी सप्तर्षींनी एक प्रतिष्ठान स्थापले व त्यावर ते रोज एक माळा चढवत होते. सरतेशेवटी शंकराचा विजय झाला. म्हणून देवांनी मार्तंड भैरवावर भंडारा उधळला, त्‍यावर चंपा फुलांची (चाफ्याच्या फुलांची)  वृष्टी केली तो दिवस शुद्ध षष्ठीचा होता. म्हणून चंपाषष्ठीला नवरात्र उठते अशी कथा त्यामागे सांगितली जाते.

खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत , मार्तंडभैरव, किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात.

स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा वध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले. हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले. खंडोबाची वेशभुषा: साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेष असतो. भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ति होय. हळदपूड, सुक्या खोबर्‍याच्या वाट्या एकत्र करुन तो प्रसाद व” येळकोट येळकोट जय मल्हार ” हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात, की ‘ हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल.

खंडोबाचा टाक 

खंडोबाच्या हातांतील वस्तु: खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो.

 खंडोबारायाची पाच प्रतीके

१) लिंग : हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते.

२) तांदळा : ही एक प्रकारची चल शिळा असून, टोकाखाली निमुळती होत जाते.

३) मुखवटे : हे कापडी किंवा पिटली असतात.

४) मूर्ती : या उभ्या, बैठ्या, घोड्यावर. तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात.

५) टाक : घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा.

 खंडोबारायाचे संबंधित दिन विशेष

रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबाभक्तांची श्रद्धा आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बारा प्रसिद्ध स्थाने

महाराष्ट्र :

१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी

२) निमगाव

३) पाली-पेंबर सातारा

४) माळेगाव

५) सातारे (औरंगाबाद)

६) शेंगूड (अहमदनगर)

७) नळदुर्ग (धाराशिव-उस्मानाबाद)

८) वाटंबरे

 कर्नाटक :

१) मैलारपूर-पेंबर (बिदर)

२) मंगसुळ्ळी (बेळगाव)

३) मैलारलिंग (धारवाड)

४) देवरगुडू (धारवाड)

५) मण्मैलार (बळ्ळारी)

  खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते. देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी.

कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करतांना सुगंधि फुले, गुलाल, व भंडार वहावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत. पूजा करतांना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत.

पत्री : पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी.

देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावेत. देवासमोर वाटींत दूध ठेवावे. त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.

देवाजवळ अखंड तेला-तूपाचा नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात.

सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.

"येळकोट येळकोट जय मल्हार"

क्षेत्रपाल कालभैरवाय नमः



लहानपणापासूनच कुलदैवत, कुलस्वामिनी आणि  कुलपुरुष यांचे महत्व आजी कडून कळले होते. त्यामुळे दरवर्षी देवाला जाणे, कुलास्वमिनीची ओटी भरणे ह्या गोष्टी माहेरी नियमित पणे केलेल्या मी पहिल्या होत्या. लग्न जमल्या नंतर आता आपली कुलस्वामिनी कोण आणि कुलदैवत कोण हेही मला जाणून घ्यायचे होते. साधारणपणे खंडोबा हे कुलदैवत बऱ्याच जणांचे असतेच पण आमचे म्हणजेच माझ्या सासरकडचे कुलदैवत काळभैरव आणि भैरीभवानी असल्याने; काळभैरव हे दैवत माझ्या आयुष्यात माझ्या लग्नानंतर आले. जसे माझ्या माहेरी खंडोबाची पूजा अर्चा केली जायची, एकविरा देवी आणि व्याघ्रम्बरी देवीची पूजा केली जायची तसेच सासरी सुद्धा काळभैरव आणि तुळजाभवानी देवीची पूजा -आराधना केली जाते. नेहमीच्या सवयी प्रमाणेच मला या देवते बद्दलही जाणून घेण्याची मला उत्सुकता होती; त्यामुळे मी देवतेचा फोटो किंवा पोथी शोधण्यास सुरवात केली. माझ्या सासरी  वर्षातून एकदा काळभैरव जयंतीनिमित्त कुलदेवतेला जायची प्रथा होतीच; पण लग्नानंतर नवीन जोडपे देवाला घेऊन जातात तसेच संगमेश्वर येथील कालभैरव आणि भैरी भवानीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो, पहिल्यांदीच मी या देवतेच्या मंदिरात जाणार होते. शिव-शंकराचे हे उग्र रूप आहे हे त्याच्या नाव वरूनच लक्षात आले होतेच. त्यामुळे एक वेगळेच दडपण माझ्या मनात होते. 

आमचे गाव गुहागर जवळील अंजनवेल आणि संगमेश्वर येथे असलेले भैरीभवानीचे मंदिर हे आमचे कुलदैवत. मंदिर परिसर फार जुन्या वाड्या आणि जुन्या ठेवणीच्या घरांनी वेढलेला आहे. जवळच रहाणाऱ्या गुरवान ( गुरुजी) कडे आम्ही फ्रेश झालो आणि समोरच असलेल्या मंदिरात प्रवेश केला. नारळी-पोफळी आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेला हा परिसर, मस्त गार वारा आणि मंदिराच्या पाठी असलेल्या झऱ्याचा हळुवार आवाज लहान मुलांप्रमाणे  निरव शांततेत अल्लडपणे बाधा आणत होता. आम्ही त्याच झर्याच्या पाण्यात पायावर पाणी घेतले आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. नेहमी प्रमाणे आपण मंदिरातील घंटा वाजवून आत शिरतो तसेच येथेही केले गेले. मंदिरातील प्रसन्न वातावरण, धुपाचा सुगंध आणि नुकतीच पूजा आवरल्याने टवटवीत फुलांनी सजवलेले देव फारच नयनरम्य वातावरण होते. माझ्या आई-पपांनी मनोभावे पूजा केली ओटी भरली आणि हाताची ओंजळ करून माझ्या लेकीला आपल्या ओटीत घातली आहे तिचा सांभाळ करा देवा असे म्हणताच काळ भैरवाच्या डोक्या वरील लाल चुटूक जास्वंदीचे फुल टपकन माझ्या पप्पांच्या ओंजळीत पडले. 

मी नेहमीच म्हणते "जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दयाघना" हे मला त्या दिवशी मनोमनी पटले. आणि त्या दिवसा पासून आज तागायत देव माझ्या पाठीशी सदैव रक्षणासाठी उभे आहेत याची प्रचीती ते वारंवार देत्तात. हा माझ्या मनातला भाव तुमच्या सोबत काळभैरव जयंती निमित्त शेयर करावासा वाटला.

पाहूया कालभैरव देवाची माहिती आणि महती ज्याची माहिती मी थोडी माझ्या जवळ असलेल्या पोथीतून व काही माहिती सोशल साईट वरून गोळा करून संकलित केली आहे.

भैरव मंदिर अनेक ठिकाणी असते, मंदिर नसले तरी एखाद्या मंदिराच्या बाह्य भिंतीवर भैरव असतोच. 

भैरव म्हणजे भरण करणारा किंवा भीषण. शिवाच्या रौद्र प्रकाराचेच हे एक रुप. याला अनेक नांवानी संबोधतात बहिरोबा, भैरोबा असेही म्हणतात. क्षेत्रपालही म्हणतात. हा काशीचा अधिपती व रक्षक आहे असे मानतात. 

पुराणात आलेली यासंबंधी कथा : 

शिव महापुराणाच्या आधारे असे संगतात कि, भगवान विष्णु आणि ब्रह्मा याच्यात संवाद चालला असता ब्रह्मा म्हणाले के, मीच या सृष्टीचा कर्ता असून सर्व देवांनी माझीच स्तुती करावी. हे ऐकून भगवान शिवांना क्रोध आला, आणि त्यांनी काळभैरवाची, ब्रह्माला शासन करण्यासाठी, उत्पत्ती केली. ब्रह्माच्या पाच मस्तकांपैकी एक मस्तक काळभैरवाने उडवले. आणि तेव्हापासून ब्रह्माला चारच डोकी आहेत. परंतु ते कापलेले मस्तक भैरवाचेच मस्तक आहे असे दिसू लागले, आणि त्याला ब्रह्माच्या शिरच्छेदाबद्दल अपराधी भावना वाटू लागली. आणि त्यामुळे कित्येक युगांपर्यंत, तो पर्यंत पापमुक्त होत नाही, तो पर्यंत काळभैरव ते मस्तक वाहत होते. ब्रह्महत्येचे पाप धुवायचे तर तिर्थाटन केले पाहिजे. शिवाने बारा वर्ष कापालिक व्रत केले. बारव्या वर्षी तो काशीस पोचला तेव्हा त्याच्या हातातून ब्रह्मदेवाचे कपाल गळून पडले. म्हणूनच काशीस कपालमोचन असे ही म्हणतात. 

दुसरी एक कथा अशी सांगतात के, देवांचा राजा दक्षची कन्या सतीने मनोमन 

 भगवान शिवालाच आपला वर मानले होते, आणि विवाह केला, परंतु हे दक्षाला मान्य नव्हते, कारण शिव स्मशानात राहतो, अंगाला प्रेतभस्म लावतो, ध्यान विचित्र आहे, आणि सोबत भुते असतात. नंतर जेव्हा दक्षाने मोठा यज्ञ केला तेव्हा त्याने शिव सतील बोलावले नाही. परंतु सती न बोलावताहि यज्ञाला आली, परंतु दक्ष शिवाला दुषणे देउन, अर्वाच्य भाषेत शिव्याशाप देऊ लागला, हे सहन न होऊन सतीने तिथ्व्च प्राणत्याग केला. हे पाहून शिवाला अतिशय दुःख झाले, आणि त्याने रागाने यज्ञाचा विध्वंस केला आणि दक्षाचा वध केला. दुःख अनावर झाल्याने, शिव सतीचे प्रेत खांद्यावर घेऊन त्रिलोकात फिरु लागला. आणि यामुळे सृष्टीचा नाश होऊ लागला. ते पाहुन भगवन विष्णुने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे तुकडे केले, तेव्हा हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. या शक्तिपीठांच्या रक्षणासाठी शिवाने काळभैरवाची उत्पत्ती केली, म्हणुन त्या त्या ठिकाणी काळभैरवाचे मंदिर असतेच.

पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात. शैव आगमांनुसार एकूण चौसष्ठ भैरवांचे आठ वर्ग असून त्या वर्गांच्या आठ प्रमुखांना ‘अष्टभैरव’ म्हणतात. 

अष्टभैरवांच्या नावांविषयी बरेच मतभेद आहेत. संहार वा महासंहार, असितांग, रूरू, काल, क्रोध, ताम्रचूड, कपाल, चंद्रचूड, रुद्रभैरव, चंड, उन्मत्त व भीषण या नावांपैकी वेगवेगळ्या आठ नावांचा अष्टभैरवांत समावेश केला जातो. विद्या, काम, नाग, स्वच्छंद, लम्बित, देव, उग्र व विघ्न या प्रत्येकाला शेवटी ‘राज’ हे पद जोडूनही ही यादी केली जाते.

हिंदू पंचांग नुसार ‘काल भैरव जयंती’ प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. या दिवसाला ‘कालाष्टमी’ देखील म्हणतात. शास्त्रात नमूद केलेल्या कथांनुसार शिवरूपी भगवान ‘काल भैरव’ यांचा जन्म याच तिथीला झाला होता. काल भैरव जयंतीच्या दिवशी भगवान काल भैरव यांची प्रार्थना करण्याचे काही विशेष विधी आहेत. या खास दिवशी काल भैरवाची पूजा केली गेली, तर ते भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात, असे म्हटले जाते.

भगवान विश्वनाथ हे काशीचे राजा आहे आणि कालभैरव या नगरचे कोतवाल मानले जातात. म्हणून ह्यांना काशीचे कोतवाल म्हणतात. ह्यांच्या दर्शनाच्या शिवाय बाबा विश्वनाथाचे दर्शन करणे अपूर्ण मानतात. म्हणून नेहमी बाबा विश्वनाथाचे दर्शन केल्यावर कालभैरवाचे दर्शन करावे. काळ देखील ह्यांना भिऊन असतो. म्हणून यांना कालभैरव आणि हातामध्ये त्रिशूळ, तलवार आणि काठी किंवा दांडा असल्यामुळे दंडपाणी देखील म्हणतात. ह्यांची पूजा केल्यानं घरातील नकारात्मक शक्ती, जादू-तोटके, भूतबाधा असे कोणत्याही प्रकारचे भय होत नाही तर यांची पूजा केल्यानं माणसाचा आत्मविश्वास वाढतो.

अतिशय जागृत देव आहेत हे यांचे रूप जरी उग्र असले तरी त्यांच्या निस्सीम भक्तांच्या पाठी ते एखद्या रक्षण कर्त्या प्रमाणेच उभे असतात.

त्यांच्या साठी भूत्नाथांच्या आरतीतील एक ओळ आठवते 

उग्र हे रूप तुझे भूता खेतान्सी वाटे 

भक्तांच्या काजा येत माय माउली प्रगटे 

कालभैरवाय नमः

॥ अथ ध्यानम ॥

ॐ वाराणस्यां भैरवो देवः । संसारभयनाशनः ।

अनेक जन्मकृतं पापम् । स्मरणेन विनश्यति ॥

श्री गणेशाय नमः । ॐ नमः । सिद्धम्।

 



मसला मसाल्याचा भाग १० जायफळ आणि जायपत्री




आपल्या रोजच्या मिसळण्याच्या डब्ब्यात हिंग, राई, जिरं, हळद, आणि तिखट नेहमीच असते. पण त्या पुढचे मसाले जसे कि तमालपत्र, दालचिनी लवंग,काळीमिरी, वेलची, शहाजीरा, मोठी वेलची हे मात्र वेगळ्या मसाल्याच्या डब्ब्यात असते. हे सगळे मसाले अख्खे वापरले जातात किंवा त्या सगळ्याची योग्य प्रमाणात माप घेऊन त्यांची पावडर करून साठवण केली जाते. आमच्या कडे म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी सुद्धा कायम घरचाच गरम मसाला वापरला जातो ज्याची माप आणि तयर करण्याची कृती मी सांगणारच आहे. या मसाल्यान मध्ये जायपत्री आणि जायफळ याची माहिती मिळवताना मला समजले कि जायपत्री हि जायफळ या फळाच्या भोवतीच त्याला लागून असते. 

पाहूया जायफळ आणि जायपत्रीची माहिती जी मला इतर सोशल साईटस वरून मिळाली आणि एकत्रित करून तुमच्या सोबत शेयर केली आहे. 

वनस्पतिशास्त्रानुसार जायफळ (शास्त्रीय नाव: Myristica fragrans, मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ; इंग्लिश: Nutmeg, नटमेग ;) हे मायरिस्टिका प्रजातीत मोडणाऱ्या अनेक जातींच्या वृक्षांसाठी योजले जाणारे नाव आहे. व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची जात म्हणजे 'मायरिस्टिका फ्रॅग्रन्स'(Myristica fragrans) होय. ही जात मूळची इंडोनेशियातील मोलुक्का द्वीपसमूहातील बांदा बेटांवरची आहे. जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात.





 जायफळ हे जायफळाच्या झाडाचे बी होय. जायपत्री म्हणजे या बीची वाळलेली, लालसर रंगाची साल होय. जायफळाचे झाड लावल्यापासून ७ ते ९ वर्षांनी त्याला पहिल्यांदा फळे धरतात व २० वर्षांनंतर झाड पूर्ण जोमाने उत्पादन देऊ लागते. मसाल्यांमध्ये अनेकदा जायफळाची पूड वापरली जाते. एकाच झाडापासून दोन मसाल्याचे पदार्थ निर्मिणारे हे एकमेव झाड आहे. जायफळ किसणीवर सहज किसता येते, आणि सहाणीवर उगाळता येते.

जायफळात आढळणारे ‘ट्रायमिरस्ट्रेन’ (trimyristin) हा घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे रात्री उत्तम झोप येण्यासाठी जायफळ घातलेला पदार्थ उपयोगी पडतो. नाटकाच्या किंवा संगीताच्या कार्यक्रमाच्या मध्यांतरात वेलदोडा-जायफळ घातलेली काॅफी आवर्जून पितात.जायफळ चहा, कॉफी, दुधात व मिठाईत स्वादासाठी वापरतात हे सर्वश्रुत आहे; पण याचा औषधीतदेखील मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मोठे वजनदार, टणक जायफळ उत्तम प्रतीचे असते. जायफळ अनेक वर्षे तुपात ठेवले असता खराब होत नाही. जायफळापासून तेल निघते. या स्थिर तेलास ‘जातिफळ-नवनीत’म्हणतात. 

भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत.

 मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ही जायफळाची सर्वसाधारण जात इंडोनेशियातील बांदा बेटांव्यतिरिक्त, मलेशियातील पेनांग बेटावर तसेच कॅरिबिअन भागातील ग्रॅनडा येथे आढळून येते. दक्षिण भारतात केरळामध्ये ही जात जोपासली जाते. न्यू गिनी येथील पापुअन नटमेग मायरिस्टिका अर्जेंटिया आणि भारतातील बॉंबे नटमेग मायरिस्टिका मलाबारिका या जायफळाच्या इतर प्रमुख जाती होत.

 आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औषधीयुक्त असतं. आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंटचं काम जायफळ करतं. जायफळ अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही परिपूर्ण असतं. म्हणूनच डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात जायफळचा वापर केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो. सोबतच पचनक्रियेशी संबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं. तर जाणून घ्या जायफळचे औषधीय गुण...

 जायफळचा व्यवस्थित डोस घेतल्यास हृदयविकारांपासून आपण बचाव करू शकतो. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरतं.

 जायफळमध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून शरीराचं रक्षण जायफळ करतं. म्हणूनच आपल्या जेवणात, स्वयंपाकात जायफळचा वापर केल्यानं संक्रमण होण्याची शक्यता कमीच असते. एव्हढंच नाही तर जायफळचं पावडर कुठल्याही इंफेक्शनच्या ठिकाणी लावलं तर ती जखम किंवा इंफेक्शन बरं होतं.: जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्याचं ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं. डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फायदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग खाण्यात करणं आवश्यक आहे.

जायफळच्या अर्कामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि स्वादुपिंडाचं काम वाढवतं.

जायफळ कफवातशामक, शोथहर, वेदनास्थापन, उत्तेजक, कुष्ठघ्न, दुर्गंधीनाशक व वातशामक आहे.

 जायफळ हे 10 ते 20 मिटर उंच वाढणारे सदापर्णी झाड आहे. जायफळामध्‍ये पपई व कोकम या प्रमाणेच नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. जायफळ बागेमध्‍ये सुमारे 50 टकके झाडे मादी 45 टक्‍के नर व 5 टक्‍के संयुक्‍त फूले असणारे झाडे निघतात. नराच्‍या झाडास गुच्‍छाने फुले लागतात तर मादी झाडास एक एकटी फूले लागतात. जायफळाची फळे चिकुच्‍या आकाराची पण गुळगुळीत व पिवळसर रंगाची असतात. फळांच्‍या टरफलांच्‍या आतील अंगास गुलाबी रंगाची जाळी असते. या जाळीस जायपत्री म्‍हणतात. फळांच्‍या टरफलांचा उपयोग लोणचे, चटणी, मुरंबा इत्‍यादि साठी करतात. जायफळाचा उपयोग मिठाई स्‍वादिष्‍ट करण्‍यासाठी तसेच जायफळ व जायपत्रीचा उपयोग मसाल्‍यात केला जातो. जायफळातील तेलाचा उपयोग औषध, साबण, टुथपेस्‍ट चॉकलेट इत्‍यादी उत्‍पादनात केला जातो.

 स्वयंपाक घरात आरोग्यविषयक समस्यांवर लाभदायक अशा अनेक वस्तू आहेत, ज्या महागड्या उपचारांपेक्षाही तितक्याच गुणकारी ठरतात. त्यापैकी एक म्हणजे जायफळ होय. जाणून घेऊया की काय आहेत जायफळचे फायदे. * जायफळ वापरल्याने त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होतात. त्यातीलच डोळ्यांखालचा काळेपणा होय. जायफळाची पेस्ट बनवून डोळ्याखाली लावल्याने डोळ्याखालचा काळेपणा कमी होण्यास मदत होते. सर्वप्रथम जायफळाची पेस्ट बनवून डोळ्याखालील काळ्या भागावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर पाण्याने धुवून घ्या. असे रोज केल्यास डोळ्याखालचे काळे डाग निघून जातील. * जायफळ गुणधर्माने गरम असल्यामुळे लहान मुलांसाठी हे एक वरदान आहे. थंडीपासून बचावासाठी हिवाळ्यात लहान मुलांना हे दिले जाते. जायफळ मोहरीच्या तेलात मिसळून मुलांना दिले जाते. * जखमेवरही जायफळ गुणकारी ठरते. यासाठी जखम झालेल्या ठिकाणी तयार झालेले निशाण दूर करण्यासाठी जायफळाचे चूर्ण बनवून मोहरीच्या तेलासोबत लावावे.

 जायपत्री आणि जायफळाचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे –

 जायफळ किसून गरम भांडय़ात थोडं गरम करावं. त्यात तेवढाच गूळ घालावा. त्याच्या लहान लहान गोळ्या कराव्यात. या गोळ्या डायरियासारख्या आजारात घेतल्यास लवकर आराम पडतो.

 जायफळाची पूड लिंबाच्या रसात घोळवून त्याची पेस्ट चेह-यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. ही पेस्ट एक उत्तम ब्लीच समजलं जातं.

 पॅरालिसिसच्या रुग्णांची जीभ जड होते, तेव्हा त्या रुग्णांच्या तोंडात जायफळ चघळायला दिल्याने रुग्णांना अतिशय उपयोगी ठरतं.

 निद्रानाश होत असल्यास जायफळाची पूड तुपात घोळवून ती कपाळावर लावल्याने झोप येते आणि निद्रानाशाचा त्रास कमी होतो.

 अस्थम्याच्या झटक्यावर जायपत्री अतिशय गुणकारी ठरते. एक ग्रॅम जायपत्री मधात घोळवून दिवसातून ४-५ वेळा खाल्ल्याने अस्थम्याच्या रुग्णांना बराच आराम पडतो.

 जायपत्री तेलाच्या सेवनाने लहान मुलांची भूक वाढते आणि वजन कमी करण्यासही ती उपयुक्त ठरते.

 अति तहान लागत असल्यास नैसर्गिक चहात (हर्बल टी)मध्ये ३ ग्रॅम जायपत्री टाकून तो चहा प्यावा. यामुळे लगेच आराम पडतो.

 जायपत्री तेल आणि नारळाचं तेल दोन्ही एकत्र करून त्याने टाळूला मालीश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची वाढ होते.

बिघडलेल्या जायफळांपासून चरबीयुक्त पदार्थ काढतात, त्यास जायफळाचे ‘लोणी’ म्हणतात; त्याचा उपयोग साबणास सुवास आणण्यासाठी करतात; शिवाय मलमाकरिता आणि संधिवात, पक्षाघात, मुरगळणे इत्यादींवर लावण्याकरिता करतात. पत्रीची चव व वास बियांप्रमाणेच असतात. सालीपासून ‘कीनो’ नावाचा डिंक मिळतो. पाने, फुले आणि साल यांपासूनही बाष्पनशील तेल मिळते. बियांच्या किंवा पत्रीच्या तेलाचा उपयोग अन्नपदार्थ, पेये, साबण, तंबाखू, दंतमंजने व सुगंधी प्रसाधने, मर्दनाची किंवा केसांची तेले यांत करतात. पक्व फळांच्या सालीचे लोणचे, मुरंबे वगैरे बनवितात.

कशी वाटली जायफळ आणि जायपत्री ची माहिती कॉमेंट नक्की करा. 

मामलेदार मिसळ







मामलेदार मिसळ म्हणजेच तहसीलदार कचेरी कँटीनचे सर्वेसर्वा श्री. लक्ष्मण मुरुडेश्वर यांचे आज कोरोना मुळे निधन झाले. ही बातमी व्हाट्सएपच्या ग्रुपवर आली आणि आठवणींचे चक्र गर्रकन फिरून साधारण पस्तीस-चाळीस वर्ष पाठी गेलं. 
त्यावेळी मी दहा ते बारा वर्षाची असेंन; बरेचदा आजी-आजोबांसोबत जिल्हापरिषद जवळील सेन्ट्रल बँकेत मी जायची आणि बॅंकेतील कामं उरकली कि त्यानंतर मामलेदारची मिसळ खाण्याचा ठरलेला कार्यक्रम असायचा. ती झणझणीत, ठसकेबाज, लालभडक मिसळ खाताना मला नुसते डोळ्यातून पाणी अन कानातून वाफा यायच्या पण तरीही पाण्याचे ग्लासच्या ग्लास पीत त्या झणझणीत मिसळीवर ताव मारला जायचा. त्यांनतर मिळणारे ताक मात्र आम्ही आवर्जून प्यायचो. या आठवणींची एक लांबलचक दोर तयार झाली ती थांबेच ना; कारण शाळेनंतर अनेकदा तसेच कॉलेजमध्ये असताना कित्येकदा त्यानंतर मित्र-मैत्रिणीच्या सोबत, आई-बाबा सोबत कोणतेही वेळ काळ आणि निमित्त न लागता मामलेदार मिसळीचा आस्वाद मी न मोजता येईल इतके वेळा घेतला आहे आणि अजूनही आमच्याकडे जरी आम्ही घोड्बंदेरला राहायला गेलो असलो तरी ठाण्यात आल्यावर आवर्जून मिसळीचे पार्सल घेऊन जातो. 

काही समीकरण अगदी ठरलेली असत्तात तेच ठाणे आणि मामलेदारची मिसळ हे समीकरण अगदीच जुनं आणि ठाण्याची ओळख ठेवणारे आहे. पाहूया मामलेदार मिसळीची माहिती.

 लक्ष्मण मुर्डेश्वर हे त्यांच्या वडिलांसह म्हणजे  नरसिंह मुर्डेश्वर यांच्यासह मुंबईत आले तेव्हा ते केवळ ४ वर्षांचे होते. ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी उद्योग करावा, या हेतून आजचे तहसीलदार कार्यालय म्हणजेच त्यावेळच्या मामलेदार कचेरीच्या बाहेरची जागा शासनाकडून भाड्याने घेतली आणि तिथे कँटीन सुरू केले होते. मूळचे कर्नाटकचे असलेल्या मुर्डेश्वर यांनी ठाण्यात १९४६ साली तहसील कार्यालयाबाहेर 'मामलेदार मिसळ' सुरू केली होती. मात्र, काही वर्षांनी म्हणजे १९५२ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर आली. तेव्हापासून ते कँटीन चालवत होते. मामलेदार मिसळीला आज ७० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यानंतर आज 'मामलेदार मिसळ' हा एक ब्रँड झाला आहे. मामलेदार मिसळी'ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक ओळख मिळवून देण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.  ठाण्यातील खाद्य ते मिष्टान्न विक्रेता संघाचे २७ वर्ष ते खजिनदार होते.

 सर्वात तिखट मिसळ अशी या मिसळीची ख्याती आहे. मामलेदार मिसळ तीन प्रकारांमध्ये मिळते. कमी तिखट, मध्यम तिखट आणि खूप तिखट. यातली खूप तिखट मिसळ खाणं हे साध्यासुध्या माणसाचे काम नाही. पट्टीचा तिखट खाणाराच तिथे पाहिजे. ठाणे स्टेशनजवळ असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयावर एका छोट्याश्या कँटिनमध्ये या मिसळीचा प्रवास सुरु झाला. ५० स्क्वेअर फुटांवरुन हे कँटिन ५०० स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त मोठ्या जागेत गेले. मात्र या मिसळीची चव किंचितही बदलली नाही. इथे मिसळ खायला बसल्यावर तुमच्यासमोर पाण्याचे भरपूर ग्लास ठेवले जातात. नवख्या लोकांना एवढे ग्लास का ठेवले जात असतील हा प्रश्न पडतोच. मात्र मिसळीचा पहिला घास खाल्यानंतर कळते की एवढं पाणी का आणले आहे. मामलेदार मिसळ सुरु करणाऱ्या नरसिंह मुर्डेश्वर यांच्या पत्नीने या मिसळीसाठीचा मसाला सर्वात आधी तयार केला होता.आजही त्याच पद्धतीचा मसाला वापरुन ही मिसळ तयार केली जाते. त्यामुळे मिसळीच्या चवीत फरक पडलेला नाही.

सकाळी चार वाजता या मामलेदार केंतीन ची सुरुवात होते. सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत रोज साधारण तीन ते साडेतीन हजार लोकं या मिसळीचा आस्वाद घेतात आणि शनिवार- रविवार तर हा आकडा पाच ते सहा हजारावर जातो. आता मामलेदार मिसळीच्या शाखाही बर्याच ठिकाणी चालू झाल्या आहेत. 

झणझणीत लाल रस्सा आणि ताजे मऊशार पाव असा बेत समोर आला की भल्याभल्यांचे जिभेवरील नियंत्रण सुटते आणि तेलाने काठोकाठ, चमचमीत  मिसळीचा घास घेतला जातो. या मिसळी सोबत फरसाण  दिले जाते जे याच ठिकाणी बनवले जाते. मिसळ फरसाण कांदा लिंबू आणि छोट्या पुडीतील बटाटा भाजी एकत्र केली कि जी स्वादिष्ट मिसळ तयार होते तिची चव कायम जिभेवर रेंगाळत राहतेच. 

अनेकदा गडकरी रंगायतन मध्ये नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर मामलेदार मिसळीचा स्वाद घेतलेले मराठी नट आणि ठाण्यातील सभा किंवा मिटींग्स आवरल्यावर मिसळीचा स्वाद घेतलेले राजकारणी मंडळी यांचे अभिप्राय आपण वाचलेच असतील. जो एकदा या मिसळीचीच घेतो तो परत आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र मंडळींना मामलेदारची मिसळ खाऊ घालतोच. या मिसळीची वाटचाल अशीच पुढे चौ राहो आणि आम्हा ठाणेकरांना अभिमानाने  कायम सांगता येवो !!!!! चवीने खाणार त्याला मामलेदार मिसळ खायला मिळणार !!!!



 





त्रिपुरारी पूर्णिमा

 



भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. कार्तिकेयांना दक्षिण दिशेचे स्वामी मानले जाते.

कार्तिक महिन्यातील पूर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो.बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.  शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते. उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे.

 त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात.वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते असे मानले जाते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते हे या पूजेचे विशेष महत्त्व आहे. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहिली जाते परंतु या पूजेचा त्याला अपवाद आहे. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा 'हरिहर' पूजा केली जाते. 

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते.मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात.

दीपोत्सव झाल्यानंतर कार्तिक पौर्णिमेला देशातील काही ठिकाणि देवदिवाळी साजरी केली जाते. तर काही ठिकाणी मार्गशीर्ष प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते. काही ठिकाणी या दिवशी बैलांच्या झुंजी लावण्याची चाल आहे. कार्तिक पौर्णिमेला बनारसमध्ये संपूर्ण नगरीला दिव्यांनी सुशोभित केले जाते. गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते.

दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला देवी-देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी-देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते. या दिवशी लक्ष्मी-नारायण पूजन करणे अतिशय शुभ मानले गेले आहे. शक्य असल्यास सत्यनारायण पूजनही या दिवशी करणे उत्तम मानले गेले आहे. कार्तिक पौर्णिमेला शक्य असेल, त्यांनी आवर्जुन दीपदान करावे, असे सांगितले जाते. 

प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्व असते, परंतु कोजागिरी पौर्णिमे प्रमाणेच कार्तिक पौर्णिमेस सुद्धा अतिशय महत्व आहे. असे म्हटले जाते कि सृष्टीच्या निर्माणा पासूनच कार्तिक पौर्णिमेचे मोठे महत्व राहिले आहे. ह्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान पुण्य करण्याचे व श्री सत्यनारायण पूजा करून त्याची कथा श्रवण करणे हे अधिक महत्वाचे आहे. ह्या व्यतिरिक्त भगवान श्री शंकर व माता पार्वती ह्यांच्यासह कार्तिकेय व श्रीगणेश ह्यांचे सुद्धा ह्या दिवशी पूजन करणे आवश्यक आहे. शिव परिवारावर मध व दुधाने अभिषेक केला असता अक्षय फल प्राप्ती होते. 

ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पोर्णिमेसह सर्व पौर्णिमेस चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे. माता लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी ह्या दिवशी भगवान श्री विष्णुसह माता लक्ष्मी देवीची पूजा करावी. श्रीसूक्त पठण कराव. 

दंतकथा 

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते. त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की, देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. मात्र, तसे झाले नाही आणि शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी शंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली. जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे, हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.

 काही पौराणिक कथांनुसार, श्रीविष्णूंनी यात दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलायापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. अठरा पुराणांमध्ये मत्स्यपुराणाचा समावेश आहे. श्रीविष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला, तो पुढे मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले.

त्रिपुरी पूर्णिमे बद्दलची माहिती काही सोशेल साईट वरून संकलित केली आहे आणि तुमच्या सोबत शेयर केली आहे. 





तुळशी विवाह

 


तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी जी एकादशीपासून करायचा पूजोत्सव अशी प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे, म्हणूनच तिला हरिप्रिया असेही म्हंटले जाते व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुलसी व्रत हे एक काम व्रत आहे. तुलसी विवाह करणे हा या व्रताचा भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लागते .

तुळसीचे पान. एक त्रलोक्य समान, उठोनिया प्रात:काळी, वंदी तुळसी माऊलींनाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही’’अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.

हिंदू धर्मा मध्ये तुळशीला पाप – नाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही  भारताच्या सर्व प्रांतात व सर्व प्रदेशात उगवणारी वनस्पती आहे. बहुतांश हिंदू कुटुंबीयांच्या घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णू चा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुळशी विवाहाचे एक व्रत मांडले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.

विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात, त्याला ‘प्रबोधोत्सव’ असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव आणि तुलसी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुळशीच्या लग्नानंतर हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरुवात होते. 

हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्त्व आहे. 

तुळशीचे लग्न हा पूजोत्सव आहे. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची / तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची-गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात व तिला छान असे सजवितात. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. 

तुळशीच्या चारी बाजूंनी उसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्री बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशी मातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्य लेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुस-या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो. मग सर्वाना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर (सायंकाळी) श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो.  तुळशी जवळ बोर चिंच आवळा सितापळ कांदयाची पात ठेवतात. रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती, दीपाराधना उरकण्यात येते. त्यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. जमलेल्या लोकांस लाहय़ा, कुरमुरे, उसाच्या गंडे-या देण्यात येतात. हा विवाह केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. ते व्रत तुलसीवनात करणे हे विशेष पुण्यप्रद मानले आहे. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. तसेच रोगनिवारणही होते, अशी समजूत आहे.

तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. तुळशीपूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैवुंâठात जातो, अशी श्रद्धा आहे. म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजळाप्रमाणे तुलसीपत्रही ठेवण्यात येते. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले जाते.

हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असं म्हटलं आहे. ग्रीक भाषेतील ‘बेंझिलिकॉन’ हा तुळशीसंबंधीचा शब्द ‘राजयोग’ या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे, असे मानत असत.

तुळशीची आरती :

जय देव जय देवी जय माये तुळशी ।निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी। ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी।

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।गोसावीसुत विनवी मजला तूं तारी।


दंतकथा १ 

तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणात आहे. ती अशी की, जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योद्धा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती.

पुढे, देव व दैत्य यांच्यांत युद्ध होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली. विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली.

इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले. वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडलेल. त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ठ भक्षण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली, तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वत: तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात.

विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले; इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेडय़ासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली.

तुलसी श्री सखी शिवे पाप हरिणी नारायण मनः प्रिये




संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...