उत्सव दिपमालेचा
उत्सव नात्यंचा
उत्सव आनंदाचा
उत्सव सौख्याचा
उत्सव भरभराटीचा
दिवाळी म्हंटली कि वरील वाक्य हमखास प्रत्येक ठिकाणी वाचायला ऐकायला मिळतात. वर्षभरातील हा पाच दिवसांचा सण तुम्हा आम्हा सर्वांचा खास असतो. अत्यंत उत्सवाने आपण या सणाची वाट पहात असतो. घरातील छोट्या मोठ्या गोष्टी आपण दिवाळीत करू हेच वर्षभर ठरवत राहतो. हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची एक सुंदर लहर घेऊन येतो. प्रत्येक जण आपल्या परिस्थिती नुसार आणि इच्छे नुसार थोड्या किंवा मोठ्या प्रमाणात दिवाळी हा सण न चुकता साजरा करतोच. झगमगते अन भरभराटीचे हे पाच दिवस आपल्या मनाला सुखावून जातात. नातेवाईक, घरातील लहान-थोर अन मित्र परिवार यांना भे वस्तू देताना अन त्यांच्या कडून घेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हसू खुलत. घरातही एक सकारात्मक उर्जा जाणवते, मानसिक समाधान मिळते.
या प्रत्येक दिवसचे काही न काही महत्व आहे अन त्याची माहितीही आहेच त्याच सोबत माझ्या आठवणी सुद्धा आहेत. दोन भागात मी सविस्तर माहिती लिहित आहे. आजच्या भागात धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन याची माहिती जी मी संकलित केली आणि त्यामुळे माझ्याही ज्ञानात भर पडली तीच तुम्हालाही सांगू इच्छिते.
धनत्रयोदशी
हिंदू धर्मातील प्रमुख सणांपेकी एक असलेल्या दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणार्या धनत्रयोदशीने आज दिवाळी पर्वाला प्रारंभ होऊन पुढील ५ दिवस दिवाळी चालते. त्यासाठी धार्मिक परंपरेनुसार घरोघरी पूजेची तयारी करण्यात येते. अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजाअर्चा करून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी योग्य मुहूर्त असल्याचे मानले जाते. धनत्रयोदशीला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.
या शिवाय समुद्र मंथनातून धन्वंतरी या दिवशी अमृतकुंभ घेऊन बाहेर येते, म्हणून या दिवशी धन्वतंरीची देखील पूजा केली जाते.
आज आपण याचं धनत्रयोदशीचे अध्यात्मिक महत्व जाणून घेणार आहोत.
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे…
कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असे ऋषींकडून सांगितले जाते. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू न देण्याचा बेत आखते. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचा जीव वाचतो.म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.
या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’.
जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
धनामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजा करतात. येथे `धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नि, सूर्य, यांना धनचं म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे (पैशामुळे) अनर्थ घडतो. तसेच या दिवशी लोकं सोने देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक उन्नती होते असा समज आहे. जर कुणी सोने खरेदी नाही करू शकले तर ते कुठलीही एखादी वस्तू या दिवशी खरेदी करता.
आश्विन महिन्यातील शेवटचे तीन दिवस आणि कार्तिक महिन्यातील पहिले दोन दिवस असा पाच दिवसांचा दिवाळीचा उत्सव असतो. शरद ऋतूच्या मध्यभागी येणार हा दीपोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. चौदा वर्षांचा वनवास संपवून, श्रीराम अयोध्येत परतले, तेव्हा प्रजाजनांनी अत्यानंदित होऊन दीपोत्सव साजरा केल्याचे सांगितले जाते. आकाश कंदील आणि फराळ हे दिवाळीचे मुख्य आकर्षण व वैशिष्ट्य असल्याचे म्हटले जाते.
नरकचतुर्दशी
आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. यामागील कहाणी अशी आहे की नरकासुर नावाचा असुर मानवांना पीडा देत होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरताना नरकासुराने वर मागितला, की आजच्या तिथीला मंगल स्नान करणार्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने त्याला वर दिला. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची रीत पडली. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते.
चंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा.
'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।' अर्धी आंघोळ झल्यावर आंघोळ करणार्याला औक्षण करावे.
या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा.
दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया। चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।'
हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.
नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे, म्हणजे धर्मस्वरूप अवतरीत होऊन कार्य करण्यासाठी आल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ब्रह्मांडात संचारत असलेल्या धर्मलहरींना पुष्टता प्रदान करून अवतारी कार्यासाठी, म्हणजेच पृथ्वीवर येणार्या त्रासदायक अधोगामी लहरींना नष्ट करण्यासाठी समष्टीच्या इच्छाशक्तीचा पुरवठा करून प्रत्यक्ष स्वरूपात कार्य करण्यासाठी आवाहन करणे. या माध्यमातून स्वतः धर्मकर्तव्य करून ईश्वराच्या कृपाशीर्वादात्मक लहरींना ग्रहण करता येते.
वस्त्रदान करणे, म्हणजे देवतांच्या लहरींना भूतलावर येण्यासाठी दानाच्या स्वरूपात, म्हणजेच धर्माच्या संवर्धनतेच्या माध्यमातून पोषणता प्रदान करून कार्यस्वरूपाच्या जागृतीचे आवाहन करणे. या माध्यमातून आपल्या धनसंचयाला धर्म स्वरूपाच्या कार्यासाठी अर्पण केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होते.
यमदीपदान करणे, म्हणजे लयाच्या ऊर्जात्मक आणि चालनात्मक स्वरूपात होणार्या युद्धात स्वतःच्या रक्षणासाठी मृत्यूची देवता यम याला त्याचा भाग देऊन अपमृत्यूपासून स्वतःचे रक्षण करणे. या माध्यमातून धर्माला त्याचा हविर्भाग देऊन तृप्त करून आपले समष्टी कर्तव्य करता येते.
कालाय तस्मै नमः’ या कालमहात्म्याचे वर्णन करून कालाच्या माध्यमातून कार्यरत होणार्या स्थिरात्मक आणि पुरुषदर्शकात्मक क्रियाशक्तीच्या एका भागाची पूजा करून त्याचे संवर्धन करणे, म्हणजेच कार्यदर्शक स्वरूपात्मकता प्रदान करणे. या माध्यमातून कालमहिमा चित्तावर बिंबवून त्याप्रमाणे आचरण करून उच्च स्तराची अवस्था प्राप्त करून धर्म आचरता येतो.
समष्टीला त्रास देणार्या अधोगामी लहरींच्या निर्दालनासाठी जागृत झालेल्या ईश्वराच्या मारक स्वरूपाच्या सगुणतेला पूजेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ईश्वराच्या प्रत्येक कृतीत आपुलकी निर्माण होऊन भाववृद्धी होऊन ईश्वराशी एकरूपता गाठण्याच्या दिशेला वाटचाल होते.
लक्ष्मीपूजन
अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.
संध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा.
दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वहयांची पुजाअर्चना करून त्यांचा वापर करण्यास सुरूवात करतात. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पुजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते.
घरातील दागदागीने तिजोरीतुन बाहेर काढुन ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात.
या तीन दिवसांची माहिती या भागात पाहिली पुढच्या भागात पाडवा अन भाऊबीज याबद्दल माहिती अन माझ्या दिवाळी या सणाच्या आठवणी सांगणार आहे.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा




चांगली माहिती देण्याचा स्तुत्य उपक्रम.
ReplyDelete