मसाल्याचा मसला भाग ४

 



धन्यवाद मित्र मैत्रिणीनो आज या निमित्तानी मला माझी ओळख महत्व आणि फायदे तुम्हाला सांगता येतील. असे हळद आदराने सर्वाना नमस्कार करत म्हणाली. 

हळद, हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्या परिचयाची आहे.  हळदीला आयुर्वेदात प्राचीन काळापासून हळदीला अमृततुल्य औषधी मानण्यात आले आहे.  हळद भारतीय वनस्पति आहे. ही आल्याच्या प्रजातिची असून, ५-६ फुट वाढणारा रोप आहे. याच्या मूळ्यांच्या गाठीत हळद मिळते.

प्राचीन काळापासून हळदीचा वापर भारतीय लोक जेवणात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हिंदूंच्या धार्मिक विधीत हळद अत्यंत महत्त्वाची आहे. हळदीमुळे जेवण स्‍वादिष्‍ट तर बनतेच त्‍याशिवाय आरोग्‍यासाठीही ते लाभदायक असते. सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे.

 भारतामध्ये हळदीची लागवड मुख्यत्वेकरून आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू , ओडिशा, बिहार, महाराष्ट्र, आसाम व केरळ या राज्यांत होते. तसेच पश्चिम बंगाल, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांतही थोड्याफार प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. बाजारात मिळणारी ‘हळद पूड’ किंवा ‘हळकुंड’ ज्यापासून काढतात ती ओषधी मूळची इंडोमलाया व चीनमधील असून उष्ण प्रदेशांत सर्वत्र लागवडीत आहे. भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे जम्मू काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ शकते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे.

 तिचे सुकविलेले मूलक्षोड (हळकुंडे) दळून ‘हळद पूड’ बनवितात.ती पिवळी, सुवासिक, स्तंभक, शक्तिवर्धक व रक्तशुद्धीकर असते. ती जखमेवर व अवयव मुरगळल्यावर लावतात. ताजा रस कृमिघ्न असून त्वचा विकारावर लावतात पूर्वी ती छपाई व कापड रंगविण्यास वापरीत. टेरामायसिनाच्या उत्पादनात हळद वापरतात.

भारतात हळदीच्या पुष्कळ जाती आहेत, त्यापैकीच काही जातींची माहिती सांगत आहे.

 एका जातीची हळकुंडे कठीण व भडक पिवळ्या रंगाची असून तिचा रंगासाठी उपयोग करतात. ती ‘लोखंडी हळद’ म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते. 

दुसऱ्या जातीची हळकुंडे जरा मोठी, कमी कठीण व सौम्यपिवळ्या रंगाची असतात. त्यांचा उपयोग मुख्यतः मसाल्याचा पदार्थ म्हणून होतो. 

तिसरी जाती रानहळद (कु. ॲरोमॅटिका) असून भारतातती जंगली अवस्थेत वाढताना आढळते. तिची पश्चिम बंगाल व दक्षिण–मध्य केरळमध्ये लागवडही करतात. तिची हळकुंडे फिकट पिवळी, तर गाभ्यात नारिंगी तांबूस रंगाची असतात. त्यांना कापरासारखा वास असून त्यांचा औषधी म्हणून उपयोग करतात. मार लागलेल्या आणि लचकलेल्या अवयवांना तिचा लेप लावतात. 

चौथी जाती आंबेहळद (कु. आमडा) असून तिच्या हळकुंडांना आंब्याच्या कैरीसारखा वास असतो. पश्चिम बंगाल, तमिळनाडू व कोकण या ठिकाणी जंगलीअवस्थेत ती आढळते. तिची लागवड साधारणतः मे-जूनमध्ये करतात, तर ऑक्टोबर – जानेवारीमध्ये पीक काढतात. दर हेक्टरला साधारण १०,०००–१२,००० किग्रॅ. ओली हळद मिळते.

 पाचवी जाती पूर्व भारतीय हळद (कु. अंगुस्तीफोलिया) असून तिची हळकुंडे बारीक व पांढरट रंगाची असतात. याशिवाय दक्षिण भारतात ‘मद्रासी मांजाळ’ जातीची हळकुंडे रंगाच्या पक्केपणासाठी प्रसिद्ध आहेत. ह्या जातीचा रंग इतर जातींच्या मानाने अधिक पक्का असतो. मलबारी हळकुंडे आकाराने गोलाकार व सर्वांत मोठी म्हणून प्रसिद्ध आहेत. 

ओडिशामध्ये ‘गौतम’ जातीचे उत्पन्न भरपूर येते. कर्नाटकमध्ये ‘मुंदगा’, ‘बालगा’ व’ येलछगा’ या जाती प्रसिद्ध आहेत. यांपैकी ‘येलछगा’ जातीची हळकुंडे लहान व उत्पन्नाला कमी असल्याने तिची लागवड घटत आहे. महाराष्ट्रात कृष्णा, राजापुरी, वयगाव या स्थानिक जातींची लागवड करतात. डोंगराळ भागातील हळदीचा दर्जा सपाट प्रदेशातील हळदीपेक्षा चांगला असतो.

खाण्याची हळद (Curcuma Longa ) :ही बहुवर्षीय जात असून ६० ते ९० सें.मी. उंच वाढते. पानांना खमंग वास असून फळे तीनधारी असतात. बोंड, कंद आखूड व जाड असतो. पातळ पाने ६० ते ९० सें.मी. लांब असून कंदापासून ६ ते १० पोपटी हिरव्या रंगाची पाने वाढतात. फुले पिवळसर पांढरी असतात, मात्र लागवडीच्या पिकात फळे धरत नाहीत, कारण ती नपुंसक असतात. या जातीची ९६% लागवड भारतात होते.

कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia) : ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे (आत नारिंगी लाल) असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या (हळकुंडास) गोड वास असतो. ६.१% हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाने लांब - वर्तुळाकर व आल्यासारखी टोकदार, मध्यशीरा उठावदार असतात, फुले सुवासिक, औषधासाठी उपयोग.

आंबेहळद (Curcuma Amada) : कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात. बहुवर्षायु जात असून पाने लांब वर्तुळाकार, आल्यासारखी व पानांचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट - पांढरी असून बोंड तीनधारी असते. औषधी उपयोग : कातडी मऊ होण्यासाठी अंगाला चोळतात. मुरगळल्यावर व सुजेवर उगाळून लावतात. चामडीची खाज घालविते. थंड, पाचक व रक्तशुद्धीकरता, जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे.


हळदीमध्ये लिपोपोलीसॅचिरिड चे घटक आहेत. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. यामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होतो. हळदीमुळे एखादी जखम देखील लवकर भरते. हळदीचे पाणी प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून देखील आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. हळदीतील पोषण तत्त्वांमुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते.

हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडेंट, अँटी- ट्यूमर, अँटी सेप्टिक, अँटी वायरल, कार्डियो प्रोटेक्टिव आणि किडनीसाठी पोषक असणारे औषधी गुणधर्म आहेत. तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हळदीचे पाणी प्या. वजन घटण्यास नक्कीच मदत होईल. वजन वाढीमुळे हृदय रोग, स्ट्रोक आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढत राहतो. पण योग्य प्रमाणात हळदीचे पाणी प्यायल्यास पोट आणि ओटी पोटावरील चरबी कमी होईल. यामध्ये असणाऱ्या कर्क्युमिन घटकामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.

 चिंता, ताणतणावाची समस्या कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये अँटी एंग्झायटीचे गुण आहेत. ज्यामुळे शारीरिक तसंच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते. तसंच यातील अँटी-ऑक्सिडेंटचे गुणधर्म नैराश्य कमी करण्यास मदत करतात.

आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे.

हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे.

पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून प्यावे.

डोळ्याचे विकारावर हळकुंड तुरीच्या डाळीत शिजवून डोळ्यात अंजन करावे.

डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.

महत्त्व : धार्मिक कार्यक्रमात तसेच हळदीपासूनचे कुंकू, हळद, लग्नकार्य, पूजा, भंडारा, सौंदर्य प्रसाधने व अनेक पोषक घटक तयार करतात.

काही महिलांना मासिक पाळीमध्ये प्रचंड त्रास होतो. मासिक पाळीत ओटी पोट, पाठ आणि पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचे पाणी किंवा हळदीचे दूध पिऊ शकता.

 उपाय करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला पित्त किंवा मूतखड्याचा त्रास असल्यास हा उपाय करू नये. यामुळे समस्या अधिक गंभीर होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी देखील हा उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण कर्क्युमिनमुळे रक्तातील शर्करा अतिशय कमी होते. हळदीमुळे शरीरातील लोह देखील शोषून घेतले जाते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता असेल तर हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे.

नितळ, चमकदार त्वचेसाठी आपण काय नाही करत? बाजारातील विविध महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. पण सौंदर्याचे काही उपाय आपल्याला स्वयंपाकघरात सापडतात. त्यातील एक परिणामकारक उपाय म्हणजे हळद. बहुगुणी हळद आरोग्यदायी असण्याबरोबरच सौंदर्यवर्धकही आहे. हळद त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. विविध पदार्थांमध्ये हळद मिक्स करुन बनवलेले पॅक त्वचेसाठी उत्तम ठरतात. तर पाहुया त्वचा नितळ, सुंदर करण्यासाठी हळद कशी वापरावी...

हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. 

१. बेसन आणि हळद एकत्र करुन तुम्ही त्याचा स्क्रबप्रमाणे वापर करु शकता. त्यामुळे त्वचा उजळ आणि मुलायम होईल.

२. लिंबाच्या रसात ब्लिचिंगचे गुणधर्म असतात. तर हळदीमुळे त्वचा उजळते. त्यामुळे हळदीत लिंबाचा रस मिक्स करुन त्वचेवर लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊन त्वचेचा पोत सुधारेल.

 ३. हळदीत दूध घालून चेहऱ्यावर लावल्यास फ्री रेडिकल्स कमी होतात. त्यासाठी हळदीत कच्चे दूध घालून मिश्रण बनवा आणि ते चेहऱ्यावर, मानेवर लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. नंतर त्वचेत झालेला बदल स्वतः अनुभवा.

४. हळदीत थोडी मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्वचा हेल्दी, कोमल आणि उजळ होईल.

५. हळदीत आणि खोबरेल तेलात अंटी फंगल गुणधर्म असतात. त्याचबरोबर खोबरेल तेल मॉश्चराईजिंगचेही काम करते. हळद आणि खोबरेल तेल एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

ऑलिव्ह आईलमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची लवचिकता टिकून राहते. त्याचबरोबर त्वचा मऊ मुलायम होते.

७. हळदीत लिंबाचा रस, मध मिक्स करुन लावल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. त्यासाठी चमचाभर हळद, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.


तर मित्र-मैत्रिणीनो कशी वाटली माझी माहिती आता पुढच्या भागात पाहू धणे याची माहिती. 

 

मसाल्याचा मसला भाग ३

 


मी जीर मिसळण्याच्या डब्ब्यातला महत्वाचा घटक; न विसरता मला त्या डब्यात भरले जाते. माझा खास दोस्त धणे आहे. आम्हाला दोघांना एकत्र राहायला खूप आवडत. भारतीय पाक संस्कृतीतील महत्व पूर्ण आणि चवीत भर टाकणारा पदार्थ म्हणजेच मी जीर !!!!!!

माझ्या असण्याने जीरा राईस, फोडणीचे वरण, सूप, रायता आणि इतर अश्या पुष्कळ पदार्थांना एक लज्जतदार   चव येते. आता पाहूया माझे महत्व आणि फायदे.

जिर्याचा शोध ४००० साला पूर्वी सिरीया आणि पूर्व इजिप्त मधील संशोधनात झाला. त्याकाळी याचा वापर मसाला व माम्मिज्च संवर्धन करण्यासाठी केला जायचा. बायबल मध्ये त्याचा उल्लेख आढळतो. जीर हे भारत रोमन आणि ग्रीक संस्कृतीतील महत्वाचा भाग होत. युरोपियन कोलोनाय्झेषन नंतर जीर हे मक्सिकन व दक्षिण अमेरिकन खाद्य संस्कृती मध्ये शामिल झाले.  भारतात  बंगाल व आसाम यांखेरीज इतर राज्यांत (विशेषत: उ. प्रदेश व पंजाब येथे) बरीच लागवड करतात. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांत व्यापारी स्तरावर तिची लागवड होते. अमेरिकेत स्पेन व पोर्तुगीज वसाहतवादयांनी ही वनस्पती नेली. उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, टर्की, मोरोक्को, ईजिप्त, भारत, सिरिया, मेक्सिको, चिली व चीन या देशांत जिऱ्याचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते

नामकरण "जीरा" संस्कृत भाषे च्या "जीरक" या शब्दा ने आला आहे अर्थात जे पचनक्रिया मध्ये सहायक असतात. इंग्रजी मध्ये "क्युमिन" शब्दाची उत्पत्ति पुरातन इंग्रेज़ी च्या शब्दांवरून सायमैन किंवा लैटिन भाषे चे शब्द क्युमिनम, या शब्दा वरुन आले आहे. 



जिऱ्याचे झुडूप ३०-५० सेंमी. उंच वाढते. खोड सडपातळ असून त्याला अनेक फांदया असतात. फांदयावर धाग्यांसारखी पाने असतात. पाने हिरवी, एकाआड एक व नाजूक असतात. फुले छत्रीसारख्या फुलोऱ्यात येतात. ती लहान असून पांढरी किंवा गुलाबी असतात. फळ टोकदार, लहान व शुष्क असते. ते अर्धस्फुटनशील असून तडकल्यावर त्याचे दोन भाग होतात. प्रत्येक भागावर नऊ उभ्या रेषा व खोबणी असतात. खोबण्यत तेलनलिका असून त्यात बाष्पनशील तसेच स्थिर तेल असते. फळांत एक बी असते. बी बडिशेपेसारखी दिसते. फळे काहीशी कडवट व स्वादयुक्त असतात.

वर्षायू वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्युमीनम सायमिनम आहे. गाजर, कोथिंबीर, ब्राह्मी, बडीशेप या वनस्पतीही एपिएसी कुलातील आहेत. जिऱ्याची लागवड सुवासिक फळांकरिता (बिया) करतात. याच्या फळांनाही सामान्यपणे जिरे म्हणतात. ही वनस्पती मूळची भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश व भारतातील असून अनेक देशांत लागवडीखाली आहे. जिऱ्याची लागवड मसाल्याचे पदार्थ म्हणून केली जाते.

काळे जिरे वायुनाशी, उत्तेजक, मूत्रल, आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारे) असून स्त्रियांना दूध येण्यात मदत करते प्रसूती ज्वरावर देतात बियांचे चूर्ण तिळाच्या तेलातून पुरळ व तत्सम चर्मरोग यांवर लावण्यास उपयुक्त असते, जास्त प्रमाणात बिया गर्भपातक असतात त्यांचे चूर्ण विंचवाच्या दंशावर लावतात. कपड्यांत बिया ठेवल्यास किडीपासून ते सुरक्षित राहतात. बिया मसाल्यात वापरतात .

जीर अत्यंत गुणकारी आहे. एक ग्रम जिरेपूड व दोन ग्रम साखर वरचेवर खाल्यालास आव पडणे थांबते.

भूक लागत नसल्यास,ओकारी होत असल्यास रुग्ण्यास जिरे खाण्यास द्यावे. ओकारी थांबते, भूकही चांगली लागते. अंगाला खाज सुटत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जिरे उन पाण्याबरोबर खावे, खाज त्वरित थांबते.

लहान मुलांना बहुधा जंतचा त्रास होतो,अशा मुलांना एक ग्रम जिरेयाची पूड, एक ग्रम वाव डिंगाची पूड व दोन ग्रम गूळ घालून गोळ्या करून दिल्या असता जंत मरतात व मुलांना प्रकती सुधारते.

पित्ताचा प्रकोप होऊन आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.

जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.

जिऱ्यामध्ये anti-oxidants ची मात्रा खप असते. आयर्न,कॉपर, फायबर, म्यान्गानिज, काल्शियाम भरपूर प्रमाणात असते, आयर्न जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं. ज्यामुळे मासिक पाळीचं चक्रही सुरळीत राहतं. ॲनिमियाची समस्या दूर राहते.जिरे नैसर्गिकरित्या लोह समृद्ध असतात.

जिरे हे त्वचेसाठी  आणि केसांसाठी हि उपयुक्त असते.

असा मी एक असामी आहे. मसाल्यातला महत्वाचा घटक. 

उद्या पाहूया हळदीचे महत्व आणि फायदे.


मसाल्याचा मसला भाग २

  



मी राई; मला मोहोरी म्हणून सुद्धा ओळखतात. माझ्या शिवाय मिसळण्याचा डब्बा अपूर्णच असतो. जसा फोडणीत हिंगाचा स्वाद लागतोच तसाच माझाही स्वाद खास आहे. पाहूया माझी माहिती आणि फायदे.

मसाल्याच्या डब्यातला रोजच्या फोडणीतला अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मोहरी किंवा राई . ही खरं तर पालेभाजी असून ती हिंदीत सरसों या नावाने ओळखली जाते. पंजाबी लोकांमध्ये मक्याच्या  भाकरी बरोबर ही भाजी आवडीने खाल्ली जाते. या पालेभाजीला ज्या छोट्या बिया असतात त्यांना मोहरी किंवा राई असं म्हटलं जातं. पांढरी (Brassica alba), पिवळी (Brassica campestris), तेलाची (Brassica napus), भाजीची (Brassica juncea) आणि काळी (Brassica nigra)मोहरी अशा मोहरीच्या ब-याच जाती आहेत. मोहरीची सर्वत्र लागवड होते. भारतात पंजाब, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड होते.

महाराष्ट्रात मिळणारी मोहरी भुरकट, आकाराने लहान तर पंजाब आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी मिळणारी मोहरी तांबूस, काळपट आणि आकाराने मोठी असते. मोहरीची पानं-फुलं आणि बियांचा उपयोग केला जातो. फोडणीत वापर केला जात असल्याने प्रत्येक घरात मोहरी असतेच. मोहरीचा गुणधर्म उष्ण असल्याने कित्येक आजारांवर ती गुणकारी ठरते.

मोहरीपासून तेलसुद्धा काढतात. विशेषत: उत्तर भारतात स्वयंपाकात मोहरीचे तेल वापरतात व ते तेल अंगाला-डोक्याला लावतात. मोहरीची लागवड भारतात सर्वत्र होते. मोहरीची अन्य नावे : राई, प्रियंगु/प्रियंगू. सुंदर स्रियांच्या स्पर्शाने प्रियंगु (पिंपळी) बहरतो, असा कविसंकेत आहे.

 भारतात लागवडीत आहेत : (१) मोहरी (राई), (२) सरसू (अथवा सरसव अथवा शिरस), (३) तोरिया (आथवा सरस) व (४) काळी मोहरी. सरसूमध्ये पिवळी व तपकिरी असे प्रमुख प्रकार लागवडीत आहेत. यांपैकी मोहरी, सरसू व तोरिया या पिकांची लागवड उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्यांच्या बियांपासून खाण्यासाठी त्या भागात मोठ्या प्रमाणावर वापरात असलेले स्थिर तेल काढण्यात येते व ते बाजारात ‘सरसोंका तेल’ अथवा ‘कडुआ तेल’ या नावाने ओळखले जाते. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, प. बंगाल आणि आसाम या राज्यांतील जवळजवळ निम्म्या लोकांची तेलाची गरज वरील तीन पिके भागवितात. काळी मोहरी (हिं. बनारसी राई) उ. प्रदेश, पंजाब आणि द. भारतात मर्यादित प्रमाणावर लागवडीत आहे. तिचा खाद्य तेलाच्या उत्पादनासाठी उपयोग केला जात नाही. अन्नपदार्थांत मसाल्यासाठी व फोडणीसाठी बियांचा वापर केला जातो व त्यांपासून काढण्यात येणारे बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल औषधी उद्योगात महत्त्वाचे आहे. या सर्व वनस्पती क्रुसीफेरी (ब्रॅसिकेसी) कुलातील व ब्रॅसिका प्रजातीतील आहेत. प्रस्तुत नोंदीचे शीर्षक ‘मोहरी’ हे मोहरी व वर उल्लेख केलेल्या तत्सम पिकांसाठी आहे.

ब्रॅसिका प्रजातीतील तैलोत्पादक जाती मूळच्या समशीतोष्ण कटिबंधातील असून त्यांची उष्ण व उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांत हिवाळी हंगामात लागवड केली जाते. मोहरी व तत्सम पिकांच्या प्राचीनत्त्वाबद्दल दुमत नाही परंतु त्यांच्या उगमस्थानाविषयी मात्र निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांचा औषधासाठी उपयोग फार प्राचीन काळापासून माहीत असावा असे दिसते. ग्रीक व रोमन लोक मोहरीचा वापर औषधासाठी व स्वयंपाकात मसाला किंवा तोंडी लावण्यासाठी करीत. आयुर्वेदातील (चरक, सुश्रुत इ.) संहिता व निघंटूमध्ये सरसूचे वर्णन आहे.


आयुर्वेदानुसार मोहरी तेलकट असून कोरडा, कडू, तिखट, कफवातनाशक, पित्तवर्धक, वेदना दूर करणारे, गर्भाशय व हृदय यांना उत्तेजना देणारे तसंच कृमिनाशक असते.

मोहरीच्या तेलात मीठ टाकून दररोज दात घासल्याने दात चमकदार होतात आणि प्रयोग नियमित केल्यास दात खराब होत नाहीत.

कापूरमिश्रित मोहरी तेल केसांना लावल्याने केस अकाली पांढरे होत नाहीत, तसंच ते घनदाट होतात. रोज मालीश केल्याने डोकं शांत राहतं आणि झोपही चांगली लागते.

ऐकण्याची शक्ती क्षीण असलेल्यांनी दिवसातून ४-६ वेळा दोन्ही कानांमध्ये मोहरीच्या तेलाचे एक किंवा दोन थेंब घालावेत. ऐकण्याची क्षमता सुधारते.

टॉन्सिल्स किंवा गळ्याच्या आजारावर मोहरीचा काढा घेतला जातो.

दातदुखीवर मोहरीच्या काढ्याच्या गुळण्या कराव्यात.

शरीरावर आलेला एखादा फोड पिकत नसेल तर मोहरीचं चूर्ण तयार करून त्याचा लेप त्यावर लावल्याने लवकर आराम पडतो 

मोहरी उष्ण असल्याने वाताचं शमन करते, म्हणून संधीवातावर मोहरीचं तेल अत्यंत गुणकारी असतं.

लकवा, कंबरदुखी, चिकनगुनिया यांसारख्या आजारांत रुग्णांच्या हातापायांना मोहरीच्या तेलाने मालीश करावं.

कुष्ठरोग झाला असल्यास, अंगाला खाज येत असल्यास किंवा घाम येत नसेल तर मोहरीचं तेल लावावं.

बाळंतिणीलाही मोहरीच्या तेलाने मालीश करतात.

थंडीच्या दिवसांत लहान मुलांचं झोपण्यापूर्वी मालीश करावं. जेणेकरून शरीरात ऊब निर्माण होऊन सांधे आणि हाडं मजबूत होतात.

दररोज फोडणीत लहानसा चमचा मोहरीचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारून पोटाचे विकार दूर होतात.

काही जण आपल्या स्वयंपाकामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करतात. हे तेल केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांच्या देखभालीसाठीही पोषक आहे. जर तुमचा चेहरा निस्तेज किंवा कोरडा दिसत असेल, तर हे तेल त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरू शकते. त्याच प्रमाणे सुंदर, काळेशार, घनदाट आणि मजबूत केस हवे असल्यास या तेलाचा वापर करू शकता.

अशी मी सगळ्यांची आवडती राई. 

पुढच्या भागात आपले महत्व आणि फायदे सांगण्यासाठी जीर सज्ज आहेच.



मसाल्याचा मसला

 


एकदा दुपारी डोळा लागला. स्वयंपाक घरातुन हळूहळू कुजबुज ऐकू येऊ लागली.; कळेच ना हा काय आवाज  आहे. मग मी गपचूप उठले अन कानोसा घेऊ लागले पण नीटसं काही ऐकू येईना; थोडी पुढे गेल्यावर समजलं शेल्फ वरच्या मसाल्याच्या बाटल्यामधून आवाज ऐकू येत होते. प्रत्येक मसाला आपापल्या परीने आपण कसें महत्वाचे आहोत हे सांगत होते. 

हिंग म्हणे माझे फायदे अनेक आहेत..मोहरी जिरं लगेच स्वतःचे महत्व पटवून देत होते. ते पाहिल्यावर हळद - तिखटाच्या अंगात संचारलेच चुरचुरू बोलू लागले. तुम्ही तर आहेतच पण आम्हीपण काही कमी नाही. कोणीच थांबत नव्हते. हे पाहून धने म्हणाले थांबा थांबा आपण यावर तोडगा काढू. प्रत्येकाला वेळ देऊ अन प्रत्येकाचे महत्व ऐकू. हे ऐकताच काळीमिरी, लवंग, दालचिनी, बडीशेप, चक्रीफुल, जायपत्री, मायपत्री, दगडीफुल, मोठी वेलची, छोटी वेलची, शहाजीर, ओवा सगळेच पुढे आले. तीळ आणि खसखस पण धडपडत पोहोचल्या.

अहो हे बघता आश्चर्य वाटले आणि कुतूहलाने मी सगळं नीट ऐकू लागले. प्रत्येकाला पाच मिनिटं मिळतील स्वतःचे महत्त्व, उगमस्थान, फायदे हे सगळं सांगण्यासाठी; धणेनी असे म्हंटल्यावर आता कोण पहिलं बोलणार?? हिंग म्हणाले माझाच नंबर पहिला हवा कारण मीच सगळ्यात आधी फोडणीत घातला जातो. सगळ्यांचे एकमत झाले आणि आता हिंग खुशीत पुढे आणि आपले महत्व सगळ्यांना सांगू लागले.


नमस्कार मी हिंग सांगू इच्छितो माझी माहिती आणि फायदे 

फे. फेटिडा, फे. ॲलियासिया, फे. नार्थेक्स, फे. फेटिडिस्सिमा, फे. ॲसाफेटिडा इ. या वनस्पती पासून  हिंग हा पदार्थ मिळतो. लॅटिन शब्द फेरूला म्हणजे वाहक आणि ॲसाफेटिडा यामधील ॲसा म्हणजे चीक (क्षीर) व फेटिडा म्हणजे उग्र वास होय. रंगावरून हिंगाचे प्रमुखदोन प्रकार पडतात : (१) काबुली सफेद हिंग व (२) लाल हिंग.

आपण भारतीय आणि काही मोजकेच देश जेवणात हिंग वापरतो. युरोपियन आणि अमेरिकन लोकांना हिंगाचा वास उग्र वाटतो तसेच भारतातही ईशान्य-पूर्व राज्यात पण जेवणात हिंग वापरत नाहीत. १६ व्या शतकात मुघलांनी हिंग आपल्या कडे आणून स्वयंपाकात रुजवला असे म्हणतात. पण आपल्या आयुर्वेदात हिंगाचा औषध म्हणून वापर केला जातो. प्राचीन संस्कृत संहितांवरून लक्षात येते की, हिंग भारतात फार पूर्वीपासून वापरात असावा. हिंगाचा तीव्र वास इतर वासांना दडपून टाकतो म्हणून संस्कृतमध्ये त्याला हिंगू असे म्हणतात. 



रोजच्या आहारात लागणारे हिंग आपल्या भारतात एक ग्रॅमही पिकत नाही. आपली कोणतीच फोडणी हिंगा शिवाय पूर्ण होत नाही. हजारो वर्षे आपल्या कडे हिंग अफगाणिस्तान, इराण आणि उबेकिस्तान या देशातून मागवतो. जगात पिकणाऱ्या एकूण हिंगा पैकी ४ ग्रॅमच हिंग आपणच वापरतो.

सध्या बाजारात हिंग म्हणून जी पावडर मिळते ती म्हणजे गव्हाच्या पिठात मिसळलेला ७०:३० हिंग असतो. हिंग हा झाडाच्या खोडातून पाझरणारा एक प्रकारचा डिंक आहे. त्यात गन्धकाचे प्रमाण अधिक असल्याने तो खास गंध त्या डिंकाला येतो. खलबत्यात कुटून तो इतर पिठात मिसळून वापरला जातो.

 या पिकाची लागवड कशी करावी याबद्दल आपल्या कडे शास्त्रशुद्ध माहिती नव्हती त्यामुळे आपल्याकडे पीक येत नव्हते पण २०१६ पासून CSIK सेंटर ऑफ सैंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चची एक शाखा इन्स्टिट्यूट ऑफ हिमालियन बायो रिसर्च टेक्नॉलॉजी हिंग तयार करण्याचा प्रयत्न करत होते.

 गेल्या ३० वर्षात हिंगाचे बीज कोणीही आणले नाही. भारतात एसाफोटीडा फेरूला ही रोपे नाहीत. हिंगाची रोपे उगवली की काही दिवसातच जमिनीत गडप होतात. नंतर कालांतराने ती परत जमिनीवर येतात. या रोपांची वाढ फक्त बर्फामुळे हवेत जे बाष्प तयार होते त्यावरच होते. इतर पिकांच्या सारखे त्याला पाणी देता येत नाही. रासायनिक खतांचा वापर करता येत नाही.

 फे. फेटिडा ही १.५–२ मी. उंचीची ओषधी वनस्पती मूळची इराण व अफगाणिस्तानातील आहे. हिची व इतर जातींची सामान्य शारीरिक लक्षणे अंबेलिफेरी कुलातील इतर वनस्पतींप्रमाणे (शेपू, कोथिंबीर, गाजर इ.) आहेत.  हिची पाने सु. ४५ सेंमी. लांब, संयुक्त, फार विभागलेली, तळाशी खोडास वेढणारी, एकाआड एक, मोठी फुलोरा चवरीसारखा फुले लहान, द्विलिंगी, नियमित व पंचभागी नर फुलोरा व फुले हिरवट पिवळसर आणि मादी फुलोरा व फुले हिरवट पांढरी फळे अंडाकृती, सपाट, पातळ व लालसर तपकिरी असून त्यामध्ये दुधी रस असतो. तडकल्यावर त्यांचे दोन फलांश बारीक दांड्यावर काही वेळ लोंबत राहतात. परागण कीटकांमार्फत होते. ही वनस्पती सावलीत वाढत नाही. 

फे. फेटिडा या जातीची जाड लठ्ठ मुळे (१२–१५ सेंमी. व्यास) साधारणपणे चार वर्षांनी हिंगाकरिता योग्य होतात. फुले येण्यापूर्वी मार्च-एप्रिलमध्ये खोड कापून काढल्यावर राहिलेल्या मुळातून दुधी चीक येतो, तो हवेत सुकून घट्ट व राळेसारखा लालसर तपकिरी बनतो आणि पुढेतो काळसर होतो, हाच हिंग होय. सुकलेल्या हिंगामध्ये २५–६०% चीक व ५–३०% फेरूला अम्लाची संमिश्र कार्बोहायड्रेटे असतात. हिंग एकदा काढून घेतल्यानंतर मुळाला जखम करून पुन्हा तो जमा करतात याप्रमाणे तो चीक बाहेर येण्याचे थांबेपर्यंत (सु. ३ महिने) हिंग जमा करतात.  


 हिंग केवळ पदार्थांचा स्वाद वाढत नसून त्याचे अनेक फायदे आहेत. पाहू त्यातून 7 अद्वितीय फायदे:

वरणा-भाजीला हिंगाची फोडणी देण्याने पोटासंबंधी होणार्‍या रोगांची शक्यता कमी होते. पचन कमजोर असल्यास याच्या चूर्णाचे सेवन फायदेशीर ठरेल. पोटात गॅस असल्यास ताकाबरोबर हिंग घेतल्याने आराम पडतो.


 उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरेल. अधिक ढेकर किंवा मळमळ होत असेल तर मॅश केलेल्या केळात चिमूटभर हिंग टाकून सेवन करावे. आराम पडेल.

छातीत कफ जमल्यास हिंगाचे लोशन लावल्याने फायदा होईल. यासाठी पाण्यात हिंग घोळून लेप तयार करावे. हे लावल्याने कफ विरघळून बाहेर पडेल.

 मेमरी कमजोर झाल्यावर 10 ग्राम शेकलेल्या हिंगाला पादरं मीठ आणि 80 ग्राम बाय-बडंगसह दळून दररोज थोड्या मात्रेत पाण्यासोबत सेवन करावे.

 जर आपल्या कमी ऐकायला येत असेल तर बकरीच्या दुधात हिंग घासून कानात 2 थेंब टाका आणि कापसाचा गोळा लावून झोपून जा. सकाळी उठून कान स्वच्छ करा. काही दिवस ही प्रक्रिया केल्याने स्पष्ट ऐकायला येईल.

टाचांना भेगा पडत असल्यास, कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावावे.

 भारतीय जेवणात स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी हिंगाची फोडणी दिले जाते. हिंगाचा सुवास तेज आणि जेवण्याची इच्छा जागृत करणारा असतो. आयुर्वेदात देखील याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. आपण दररोज चिमूटभर हिंग वापराल तर अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकेल. हिंग पोट, लिव्हर आणि डोळ्यासाठी फायदेशीर ठरतं. जाणून घ्या रोज हिंगाचे सेवन केल्याने आरोग्यावर काय प्रभाव पडेल.

हिंग पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज हिंगाचे सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या जसे अपचन, गॅस सारख्या समस्या दूर होतात. याने पोटात गॅस, पोटातील किडे, मरोड आणि पोटासंबंधी सर्व वेदनांपासून मुक्ती मिळते.

हिंगात रक्त पातळ करण्याचे गुण असतात. म्हणून हे ब्लड प्रेशरच्या आजाराने त्रस्त लोकांसाठी फायदेशीर आहे. याने नसांमध्ये बल्ड क्लॉटिंग सारखी समस्या होत नाही ज्याने ब्लड प्रेशर अनियंत्रित होण्यापासून मुक्ती मिळते.

दमा, जुनाट खोकला, दातदुखी, डांग्या खोकला, अपचन व काही मेंदूच्या विकारांवर हिंग गुणकारी आहे. तसेच तो उत्तेजक, वायुसारक व आचके बंद करणारा आहे. हिंगामध्ये असणाऱ्या कुमारीन या रसायना-मुळे रक्त पातळ होते. तसेच तो पशुवैद्यकातही उपयुक्त आहे. अत्तरे व सौंदर्यप्रसाधनांतही त्याचा वापर केला जातो. यूरोप व अमेरिकेत स्वादा-करिता व सुगंधी द्रव्यांत तो वापरतात. हिंग आतड्यांतील हानीकारक सूक्ष्मजंतूंची वाढ रोखतो. इन्फ्ल्यूएंझा व स्वाइन फ्ल्यू  यांसारख्या रोगात हिंग नैसर्गिक विषाणुप्रतिरोधी औषध म्हणून काम करतो. तंत्रिका तंत्रात तो आकडीरोधक म्हणून देखील काम करतो, तसेच नियमित सेवनाने हिवतापासारख्या रोगाचा प्रतिरोध करता येतो. आयुर्वेदा त वात व कफाचे संतुलन ठेवण्यासाठी तसेच वातदोषासाठी हिंग अत्युत्तम औषध असल्याचे सांगितले आहे.  

असा मी मसाल्याच्या डब्ब्यातला आणि प्रथम फोडणीत वापरला जाणारा बहुगुणी हिंग.

आता दुसरा नंबर मोहोरीने लावला; उद्या पाहू त्याची माहिती आणि महत्व.


 


कोजागिरी पौर्णिमा

 




कोजागिरी पोर्णिमा म्हंटली कि आठवत ते बदाम-पिस्ता केशर युक्त मसाले दुध, भेळ किंवा बटाटे वड्यांचा बेत, गच्चीवर रंगलेल्या गप्पा, गाण्यांच्या भेंड्या आणि संगीत खुर्चीची चुरस. 

आमच्या लहानपणी म्हणजे माझ्या आठवणी प्रमाणे मी साधारण दहा-अकरा वर्षाची असेन; कोजगिरिच्या आदल्या दिवशी पासून सगळ्यान कडून वर्गणी गोळा करणे हे काम आमच्याकडे सोपवून आमच्यापेक्षा वयानी थोडे मोठे असलेले दादा-ताई बाकी तयारीला लागायचे. कधी गच्चीत तर कधी समोरच्या मैदानात सगळी व्यवस्था केली जायची. सात वाजले कि आम्ही सगळे एकत्र जमून रेकोर्ड प्लेयर सेट करायचो. खुर्च्या मांडून  किंवा सतरंज्या अंथरून तयार झाले कि बिल्डींग मधल्या काकू आणि मावश्या भेळेची तयारी मांडायच्या, मसाले दुध आणून ठेवायच्या. त्यांच्यात ठरलेले असायचे कोण काय करणार त्या प्रमाणे एकमेकींच्या घरी जाऊन तशी तयारी आणि मदत केली जायची. जशी रात्र पुढे सरकायची तशी गाण्यांच्या भेंड्याना सुरवात होत असे. मग थोड्या वेळानी गरबांचा फेर धरला जाई आणि संगीत खुर्ची खेळून दमून गेलो कि आम्हा मुलांच्या हातात भेळ किंवा बटाटेवडा; जो बेत असेल त्या प्रमाणे डिश हातात येई. त्यानंतर चंद्राची प्रतिमा दुधात बघण्याचा कार्यक्रम आटपला कि परत फुल जोशात आंम्ही मुल विरुद्ध काकू वर्ग अशी अंताक्षरीची चढाओढ  लागे. कसली गंमत असायची त्यावेळी!!
आत्ता असे कार्यक्रम करण्याचे प्रमाण कमी झाले आहे हे नक्कीच पण पूर्ण पणे बंद हि झाले नाही. अजूनही कित्येक ठिकाणी याच पद्धतीने कोजागिरी साजरी केली जाते. या आठवणी मनात खोलवर रुजून जातात. ते सगळे आठवले कि मन परत अल्लड होऊ पाहते आणि नकळत ओठांवर स्मित हास्य देऊन जाते. 

ह्या झाल्या माझ्या मनातल्या आठवणी आता मी जे वेगवेगळ्या साईट्स वरून माहिती गोळा केली आणि माझ्या हि ज्ञानात भर पडली अश्या काही गोष्टी तुमच्या सोबत शेयर करू इच्छिते. 

अश्विन पौर्णिमेची रात्र कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे हि म्हणतात.     चांगल्या आरोग्यासाठी कोजागिरीच्या रात्री व्रत केले जाते. कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरते आणि को जागती? असा प्रश्न विचारते आणि जो जागा असतो त्याला वैभवप्राप्ती मिळते अशी आख्यायिका आहे.

या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. 

 सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।

परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।

भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।

सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।

नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।

या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।

ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।[९]

या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.

पौराणिककथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ) भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे.

या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.




कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.

निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात.

कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते.

मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते.

हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते.

राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात.

हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.

ओडिशामध्ये, शरद पौर्णिमेला 'कुमार पौर्णिमा' असे म्हणतात.या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात. या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते.

कोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक 'लोख्खी पुजो' असे म्हणतात. या दिवशीच्या लोख्खी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात. नारळात साखर, दुध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केले जातात.

तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंदराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा करतात.

शरद पौर्णिमा अत्यंत श्रेष्ठ तिथी आहे. हा दिवस कोजागरी व्रत या रुपात देखील साजरा केला जातो. हा दिवस अत्यंत शुभ आणि सकारात्मक असून या दिवशी पूजा करुन मोठमोठाले संकट देखील दूर होतात असे मानले गेले आहे. 

 कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाला परमार्थाच्या अंगाने महत्वाचं स्थान आहे.  कारण तिथे तुम्हाला दिव्यत्वाचे स्मरण साधण्याचा अभ्यास करता येतो.  कोजागिरी म्हटली कि सर्वजण दांड्या वैगेरे खेळायला जमतात. चंद्राकडे पाहून तुम्हाला स्वरूप चंद्राचा अभ्यास करता आला पाहिजे.  चंद्रप्रकाशात चंद्राकडे पाहता पाहता, चंद्र आणि तुम्ही, एकरूप होऊन जा.  इथे चंद्रप्रकाशाबरोबर चैतन्याचे स्मरण करता आले पाहिजे.  



!!!!!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!


विजयादशमी - दसरा

 



विजयादशमी – दसरा

नवरात्र हा वर्षातील असा कालखंड आहे जो रंग, परंपरा, गायन आणि नृत्यांनी समृद्ध असतो. जे अध्यात्मिकतेचा शोध घेत आहेत त्यांना ही वेळ धार्मिक दृष्टया पवित्र आणि पूजनीय आहे. हि अशी वेळ आहे की आपण स्वत:ला जीवनातील इंद्रिय संवेदना आणि भौतिक सुखांपासून दूर नेऊन अध्यात्मिक प्रक्रियांमध्ये स्थिर करून अंत:सामर्थ्याचा निर्भेळ आनंदसंतोष आणि अगणित उत्साह जीवनात आणू शकतो आणि हे सर्व आपल्या बाह्य वर्तणुकीतून सहजतेने व्यक्त होऊ शकते, हे होईल जेंव्हा आपल्यामध्ये सत्व गुण वाढेल.

आज विजयादशमी बद्दल माहिती देण्या आधी नवरात्रीत केली जाणारी देवीची उपासना आणि त्या संबंधित संकलित केलेली माहिती लिहित आहे.

देवीशी संबंधित ग्रंथ

दुर्गासप्तशती, देवीपुराण, देवीभागवत हे देवीशी संबंधित ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

देवीशी संबंधित स्तोत्र, अष्टक आणि कवच 

मंगल चंडिकास्तोत्र, श्री दुर्गास्तोत्र, श्री अन्नपूर्णास्तोत्र, श्री शताक्षीदेवीस्तोत्र, श्री लक्ष्मीस्तोत्र, श्री चंडिकवच (देवीकवच), श्री महालक्ष्मी अष्टक, श्री भवानी अष्टक, श्री सूक्त इत्यादी देवीशी संबंधित स्तोत्रे, अष्टक आणि कवच आहेत.

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम् ॥

अर्थ : हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे अन् मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्यावर आधी हाताचे दर्शन घ्यावे.

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

अर्थ : सर्व मंगल गोष्टींमधील मांगल्यस्वरूप, पवित्र, सर्व इच्छा साध्य करून देणार्‍या, सर्वांचे शरणस्थान असलेल्या, त्रिनेत्रधारिणी, हे गौरवर्णी नारायणीदेवी (पार्वती), मी तुला नमस्कार करतो.

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम : ॥

अर्थ : हे देवी, तूच सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने स्थित आहेस. आम्ही तुला पुन:पुन्हा नमन करतो.

सरस्वती गायत्री मंत्र

ॐ वाग्देव्यैच विद्महे । विरिंचिपत्न्यैच धीमहि तन्नो सरस्वती प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही वाग्देवीला (सरस्वतीदेवीला) जाणतो. आम्ही सरस्वतीचे ध्यान करतो. ती सरस्वती आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

ब्रह्माणी गायत्री मंत्र

ॐ देव्यै ब्रह्मण्यै विद्महे । महाशक्त्यै च धीमहि । तन्नो देवी प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही ब्रह्माणीदेवीला जाणतो. (त्या) महाशक्तीचे आम्ही ध्यान करतो. ब्रह्माणी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

लक्ष्मी गायत्री मंत्र

ॐ महालक्ष्मीच विद्महे । विष्णुपत्नीच धीमहि । तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही महालक्ष्मीला जाणतो आणि विष्णुपत्नीचे (महालक्ष्मीचे) ध्यान करतो. ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

दुर्गा गायत्री मंत्र

ॐ गिरिजायै विद्महे । शिवप्रियायै धीमहि । तन्नो दुर्गी: प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही गिरीजेला जाणतो आणि शिवप्रियेचे (दुर्गादेवीचे) ध्यान करतो. ती दुर्गा आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

सीता गायत्री मंत्र

ॐ जनकात्मजायै विद्महे । भूमिपुत्र्यैच धीमहि । तन्नो जानकी प्रचोदयात्।

अर्थ : आम्ही जनककन्या सीतेला जाणतो. आम्ही भूमीपुत्री सीतेचे ध्यान करतो. ती जानकी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

हे सरस्वतीबीज आहे, ‘क्रींआणि क्लींही कालीबीजे आहेत, ‘दूंहे दुर्गाबीज, ‘श्रींहे लक्ष्मीबीज आणि स्त्रींहे धूम्रभैरवीबीज आहे. अशाप्रकारे विविध बीजमंत्र विविध देवींशी संबंधित आहेत.

देवीचे प्रचलित नामजप : 

ॐ श्री दुर्गादेव्यै नम: ।’,  ‘ॐ श्री महालक्ष्मीदेव्यै नम: ।आणि ॐ श्री सरस्वतीदेव्यै नम: ।हे देवींचे नामजप प्रचलित आहेत.

यंत्र : देवीतत्त्व आकृष्ट करून त्यांचे प्रक्षेपण करणारी अनेक यंत्रे उपलब्ध आहेत. यांतील बरीच यंत्रे आद्य शंकराचार्य यांनी सिद्ध केलेली आहेत. नवार्णयंत्र, श्रीयंत्र, श्री महालक्ष्मी यंत्र, श्री सरस्वती यंत्र आणि श्री बगलामुखी यंत्र ही देवीशी संबंधित असणारी काही प्रमुख यंत्रांची नावे आहेत.

संबंधित यज्ञ : चंडीयाग, शतचंडी, नवचंडी, सहस्रचंडी, गायत्रीयाग, सरस्वतीयाग, राजमातंगीयाग, बगलामुखीयाग इत्यादी यज्ञ हे देवीशी संबंधित आहेत.

संबंधित व्रत : मंगळागौरी, जेष्ठागौरी, महालक्ष्मीचे व्रत, वैभवलक्ष्मीचे व्रत आणि सत्यंबा व्रत ही देवीशी संबंधित व्रते आहेत.

संबंधित सण : घटस्थापना, ललितापंचमी, सरस्वतीपूजन, महालक्ष्मीपूजन, दिवाळीतील लक्ष्मीपूजन, तुलसीविवाह हे देवीशी संबंधित सण आहेत.

संबंधित उत्सव : चैत्रातील गौरी उत्सव, पौषातील शाकंभरी नवरात्र आणि शारदीय नवरात्रोत्सव हे देवीशी संबंधित उत्सव आहेत.



गरबा खेळणे म्हणजे टाळयांच्या किंवा बहुधा लाकडी दांड्यांच्या लयबद्ध गजरामध्ये देवीची भक्तिरसपूर्ण गाणी म्हणणे. टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे हा उद्देश असावा. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते, अशी श्रद्धा आहे. टाळ्यांमुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. यामध्ये छिद्र असलेल्या रंगीबेरंगी मातीच्या घड्यात दिवे लावले जातात आणि त्याभोवती गोलाकार नाचण्याची पद्धती अनुभवाला येते.गुजरातेत अशा प्रकारचा उत्सवपरंपरेने साजरा केला जातो. त्याला दांडिया (नृत्य) म्हणतात.


उपवास

शरीर शुद्ध करण्यासाठी केला जातो.विशिष्ट प्रकारच्या अन्नाचा विशिष्ट परिणाम शरीरावर होतो तसेच आपण सेवन केलेल्या अन्नाच्या प्रमाणाचा परिणाम सुद्धा शरीरावर होत असतो. उपवास म्हणजे शरीर शुद्ध करण्यासाठी योग्य प्रमाणात आणि विशिष्ट प्रकारचे अन्न ग्रहण करणे होय.

शरीर आणि मन हे दोन्ही  जोडलेले आहे.म्हणून जेंव्हा शरीर उपवास करून शुद्ध होते तेंव्हा मन सुद्धा शुद्ध होते. आणि निर्मळ मन हे शांत आणि स्थिर असते.म्हणून या नवरात्रीमध्ये थोडी फळे व पाणी किंवा अल्प प्रमाणात,पचायला हलके अन्न खाऊन उपवास करून शरीराला हलके ठेवा आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या सर्वांचा मनावर कसा परिणाम होतो.

 उपवासाचे फायदे

आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय उपचार पद्धतींमध्ये उपवास हे एक पचनाची आग आणि भूक पुन्हा प्रज्वलित करणारे एक प्रभावी साधन मानले जाते.सर्वसाधारणपणे आपण सर्वजण  चांगली भूक लागण्याची वाट पहात नाही.जेंव्हा शरीर अन्न पचविण्यास तयार असते तेंव्हा ते भुकेच्या माध्यमातून दर्शवते.भूक लागण्याच्या आधी खाल्ल्यामुळे आपल्या पचन संस्थेवर ताण येऊन ती दुर्बल बनते आणि रोग प्रतिकारशक्ती कमी होते.उपवासामुळे आपली पचनक्षमता वाढते आणि ही आग आपल्यामधील सुस्ती आणि निरसता,जडत्व जास्त खाल्ल्यामुळे शरीरात निर्माण झालेले असते ते कमी करते.म्हणून उपवास केल्यानंतर आपल्याला टवटवीत आणि हलके वाटते कारण शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत आणि ताज्यातवान्या होतात.उपवास हे शरीर शुद्ध करण्याचा एक उत्तम उपचार आहे.

उपवासाचे फायदे फक्त शरीरिक पातळीवरच होतनसून त्यांचे सकारात्मक परिणाम आपल्या मनावर आणि भावनांवर देखील होतात.शरीर हे मनाशी जोडलेले आहे आणि मन भावनांशी.जेंव्हा शरीर उपवासाच्या माध्यमातून शुद्ध होते तेंव्हा मन सुद्धा शुद्ध, शांत, निर्मळ आणि शांत होते.

सर्व अध्यात्मिक प्रक्रिया उदा.ध्यान ,जप, उपवास, मौन इत्यादीने आपली सत्वाची पातळी उंचावते. जेंव्हा सत्व उंचावते तेंव्हा जीवनातील ज्ञान, सजगता, सृजनशीलता आणि आनंद वाढतो, कारण हे सर्व गुण सत्वाबरोबर येतात.म्हणून उपवास, जप, ध्यान इत्यादी करणे हे महत्वाचे आहे.ते जीवनातील गुणवत्ता उंचावून अधिक आनंद आणि समाधान देतात. उपवास केल्यामुळे शरीरातील सत्वाची पातळी आणखी उंचावते कारण आपली शरीर प्रणाली शुद्ध होते जिच्यावर आपण बरेच वेळा जास्त अन्न खाल्यामुळे ताण दिलेला असतो.

दसरा / दशहरा 

 आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे. म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे.१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत.

आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून सरा  या सणाला एकमेकांना वाटली जातात.

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण |
इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् ||

अर्थ: आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो.इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो.

देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:असेच म्हटले जाते.

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

 

.

माळ आठवी - अष्टमी आणि नवमी पूजन




माळ आठवी – अष्टमी आणि नवमी पूजन

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:। महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।।


नवदुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे. कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।' तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. 

महाअष्टमी

महालक्ष्मीव्रत हे एक व्रत या दिवशी करतात. व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी. तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवावा.मग महालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा करावी. देवीला सोळा परींची पत्री व फुले वहावीत.सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा.पिठाचे सोळा दिवे करून आरती करावी.मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा.मग सोळा दूर्वा आणि सोळा अक्षता हातात घेवून महालक्ष्मीची कथा ऐकावी.

तांदुळाच्या पिठाचा मुखवटा- दुपारचे हे पूजाविधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात. नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात. त्यासाठी तांदुळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात.तो काजल कुंकवाने रेखाटतात. हे काम कडक सोवळ्याने चालते.मग तो मुखवटा सुशोभित मंडपीखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात . चित्पावन कुटुंबातील नववधू विवाहानंतर पाच वर्षे अष्टमीला खडे व दोराकाची पूजा करतात व संध्याकाळी या देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरतात अशी प्रथा प्रचलित असल्याचे अनुभवास येते. उतरंडीवर भरजरी लुगडे नेसवतात. मग कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेलं हात देवीला जोडतात. आरती झाल्यावर रात्री घागरी फुंकणे हा विशेष कार्यक्रम असतो. घागरी फुंकणे-नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात. घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात.यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते.कोकणस्थ ब्राह्मण समाजातील महिलांमध्ये घागर फुंकणे या प्रकाराला विशेष महत्व आहे. 

नवमी

नवदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फूलावरही विराजमान आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे. देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.


जी सर्व सिद्धी देते ती सिद्धीधात्री. जे हवे आहे,जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा, गरजेपेक्षा ज्यादा मिळणे म्हणजे सिद्धी’. साधकाला अध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील. तुम्ही स्व मध्ये स्थिर असाल तेंव्हाच तुम्हाला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होईल, तेंव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असेल. सिद्धीधात्री सर्व इच्छापुर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते. गुरुकृपेमुळे प्राविण्य आणि मुक्तीया सिद्धीधात्रीने दिलेल्या देणग्या आहेत.  

आश्विन शुद्ध नवमीला दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात. दुर्गा ही या व्रताची देवता आहे. प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाचे वेळी कुमारिकांना भोजन घालणे ही या व्रताचा विधी आहे.

माझ्या आठवणीतले महाअष्टमी पूजन

पहिल्याच भागात लिहिल्या प्रमाणे आमच्याकडे नवरात्रीतील अष्टमीला पूज्य जाणाऱ्या सवाष्णीनचे आणि कुमारिकांचे फार महत्व आहे. माझ्या वडिलांच्या आजोळी; मामांकडे देवींचे आणि कुल्पुरुशांचे टाक आहेत. त्यानुसार प्रथे प्रमाणे आणि परंपरे प्रमाणे जवळपास ७० ते ८० वर्ष शारदीय नवरात्र अगदी पद्धतशीरपणे पूजले जाते. नऊ दिवस चौरंगावर एकविरा देवी, तुळजा भवानी, बापूजीबुवा, भूतनाथ, खंडोबाचे टाक आणि कलश ठेवून त्यावर रोज एक अश्या झेंडू फुलांच्या नऊ माळा चढवल्या जातात. अखंड नंदादीप तेवत असतो. रोज गोडाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो आणि सकाळ-संध्याकाळ आरती म्हंटली जाते.


अष्टमीला नऊ सवाष्णी आणि एक कुमारिका पुजली जाते. त्यादिवशीचे वातावरण अतिशय सकारात्मक आणि प्रसन्न असते. वेगवेगळ्या रंगात सजलेल्या आणि चेहऱ्यावर हास्य असणाऱ्या नऊ सवाष्णी नवदुर्गे सारख्याच दिसत असतात. या सवाष्णीना मानाने पाटावर बसवून त्यांचे पाय दुध पाण्याने धुतले जातात. मग त्यांना हळद-कुंकू, गुलाल, शेंदूर लावले जाते. त्यांच्या केसांना तेल लावून फणीने विंचरले जातात. हाताला गंध लावून त्यावर अबीर बुक्का लावला जातो. अशी सौभाग्य द्रव्य लावून झाल्यावर पाच फळ आणि सुकामेवा दिला जातो. त्यानंतर बदाम-पिस्त आणि केशरयुक्त मसाले दुध दिले जाते. प्रत्येक सवाष्णीला तांबुल दिल्या नंतर त्यांची आरती करून मनोभावे नमस्कार केला जातो.

हे सवाष्णी पूजन अष्टमीला सकाळी झाल्यावर संध्याकाळी देवीला, तिच्या गणांना आणि कुलपुरुषांना मांसाहारी जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो. वरण-भात, मटण, कोलंबी, वडे, घारगे, खिर-पुरी, पुरणाचे कानोले असा महाप्रसाद व तीर्थ (मद्य) ठेवले जाते. संध्याकाळी जी आरती केली जाते तिचे अनुभव प्रत्यक्षात घेणे म्हणजे मी आशीर्वादच समजते. धुपाचा दरवळ, फुलांचा सुगंध, मांसाहारी नैवेद्याचा दर्प हे वातावरण आपल्याला एका वेगळ्याच धुंद विश्वात घेऊन जाते.

त्यादिवशी म्हंटली जाणाऱ्या एकविरादेवी आणि तुळजाभवानी देवीच्या आरत्या सुद्धा पणजोबांनी स्वतः तयार केलेल्या आहेत. खंडोबा, भूतनाथांची आणि बापुजीबुवांची आरती अंगावर शहरा आणल्या शिवाय राहत नाही. देवी अंबेची आरती ऐकताना अंबा बाईच्या रूपातला गोडवा कानाला नक्कीच जाणवतो.

पूर्ण कुटुंब मनोभावे या प्रथा आणि परंपरा, चालीरीती अजूनही जश्याच्या तश्या पुढे चालू ठेवत आहेत. याचे नक्कीच कौतुक आहे.  

माझ्या आजीनेही असेच सवाष्णी पूजन आमच्याकडे हौसेने सुरु केले. माझी आई आणि काकी दोघी मनापासून सगळे आजी सांगेल तसे करायच्या. आम्ही चौघी मुलीच झाल्याने कालांतराने आमची लग्न झाल्यावर ते पूजन बंद करण्यात आले. फक्त अष्टमीच्या दिवशी आमच्या कडे गोडाचेच जेवण केले जात असे.

पहिल्याच भागात मी माझ्या घरचे (माहेरी) नवरात्र कसे केले जायचे ते सांगितले आहे.

माझ्या सासरी सुद्धा नवरात्रीचे नऊ दिवस रोज काकड आरती पासून दिवस सुरु होत असे. रोज श्रीसुक्ताच्या रुचांचे हवन केले जात असे. सासू सासरे दोघे व्रतस्थ राहून पूजाअर्चा करत. पंचमी किंवा अष्टमीच्या दिवशी देवीवर कुंकुमार्चन केले जाई. प्रत्येक दिवस प्रसन्न आणि देवीच्या प्रचीतीने परिपूर्ण असाच मी अनुभवला आहे. मी माझ्या आईने एका दिवसात देवीमाहात्म्य वाचन केलेले पहिले आहे. त्यामुळे मीही पाच वर्ष देविम्हात्म्याचे पठन केले आहे. त्यात देवीच्या रूपांचा आणि तिने संहार   केलेल्या असुरांचे खूप सुंदर वर्णन केले आहे. जमल्यास देवीमाहात्म्य जरूर वाचा. गोह्ती रूप आहे आणि भाषा अतिशय सोपी आहे. समजण्यासहि सोपे आहे.

श्री गणेशाय नमः

नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते । शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥

नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी । सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी । सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥

सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी । मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥

आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी । योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥

स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे । महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥

पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी । परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥

श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते । जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥

महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः । सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं । द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं । महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः ॥

 

उद्या दहावा दिवस म्हणजेच विजयादशमी ज्याला आपण दसरा असे म्हणतो त्याबद्दल माहिती नक्कीच लिहिणार आहे पण अजूनही काही गोष्टी ज्यांची माहिती मला नाव्दुर्गेचे माहिती मिळवताना समजली ती मी तुम्हालाही सांगू इच्छिते.

माहिती वाचून अभिप्राय जरूर द्या. 



संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...