धन्यवाद मित्र मैत्रिणीनो आज या निमित्तानी मला माझी ओळख महत्व आणि फायदे तुम्हाला सांगता येतील. असे हळद आदराने सर्वाना नमस्कार करत म्हणाली.
हळद, हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्या परिचयाची आहे. हळदीला आयुर्वेदात प्राचीन काळापासून हळदीला अमृततुल्य औषधी मानण्यात आले आहे. हळद भारतीय वनस्पति आहे. ही आल्याच्या प्रजातिची असून, ५-६ फुट वाढणारा रोप आहे. याच्या मूळ्यांच्या गाठीत हळद मिळते.
प्राचीन काळापासून हळदीचा वापर भारतीय लोक जेवणात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हिंदूंच्या धार्मिक विधीत हळद अत्यंत महत्त्वाची आहे. हळदीमुळे जेवण स्वादिष्ट तर बनतेच त्याशिवाय आरोग्यासाठीही ते लाभदायक असते. सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे.
भारतामध्ये हळदीची लागवड मुख्यत्वेकरून आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू , ओडिशा, बिहार, महाराष्ट्र, आसाम व केरळ या राज्यांत होते. तसेच पश्चिम बंगाल, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांतही थोड्याफार प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. बाजारात मिळणारी ‘हळद पूड’ किंवा ‘हळकुंड’ ज्यापासून काढतात ती ओषधी मूळची इंडोमलाया व चीनमधील असून उष्ण प्रदेशांत सर्वत्र लागवडीत आहे. भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे जम्मू काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ शकते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे.
तिचे सुकविलेले मूलक्षोड (हळकुंडे) दळून ‘हळद पूड’ बनवितात.ती पिवळी, सुवासिक, स्तंभक, शक्तिवर्धक व रक्तशुद्धीकर असते. ती जखमेवर व अवयव मुरगळल्यावर लावतात. ताजा रस कृमिघ्न असून त्वचा विकारावर लावतात पूर्वी ती छपाई व कापड रंगविण्यास वापरीत. टेरामायसिनाच्या उत्पादनात हळद वापरतात.
भारतात हळदीच्या पुष्कळ जाती आहेत, त्यापैकीच काही जातींची माहिती सांगत आहे.
एका जातीची हळकुंडे कठीण व भडक पिवळ्या रंगाची असून तिचा रंगासाठी उपयोग करतात. ती ‘लोखंडी हळद’ म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते.
दुसऱ्या जातीची हळकुंडे जरा मोठी, कमी कठीण व सौम्यपिवळ्या रंगाची असतात. त्यांचा उपयोग मुख्यतः मसाल्याचा पदार्थ म्हणून होतो.
तिसरी जाती रानहळद (कु. ॲरोमॅटिका) असून भारतातती जंगली अवस्थेत वाढताना आढळते. तिची पश्चिम बंगाल व दक्षिण–मध्य केरळमध्ये लागवडही करतात. तिची हळकुंडे फिकट पिवळी, तर गाभ्यात नारिंगी तांबूस रंगाची असतात. त्यांना कापरासारखा वास असून त्यांचा औषधी म्हणून उपयोग करतात. मार लागलेल्या आणि लचकलेल्या अवयवांना तिचा लेप लावतात.
चौथी जाती आंबेहळद (कु. आमडा) असून तिच्या हळकुंडांना आंब्याच्या कैरीसारखा वास असतो. पश्चिम बंगाल, तमिळनाडू व कोकण या ठिकाणी जंगलीअवस्थेत ती आढळते. तिची लागवड साधारणतः मे-जूनमध्ये करतात, तर ऑक्टोबर – जानेवारीमध्ये पीक काढतात. दर हेक्टरला साधारण १०,०००–१२,००० किग्रॅ. ओली हळद मिळते.
पाचवी जाती पूर्व भारतीय हळद (कु. अंगुस्तीफोलिया) असून तिची हळकुंडे बारीक व पांढरट रंगाची असतात. याशिवाय दक्षिण भारतात ‘मद्रासी मांजाळ’ जातीची हळकुंडे रंगाच्या पक्केपणासाठी प्रसिद्ध आहेत. ह्या जातीचा रंग इतर जातींच्या मानाने अधिक पक्का असतो. मलबारी हळकुंडे आकाराने गोलाकार व सर्वांत मोठी म्हणून प्रसिद्ध आहेत.
ओडिशामध्ये ‘गौतम’ जातीचे उत्पन्न भरपूर येते. कर्नाटकमध्ये ‘मुंदगा’, ‘बालगा’ व’ येलछगा’ या जाती प्रसिद्ध आहेत. यांपैकी ‘येलछगा’ जातीची हळकुंडे लहान व उत्पन्नाला कमी असल्याने तिची लागवड घटत आहे. महाराष्ट्रात कृष्णा, राजापुरी, वयगाव या स्थानिक जातींची लागवड करतात. डोंगराळ भागातील हळदीचा दर्जा सपाट प्रदेशातील हळदीपेक्षा चांगला असतो.
खाण्याची हळद (Curcuma Longa ) :ही बहुवर्षीय जात असून ६० ते ९० सें.मी. उंच वाढते. पानांना खमंग वास असून फळे तीनधारी असतात. बोंड, कंद आखूड व जाड असतो. पातळ पाने ६० ते ९० सें.मी. लांब असून कंदापासून ६ ते १० पोपटी हिरव्या रंगाची पाने वाढतात. फुले पिवळसर पांढरी असतात, मात्र लागवडीच्या पिकात फळे धरत नाहीत, कारण ती नपुंसक असतात. या जातीची ९६% लागवड भारतात होते.
कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia) : ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे (आत नारिंगी लाल) असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या (हळकुंडास) गोड वास असतो. ६.१% हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाने लांब - वर्तुळाकर व आल्यासारखी टोकदार, मध्यशीरा उठावदार असतात, फुले सुवासिक, औषधासाठी उपयोग.
आंबेहळद (Curcuma Amada) : कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात. बहुवर्षायु जात असून पाने लांब वर्तुळाकार, आल्यासारखी व पानांचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट - पांढरी असून बोंड तीनधारी असते. औषधी उपयोग : कातडी मऊ होण्यासाठी अंगाला चोळतात. मुरगळल्यावर व सुजेवर उगाळून लावतात. चामडीची खाज घालविते. थंड, पाचक व रक्तशुद्धीकरता, जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे.
हळदीमध्ये लिपोपोलीसॅचिरिड चे घटक आहेत. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. यामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होतो. हळदीमुळे एखादी जखम देखील लवकर भरते. हळदीचे पाणी प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून देखील आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. हळदीतील पोषण तत्त्वांमुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते.
हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडेंट, अँटी- ट्यूमर, अँटी सेप्टिक, अँटी वायरल, कार्डियो प्रोटेक्टिव आणि किडनीसाठी पोषक असणारे औषधी गुणधर्म आहेत. तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हळदीचे पाणी प्या. वजन घटण्यास नक्कीच मदत होईल. वजन वाढीमुळे हृदय रोग, स्ट्रोक आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढत राहतो. पण योग्य प्रमाणात हळदीचे पाणी प्यायल्यास पोट आणि ओटी पोटावरील चरबी कमी होईल. यामध्ये असणाऱ्या कर्क्युमिन घटकामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.
चिंता, ताणतणावाची समस्या कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये अँटी एंग्झायटीचे गुण आहेत. ज्यामुळे शारीरिक तसंच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते. तसंच यातील अँटी-ऑक्सिडेंटचे गुणधर्म नैराश्य कमी करण्यास मदत करतात.
आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे.
हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे.
पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून प्यावे.
डोळ्याचे विकारावर हळकुंड तुरीच्या डाळीत शिजवून डोळ्यात अंजन करावे.
डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.
महत्त्व : धार्मिक कार्यक्रमात तसेच हळदीपासूनचे कुंकू, हळद, लग्नकार्य, पूजा, भंडारा, सौंदर्य प्रसाधने व अनेक पोषक घटक तयार करतात.
काही महिलांना मासिक पाळीमध्ये प्रचंड त्रास होतो. मासिक पाळीत ओटी पोट, पाठ आणि पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचे पाणी किंवा हळदीचे दूध पिऊ शकता.
उपाय करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला पित्त किंवा मूतखड्याचा त्रास असल्यास हा उपाय करू नये. यामुळे समस्या अधिक गंभीर होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी देखील हा उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण कर्क्युमिनमुळे रक्तातील शर्करा अतिशय कमी होते. हळदीमुळे शरीरातील लोह देखील शोषून घेतले जाते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता असेल तर हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे.
नितळ, चमकदार त्वचेसाठी आपण काय नाही करत? बाजारातील विविध महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. पण सौंदर्याचे काही उपाय आपल्याला स्वयंपाकघरात सापडतात. त्यातील एक परिणामकारक उपाय म्हणजे हळद. बहुगुणी हळद आरोग्यदायी असण्याबरोबरच सौंदर्यवर्धकही आहे. हळद त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. विविध पदार्थांमध्ये हळद मिक्स करुन बनवलेले पॅक त्वचेसाठी उत्तम ठरतात. तर पाहुया त्वचा नितळ, सुंदर करण्यासाठी हळद कशी वापरावी...
हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. हळद चुर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते.
१. बेसन आणि हळद एकत्र करुन तुम्ही त्याचा स्क्रबप्रमाणे वापर करु शकता. त्यामुळे त्वचा उजळ आणि मुलायम होईल.
२. लिंबाच्या रसात ब्लिचिंगचे गुणधर्म असतात. तर हळदीमुळे त्वचा उजळते. त्यामुळे हळदीत लिंबाचा रस मिक्स करुन त्वचेवर लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊन त्वचेचा पोत सुधारेल.
३. हळदीत दूध घालून चेहऱ्यावर लावल्यास फ्री रेडिकल्स कमी होतात. त्यासाठी हळदीत कच्चे दूध घालून मिश्रण बनवा आणि ते चेहऱ्यावर, मानेवर लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. नंतर त्वचेत झालेला बदल स्वतः अनुभवा.
४. हळदीत थोडी मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्वचा हेल्दी, कोमल आणि उजळ होईल.
५. हळदीत आणि खोबरेल तेलात अंटी फंगल गुणधर्म असतात. त्याचबरोबर खोबरेल तेल मॉश्चराईजिंगचेही काम करते. हळद आणि खोबरेल तेल एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
ऑलिव्ह आईलमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची लवचिकता टिकून राहते. त्याचबरोबर त्वचा मऊ मुलायम होते.
७. हळदीत लिंबाचा रस, मध मिक्स करुन लावल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. त्यासाठी चमचाभर हळद, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
तर मित्र-मैत्रिणीनो कशी वाटली माझी माहिती आता पुढच्या भागात पाहू धणे याची माहिती.


खूप छान माहिती हळदी बद्दल. नवीन माहिती मिळाली.
ReplyDelete