अनंतचतुर्दशी




आजचा दिवस अकरावा 

या दिवशी सार्वजनिक गणेशांचे विसर्जन होते. अगदी वाजत गाजत जल्लोषात मूर्तीचे विसर्जन केले जाते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष चालू असताना अनेकांचे डोळे पाणावलेले असतात. काय अनोख नात जुळत या बाप्पासोबत अगदी आत्मीयतेच, प्रेमाच. एखाद्या खऱ्याखुऱ्या व्यक्ती सोबत आपण बोलतो तसेच या बाप्पा सोबत बोलले जाते. अकरावा दिवस कसा उजाडला ते कळलेच नाही. गजाननाच्या मानस पूजेचे स्तोत्र मिळाले ते तुमच्या सोबत शेयर करावेसे वाटले.

श्री गणेश मानसपुजा 

नानारत्नविचित्रकं रमणिकं सिंहासनं कल्पितम् ।

स्नानं जान्हविवारिणा गणपते पीतांबरं गृह्यताम् । 

कंठे मौक्तिकमालिका श्रुतियुगे द्वे धारिते कुंडले ।

नानारत्नविराजितो रविविभायुक्तः किरीटः शिरे ॥ १ ॥

भाले चर्चितकेशरं मृगमदामोदांकितं चंदनम् ।

नानावृक्षसमुद्गतं सुकुसुमं मंदारदुर्वाशमीः ।

गुग्गूल्लोद्धवधूपकं विरचितं दीपं त्वदग्रे स्थितम् ।

स्वीकृत ते गणेश भक्ष्यं जंबूफलं दक्षिणाम् ॥ २ ॥

साष्टांगं प्रणतोऽस्मि ते मम कृता पूजा गृहाण प्रभो ।

मे कामः सततं तवार्चनविधौ बुद्धिस्तवालिंगने ।

स्वेच्छा ते मुखदर्शने गणपते भक्तिस्तु पादांबुजे ।

प्रसीद मम पूजने गणपते मम वांच्छा तव दर्शने ॥ ३ ॥

माता गणेशश्र्च पिता गणेशो ।

भ्राता गणेशश्र्च सखा गणेशः ।

विद्यागणेशो द्रविणं गणेशः ।

स्वामी गणेशः शरणं गणेशः ॥ ४ ॥

इतो गणेशः परतो गणेशः ।

यतो यतो यामि ततो गणेशः ।

गणेशदेवादपरं न किंचित् ।

तस्मात् गणेशं शरणं प्रपद्ये ॥ ५ ॥

इति श्रीगणेश मानसपूजा संपूर्णं ॥

🌹ॐ गं गणपतये नमः 🌹

!!!! गणपती बाप्पा मोरया !!!!

==================================================================


अनंतचतुर्दशी 


अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती.

गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीविष्णु देवतेला अनुसरून केल्या जाणार्‍या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. ‘या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते.

 अनंताचे व्रत करण्याच्या दिवसाचे महत्त्व

अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतनास्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस.

ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात.

 श्री विष्णुतत्त्वाच्या उच्चाधिष्ठीत लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदु धर्मात योजना केली आहे.

शेषनाग

 शेषदेवता श्री विष्णुतत्त्वाशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचे उत्तम वाहक समजली जाते; म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते.

या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणार्‍या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजाविधानाने या लहरी त्याच रूपात जिवाला मिळणे शक्य होते.

शेषरूपी देवता ही मानवी देहातील चेतनेला त्या त्या लहरींच्या रूपात क्रियेच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधीत प्राधान्याने महत्त्व दिले जाते.

दर्भाचे शेषरूपी प्रतीक 

दर्भात क्रियेच्या स्तरावर तेजाच्या रूपातील शक्ती कार्यमान रूपात भ्रमण करत असते.

दर्भाच्या शेषरूपी प्रतीकातून ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या स्तरावरील विष्णुरूपी सर्पिलाकार लहरी दर्भाकडे आकृष्ट होऊन पूजास्थळी पसरण्यास साहाय्य होते.

अनंतव्रतातील १४ गाठींच्या दोर्‍यांचे महत्त्व

अनंतव्रतातील १४ गाठींचे दोरे

 ‘मानवी देहात १४ प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोर्‍याला १४ गाठी असतात.

 प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठींवर आवाहन केले जाते.

दोर्‍यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसर्‍या ग्रंथीपर्यंत वहाणार्‍या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे.

 १४ गाठींच्या दोर्‍याची मंत्रांच्या साहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्त्वाची दोर्‍यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारीत होतो.

यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास साहाय्य मिळते.

 जिवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प-अधिक होतो.

 त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात.

 अशा रितीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्यसंपन्न, तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते.’



सत्यनारायण पूजे सारखीच दिसणारी हि पूजा आहे पण त्याहि पेक्षा खूप प्राचीन आहे. आमच्या कडे या पूजे बद्दल सांगितले जाते ते म्हणजे हि पूजा माझ्या माहेरी जवळ जवळ शंभर वर्ष जुनी आहे. १९१० पासून चाललात आलेली हि पूजा. हि पूजा अतिशय दुर्मिळ आहे तसेच गणेश विसर्जनाच्या जयघोषात थोडी विरली जाते. पण ज्यांना ह्या पूजेची  महती ठाऊक आहेत असे खूप भक्त आमच्या पूजेचे दर्शनाला आवर्जून यायचे. सांताक्रूझ चे आजी-आजोबा तर आदल्या दिवशीच तयारी करता यायचे. या पूजे बद्दलच्या काही खास आठवणी लिहायच्या म्हणून मी माझ्या पुण्यातल्या आजीला फोन केला. वय वर्ष नव्वद तरी खणखणीत आवाजात तिने माझा अगदी उत्साहाने सगळ्या गोष्टी सांगितल्या. 

या पूजेत तुळशी पत्राचा अभिषेक केला जातो. पुजलेला अनंत दुसऱ्या दिवशी डबीत ठेवून वर्षभर पुजला जातो. पुढच्या वर्षी देवात पुजलेल्या अनंताची अन नवीन अनंताची पूजा करून जुना अनंत विसर्जित केला जातो व नवीन अनंत पुन्हा डबीत ठेवून त्याची पूजा केली जाते. असे चौदा वर्ष सातत्याने हे करावे लागते.

या पूजेला इतर पत्रीन सोबतच अनंताचे फुलही महत्वाचे असते. हे फुल आता खूपच दुर्मिळ झाले आहे. त्यावेळी म्हणजे आम्ही श्रीरंग सोसायटीत बंगल्यात असताना आमच्या बागेत अनंताचे झाड होते त्याला भरपूर फुले येत असत. आता मी कित्येक वर्ष झाले हे फुल पहिले नाही. 


तिच्या आठवणी प्रमाणे आमची पणजी आज्जी या पूजेच्या नेवेद्यात १४ भाज्या, १४ आमटी, १४ चटण्या, १४ कोशिबीर, १४ पक्वान्न, मटारची सोजी, वडे, घार्गे, बोतव्याची खीर, तिखट पंचामृत आणि चुरम्याचे लाडू सर्वात महत्वाचा इतके जिन्नस नेवेद्याला असायचे. खूप जण असल्याने हे इतके सगळे पदार्थ लागायचेच पण कालांतराने यातील की पदार्थ कमी करून सुटसुटीत नेवेद्य दाखवला जाऊ लागला. वडे-घारगे आणि लाडू कायम असायचे.

अनंतपूजनात भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवण्याचे कारण

‘भोपळ्यातील आपतत्त्वात्मक रसात्मकता ही क्रियाशक्तीला चालना देणारी असते. तसेच भोपळ्यात बद्ध असणारे सूक्ष्म वायूकोष हे ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या लहरींना स्वतःत घनीभूत करणारे असतात.

भोपळ्याच्या साहाय्याने बनवलेले घारगे आणि वडे यांत पूजास्थळी कार्यमान असणार्‍या क्रियाशक्तीच्या लहरी अल्प कालावधीत स्थानबद्ध होऊ शकतात. असा क्रियाशक्तीने भारित नैवेद्य ग्रहण केल्याने देहातही त्याच पद्धतीचे बलवर्धकतेला पूरक असे वायूमंडल निर्माण होण्यास साहाय्य मिळते.’

आमच्या साठी हि पूजा खूप मोठी असायची. सगळे नातेवाईक या पूजे ला आवर्जून यायचे तसेच संध्याकाळच्या तीर्थ प्रसादाला हि खप जण असायचे. प्रत्येकाला चिवडा आणि रवा-बेसन लाडवाचा प्रसाद असायचा किवा कधी कधी मटारची सोजी आणि लाडू असेही दिले जायचे. अगदी उशिरा पर्यंत पाहुण्यांची ये-जा चालूच असायची. इतकं सगळे अन्न कसा काय पुरवठ्याला यायचे हे त्या अनंतालाच ठावूक. 

माझ्या आज्जी-आजोबांनी, काका-काकीने, आई-पप्पानी हे व्रत मनापासून केले. आता या व्रताचे उद्यापन झाले असले तरी आच्या दिवशी त्या आठवणी जाग्या होतात. अनंताची आरती म्हंटली जाते. अगदी आवडीने गंगा जळे, मदन गोपाला, भुवन सुंदराची , संत सनकादिक या आरत्या अजूनही संग्रहित करून ठेवल्या आहेत. या सर्व आरत्या ऐकायला खूप मधुर आहेत, चाल-ताल फार सुंदर आणि वेगळी आहे. अनंताची आरती आणि अपराध क्षमा मी इथे शेयर करू इच्छिते.


अनंताची आरती 

जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।

भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।।

भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।

दुकूलदोरक करुनि पूजिती अनंत नामानें ।।1।।

नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।

षोडशपूजा करूनि ब्राह्मण संतर्पण करिती ।।2।।

अपूप वायन दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।

अनंत संतुष्टोनि देती संतति संपत्ती ।।3।।

रामा धर्मा आचरिता व्रत क्लेशांतुनि सुटला ।

कौंडिण्याने पुजिता तुजला उद्धरिले त्याला ।।4।।

मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।

संकटकाळी रक्षी अनंता अपुल्या दासासी ।।5।।

 

 निरोपाची आरती

अपराध क्षमा आता केला पाहिजे । अनंता केला पाहिजे । 

अबद्ध सुबद्ध २, गुण वर्णीयले तुमचे ll 

नकळेची टाळ वीणा वाजला कैसा । अनंता वाजला कैसा । 

अस्ताव्यस्त पडे नाद गेला भल तैसा ।। 

नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर । आमुचा कंठ सुस्वर । 

झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ।।  

निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे । आमुचे वेडे वाकुडे 

गुण दोष न लावावा सेवकाकडे ।। 

कापराची वात अनंता ओवाळू तुजला दयाळा ओवाळू तुजला ।। 

देह भाव अहंकार सहजची जाळीयला ।। 

दया क्षमा शांतीच्या उजळल्या ज्योती । 

स्वयंप्रकाश रूप अनंता दाखवा मूर्ती ।।

मी तू पण काजळ काजळी केली अनंता काजळी केली । 

नित्यानंद तनु, नित्यानंद तनु जीवे भावे अर्पियली ।।


अशीच अनंत कृपा आमच्या वर राहूदे हीच प्रार्थना तुझ्या चरणी 





विश्वविनायक



विद्येची देवता अन चौसष्ट कलेचा अधिपती 

आजचा दिवस दहावा

इतके दिवस गणपती बाप्पाच्या आठवणी, अनुभव, माहिती यांचा संग्रह तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज मी ज्या बाप्पा बद्दल माहिती देणार आहे तो आहे 'विश्वविनायक' 

आपण महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेल्या विश्वविराट रूपा बद्दल ऐकले आहे; पण गणपतीचे विश्वविनायक ह्या रूपा बद्दल मी तरी कधी ऐकले नव्हते. मला जे कळले तेच तुमच्या पर्यंत पोहोचवते आहे. असे म्हणतात, जेव्हा एखाद्या दैवताला प्रकट व्हायचे असते तेव्हा तो कोणाला तरी दृष्टांत देतो, स्फुरतो, संकेत देतो किंवा साक्षात्कार देतो आणि त्या व्यक्ती मार्गे आपल्या इतर भक्तां पर्यंत पोहोचतो. तसेच या विश्वविनायकाचे आहे. माझ्या शालेय काळातील मित्र श्री. दिलीप वैती यांनी ही विश्वविनायकाची कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचे काम त्यांनी केले. 

बुद्धीची अन विद्येची देवता आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजेच गणपती; या गणपतीचा वरद हस्त लाभलेलं हे व्यक्तिमत्त्व अगदी तुमच्या आमच्या सारखं साधं आयुष्य जगत आहेत. साधी सोपी राहणी आणि आयुष्याच्या अनुभवातून मिळालेल्या शिकवणीतून तावून सुलाखून निघाल्याने आजही त्यांचा साधेपणा आम्हा सगळ्यांनाच खूप भावतो. दिलीप यांच्याकडे जवळपास ७०० ते ८०० गणपतीची वेगवेगळी रूप असलेल्या मूर्ती आहेत. अगदी अर्धा इंचा पासून ते चार-साडे चार फूट उंचीचे गणपती आहेत. जवळपास ८०० ते १००० गणपतीची चित्र त्यांनी काढली असतील. 

एखादी कला अंगिकरणे म्हणजे त्या कलेची साधना करावी लागते. तिची आराधना करणे गरजेचे असते. जो पर्यंत ते आपल्या नसानसांत भिनत नाही, श्वासात मिसळत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व येत नाही. इथे असेच दिसते;ज्या गणपती मूर्ती दिलीपकडे आहेत ते त्यांची जोपासना करतात म्हणजेच त्या सगळ्या मूर्त्यांची स्वछता केली जाते;धुवून पुसून स्वच्छ करून त्या परत जागच्याजागी ठेवल्या जातात. असे साधारणपणे महिन्यातुन दोनदा केले जाते. दिलीप यांची गणपतीची आस्था जसजशी वाढू लागली तसे त्यांचा त्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलत गेला किंवा जास्त प्रगल्भ होत गेला. जे बाप्पा आधी मूर्ती रूपात साकारले जायचे ते आता त्यांना कणाकणात दिसू लागले. प्रत्येक गोष्टीत जसे; पानात, फुलात, प्राण्यात, भाजीपाल्यात अगदी वस्तूत सुद्धा त्यांना बाप्पा दिसतो आणि त्याचं स्मरण करून कागदावर आकारले जाते. ही रोजची रूपं आम्हाला मॉर्निंग मोरया या टायटल खाली पहायला मिळतात. साधारण दीड वर्ष झाले असेल या त्यांच्या उपक्रमाला आणि या ७००-८०० गणपतीचा एक संग्रहच तयार झाला आहे. अशा साधनेचा सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असते. तेच आम्ही सगळे पहातोय. या त्यांच्या बाप्पांच्या प्रत्येक मूर्तीची आठवण आणि त्यांना आलेली प्रचीती ऐकण्या सारखी आहे. 


२००२  मध्ये त्यांना साईबाबा मंदिर शिर्डी येथील बाबांच्या सिंहासनाचे डिझाईन करण्याचा योग्य जुळून आला. एकविरा आई आणि हिंगलाई देवी च्या मंदिरातील नक्षीकामाचे डिझाईन रेखाटण्याचा योग्य जुळून आला. त्यांच्या कडून अनेक शाळांमध्ये चित्रकलेचे उपक्रम राबविले गेले. शाळांच्या भिंतीवर बोधप्रद चित्र काढून ती सुशोभित करणे तसेच सुकलेली वाळलेली वृक्ष ही रंगवून सुशोभित करण्याचे उपक्रम केले. अनेक उद्यान त्यांनी अशाच प्रकारे सुशोभित केली आहेत. 



विश्वविनायक ही संकल्पना २०१० मध्ये त्यांना स्फुरली; तेव्हा गणपतीची १०८ नावं, १०८ गणपतीची चित्र काढणे, गणपतीचीच गाणी आणि त्यावर नृत्य आणि त्यावेळात गणपतीची मूर्ती साकारणं; हे या संकल्पनेचे स्वरूप होते. हे सत्यात साकारणं सोप नव्हते. अवघ्या दोन ते तीन तासात २७ x ८० फुटाच्या कॅनव्हास वर फक्त सात ते आठ चित्रकारांनी ही गणपतीची १०८ रूपं चित्रित केली त्यावर रंग दिले आणि तिथल्या प्रेक्षकांना हे सगळं अदभुत याची देही याची डोळा पहाता आले. 

विश्वविनायक या संस्थेने अनेक उपक्रम राबविले आहेत. दिलीप वैती, केदार पाटील, जानकी वैद्य, शेखर केदारे आणि अर्चना वैती हे या संस्थेचे संस्थापक  किंवा प्रमुख खंदक आहेत. तसेच आता हा विनायकाचा परिवारही वाढत जात आहे, अनेक जण यात निस्वार्थी पणे जुडला जात आहे. 



२०१४- २०१८ या काळातील गणपती उत्सवात चेंबूर सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणपती उत्सवात डेकोरेशन करण्याचा योग्य आला. त्यात खूप मोठया आणि मान्यवर व्यक्तीच्या संपर्कात येण्याची संधी मिळाली. २०१५ मध्ये शिक्षकदिना निमीत्त एका शाळेत अपंग मुलां करता काही स्पर्धांचे आयोजन केले गेले होते तिथे  सिंधुताईना भेटण्याची संधी मिळाली. अनेक मान्यवर व्यक्तीच्या संपर्कात असूनही आपलं साधेपणा कसं जपावे हें दिलीपच्या बोलण्या वागण्यातुन दिसतंच. कलेचा अभ्यास करून ती योग्य प्रकारे साकारणे तिला आकारणे आवश्यक असते तसेच त्याला बोलकं करणे त्यात चैतन्य निर्माण करून सादर करणे ही खरी कला असते. याचा प्रत्यय आम्हाला वारंवार येतोच. 


दिलीप यांच्या कडे ११९ वर्ष घरच्या गणपतीची स्थापना केली जाते. वेगवेगळ्या संकल्पनानी सजावट केली जाते, गेली चार वर्ष  पुस्तके, धान्य, झाडे आणि वस्त्र असे लोक उपयोगी वस्तूनी सजावट केली गेली. याच वस्तू नंतर गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटल्या जातात. अनेक वेळा अनेक ठिकाणी कलेचे लाईव्ह सादरीकरण करण्यात आले. त्याचे अनेक प्रसारमाध्यमानी प्रसारण केले. दिलीप यांना अनेक पुरस्काराने सन्मानितहि करण्यात आले आहे.

आत्ताच्या या आपल्या धकाधकीच्या आयुष्यात कुठे तरी मनशांती हवी असूनही मिळत नाही आणि थोडीफार लाभली तरी त्याचा आस्वाद हवा तसा घेता येत नाही. आपण आपल्या पासूनच निसर्गाला दूर करून बसलोय. सारे काही आपल्या समोर असते अगदी जवळ तरीही ते अंधुक,धूसर झालेले आहे. ती धूळ हलकेच झटकणे गरजेचे असते; आणि मग आपल्याला ज्या देवाच्या सानिध्यात रमायचे असते तो आपल्या समोर निसर्ग रुपात दिसू लागतो.



पंचमहाभूतानि तयार झालेला हा निसर्ग म्हणजेच आप, तेज,वायू,जल आणि अग्नी यात गणपती बाप्पाची अनेक रूपे याच तत्वात विलीन होऊ इच्छित आहेत. जास्तीत जास्त निसर्गाच्याच जवळ जाऊ इच्छितय. 

वसुंधरेचा गंध, फुलांचा रंग, पाण्याचा निखळ खळखळाट, सळसळता वारा आणि सूर्याचे लख्ख तेज. या सगळ्यांनी मिळून तयार झालेल्या बाप्पांच्या प्रतिमा आपल्या समोर आणण्याची संकल्पना या विश्वविनायक संस्थेने योजली आहे. विश्वविनायक आता खर्या अर्थाने विराट रूप घेण्यास तयार आहेत. कार्याला सिद्धीस नेण्यास विश्वविनायक समर्थ आहेच. त्या सोबतच आम्हा सर्व मित्र परिवाराच्याहि खूप खूप शुभेच्छा या संस्थेला आणि खास करून आमच्या मित्राला म्हणजेच दिलीप वैती यांना आहेत.




अष्टविनायक तुझा महिमा कसा

 



आजचा नववा दिवस

आमच्या अष्टविनायक यात्रेतील आजचा शेवटचा दिवस; लेण्याद्री ला आम्ही दुपारच्या वेळी पोहोचलो साधारणपणे ३- ३.३० च्या दरम्यान, यावेळी लख्ख ऊन होते आणि तसा परिसर रखरखीत वाटला. फ्रेश झालो मस्त चहा घेतला आणि चढायला सुरुवात केली. सुरवातीला कठीण वाटणारी ही चढण ऊन उतरू लागले तसे सुखकर वाटू लागली. जवळपास ३०० पायऱ्या चढायच्या म्हणजे मन धास्तावले होते पण थांबत आणि देवाचे नामस्मरण करत वर पोहोचलो. गार वारा सुटला होता. अंदाजे ५ च्या आसपास आम्ही पोहोचलो असू. माकडांनी आधीच्या भक्तांना पकडलेले पहिलं तेव्हा आम्ही थोडं सावधच होतो. लेण्या फार सुंदर आहेत. आणि मंदिराचा सभामंडप तर खूप मोठा आहे. एकही खांब नसलेलं हे भव्य आवार; नवलच वाटले आम्हाला. दर्शन खूपच छान झाले. गुरुजींनी माहिती सांगितली. प्रार्थना करून आम्ही उतरायला लागलो.


अष्टविनायक गणपतीतील हा सहावा गणपती....लेण्याद्रीचा गिरिजात्मक      



गनपती, सहावा गनपती

(हो....हो...)

लेण्याद्री डोंगरावरी

नदीच्या तीरी, गणाची स्वारी

तयाला गिरीजत्मज हे नाव

दगडामंदी कोरलाय भक्तीभाव

रमती ईथे रंकासंगती राव हो जी जी

(रमती ईथे रंकासंगती राव हो जी जी..)

शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो जी जी

(शिवाचा झाला हो जी जी, शिवाचा झाला हो जी जी)

लेन्याद्री गनानं फाटे आशीर्वाद केला हो जी जी

(आशीर्वाद केला हो जी जी, आशीर्वाद केला हो जी जी)

पुत्रानं पित्याला जल्माचा परसाद द्येला हो जी जी

(परसाद द्येला हो जी जी, परसाद द्येला हो जी जी)

किरपेनं गनाच्या शिवबा धावूनी आला हो जी जी

(धावूनी आला हो जी जी, धावूनी आला हो जी जी)

खडकात केल खोदकाम

दगडाच मंदपी खांब

वाघ, शिंव, हत्ती लई मोटं

दगडात भव्य मुखवट

गनेश माजा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा

अन् गिरीत्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा

(जी जी हो जी जी, हं जी जी रं जी जी, हे हे हे हां)

अहो दगडमाती रुप द्येवाच लेण्याद्री जसा 


अष्टविनायकातील हा एकच गणपती डोंगरावर आहे. अंदाजे ३०० पायऱ्या चढून गेल्यावर समोरच गुहेत हे मंदिर आहे. इथे जवळपास १८ गुहा आहेत. या लेण्यांना गणेशलेणी असेही म्हंटले जाते. नाशिक फाटा, जुन्नर या मार्गावर हे मंदिर स्थित आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या सोंडेची आहे. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहे. डाव्या अन उजव्या बाजूस हनुमंत आणि शिवशंकर आहेत. मूर्ती पाठमोरी आहे तिची तशीच पूजा केली जाते. मोठा सभामंडप आहे ज्यात एकही खांब नाही. डोंगरकपारित दगडात हे मंदिर असल्याने याला प्रदक्षिणा घालता येत नाही. या मंदिरात एकही इलेक्टरीक लाईट नाही. असे म्हणतात पांडवांचे इथे वास्तव्य होते.


अस्थ्विनायक यात्रेतील सातवा गणपती महड चा वरद विनायक 


सातवा गनपती राया, सातवा गनपती राया, 

सातवा गनपती राया हे हे हे हे हे हो हा

महडगावं अति महाशूर

वरदविनायकाच तिथं येक मंदिर

मंदिर लई सादसुद, जस कौलारू घर

घुमटाचा कळस सोनेरी

नक्षी नागाची कळसच्या वर, कळसाच्या वर....

(हे हे हे हे हां)

स्वप्नात भक्ताला कळ

देवच्या माग हाय तळ

मुर्ती गनाची पाण्यात मिळ

त्यान बांधल तिथ देऊळ

दगडी महिरप सिंहासनी या, प्रसन्न मंगल मुर्ती हो

वरदानाला विनायकाची पुजा कराया येती हो जी जी रं जी

(माज्या गना र जी जी, माज्या गना र जी जी)

हे हे हे हे हे हो हा

चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा, अहो चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा 

आमचे आधीच ठरले होते की परतीच्या प्रवासात महड आणि पाली करायचे त्याप्रमाणे आम्ही आधी महडला गेलो. त्यादिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने जरा गर्दी लागली. लाईन मोठी होती. सभामंडप/हॉल मध्ये अथर्वशीर्षचा पाठ चालू होता. खूप स्पष्ट उच्चार कानी पडत होते. आम्ही सुद्धा त्यांच्या तालात तल्लीन होऊन गेलो.दर्शन होई पर्यंत जितके वेळा म्हंटल जाईल तितकं म्हणायचं असे मनोमन ठरवलं. देवाचे नाव घेताना त्यात मोजमाप नसावे असे मला वाटते. या गणपतीला स्वतः हार अर्पण करता आला हे समाधान मिळाले. 

सातवा गणपती महड चा वरद विनायक मुंबई खोपोली जवळ हे मंदिर आहे. पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या सोंडेची आहे. संपूर्ण मूर्ती शेंदुराने लेपन केलेली आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत. मंदिरात अखंड नन्दादीप तेवत असतो. या मंदिराच्या बाजूला चार हत्तीचे पुतळे आहेत आणि याचा कळस सोनेरी असून त्यावर नागाची नक्षी केली आहे.   हे मंदिर मुंबई नजीक असल्याने येथे भक्तांची गर्दी होते. मंदिराचा हॉल मोठया आवाराचा आहे. मन अतिशय प्रसन्न झाले. दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही या यात्रेतील शेवटच्या गणपतीचे दर्शन घ्यायला निघालो.


अष्टविनायक यात्रेतील आठवा गणपती पालीचा बल्लाळेश्वर



 आठवा आठवा गणपती आठवा

गणपती आठवा हो गणपती आठवा

पाली गावच्या बल्लाळेश्वरा

आदीदेव तू बुध्दीसागरा

स्वयंभू मुर्ती पुर्वाभिमुख

सुर्यनारायण करी कौतुक

डाव्या सोंडेचे रुप साजीरे

कपाळ विशाळ, डोळ्यात हिरे

चिरेबंद ह्या भक्कम भिंती

देवाच्या भक्तीला कशाची भिती

ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा ........८


अष्टविनायका तुझा महिमा कसा

दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा

(हो, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा)

 आठवा गणपती पालीचा बल्लाळेश्वर अतिशय जागृत देवस्थान आहे. खोपोली नजीक असल्याने मुंबई-पुणे येथील भक्त येथेही दर्शनाला येतात. मंदिरा मागे असलेल्या डोंगराप्रमाणे या मूर्तीची रचना आहे. पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या सोंडेची आहे. डोळे आणि नाभी हिरे जडीत आहेत. संपूर्ण मूर्ती दगडी असून दक्षिणायनात सूर्यकिरण मूर्तीवर पडतात अशी याची रचना आहे. या गणपतीला बेसनाच्या लाडवाचा नेवेद्य दाखवला जातो.

पालीला तसे खूप वेळा गेलो आहे पण या यात्रेतील एक गणपती म्हणून दर्शन घडत होते. पालीच्या बल्लाळेश्वरा सोबत एक वेगळीच आपुलकी वाटते. खूप सुंदर दर्शन झाले. बल्लाळेश्वराला छान धोतर नेसवलं होते. गाभार्यात उभं राहून प्रार्थना करता आली आणि अथर्वशीर्षही म्हणता आलं. प्रसाद घेऊन निघालो. 

डोळे भरून आले होते माझे सगळी दर्शन खूप सुंदर झाली याचा आंनद होता आणि ती ही इच्छे प्रमाणे वर्ष श्राद्ध च्या आत झाली. जवळच्याच एक खानावळीत चविष्ट जेवण जेवून मनात सर्व गणपतीची रूप साठवून घराकडे निघालो.



मोरया मोरया मी बाळ तान्हे 

तुझीच सेवा करू काय जाणे 

अन्याय माझे कोट्यान कोटी 

मोरेश्वरा बा तू घाल पोटी 

 !! गणपती बाप्पा मोरया !!




अष्टविनायका तुझा महिमा कसा





आजचा आठवा दिवस 

जसे जसे एक एक दर्शन होत होते मनाला एक समाधान मिळत होते. कुठेच दर्शना साठी लेन मध्ये उभे राहायला लागले नाही आणि प्रवासातहि कोणतेच अडथळे आली नाहीत. आश्चर्य म्हणजे माझ्या लेकीचा तापही अचानक गायब झाला. हे मात्र खरचच आश्चर्य करण्यासारखे होते. जिथे जिथे वास्तव्य केले तिथे सगळीकडेच उत्तम रहाण्याची सोय आणि घरगुती जेवणहि  स्वादिष्ट मिळाले. 

दर्शन घेताना देवाचे रूप डोळ्यात साठवता आले पाहिजे असे माझी आई म्हणायची. तसेच या यात्रेत झाले. डोळे मिटले कि ती मूर्ती, ते आवार डोळ्यापुढे येते. आमचे अजून एक अलिखित commitment आहे असेच म्हणाना; कि देवाला गेल्यावर आम्ही उगाच घ्याचे म्हणून हार, पेढे, फळ घेत बसत नाही त्या पेक्षा तिथे गरिबाला वस्त्र किवा  जेवण खाऊ घालतो. खर तर हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर आणि मानण्यावर असते पण आमच्या दोघांचे यावर एकमत आहे त्यामुळे तसे करणे सोपे जाते.


अष्टविनायक यात्रेतील हा तिसरा गणपती 

सिद्धटेकचा सिद्धिविनायक


सिद्धटेकचा सिद्धिविनायक 


ग न प ती, तिसरा ग न प ती

ग न प ती, तिसरा ग न प ती

शिद्दीविनायक तुझा शिद्दटेक गाव रं

पायावरी डोई तुज्या भगताला पाव रं

दैत्य मधु-कैतभान गांजल हे नग्गर

ईस्नुनारायन गाई गनपतीचा मंतर

राकुस म्येल नवाल झाल

ट्येकावरी देऊळ आलं

लांबरुंद गाभार्‍याला पितळंच मखर

चंद्र सुर्य गरुडाची भवती कलाकुसर

मंडपात आरतीला खुशाल बसा 

पुणे - सोलापूर महामार्गावर स्थित असलेलं हे गाव सिद्धटेक. मोरगाव हुन दोन तासांच्या अंतरावर, भीमा नदीच्या काठावर हे मंदिर आहे. हेही मंदिर पेशवेकालीन आहे. मंदिरातील मुर्ती स्वयंभू असून ३ फूट उंच आहे. अष्टविनायकातील हा एकच गणपती उजव्या सोंडेचा आहे. पितळेच्या चौकटीत असलेल्या ह्या मूर्तीची मुद्रा अतिशय शान्त दिसते. गणपतीच्या मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत व दोन्ही बाजूला जय-विजयाच्या पितळेच्या मूर्त्या आहेत. 

शांत प्रसन्न गाभार्यात आम्ही बसून अथर्वशीर्ष म्हंटले. त्या दिवशी संकष्टी होती. मूर्ती चे रूप फारच सुंदर दिसत होते.


अष्टविनायक यात्रेतील हा चौथा गणपती 

रांजणगावचा महागणपती 


रांजणगावचा महागणपती 


गणपती, गणपती गं चवथा गणपती

बाई, रांजणगावचा देव महागणपती

बाई, रांजणगावचा देव महागणपती

दहा तोंड ईस हात जणु मुर्तीला म्हणतीबाई,

दहा तोंड ईस हात जणु मुर्तीला म्हणती

बाई, रांजणगावचा देव महागणपती

गजा घालितो आसन, डोळं भरुन दर्शन

सुर्य फेकी मुर्तीवर येळ साधुन किरण

किती गुणगान गाव, किती करावी गणती

बाई, रांजणगावचा देव महागणपती

पुण्याईच दान घ्याव ओंजळ पसा 


पुणे-अहमदनगर मार्गावर ओझर पासून दोन तासांवर हे मंदिर आहे. कमळात बसलेली ही मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. रिद्धी-सिद्धी सोबत आहेतच. मोठं आवार असलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे.याची रचना अशी आहे की उत्तरायणात अन दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. अतिशय जागृत असे देवस्थान आहे याची प्रचिती येतेच.

असे म्हणतात या मंदिराच्या तळघरात अजून एक गणपतीची मूर्ती आहे; ती दहा सोंडेची अन वीस भुजांची आहे. येथेच त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी शिवशंकराने गणपतीची आराधना केली होती.

या मंदिराच्या आवर बाहेत राहण्याची उत्तम सोय आहे. जेवणही अतिशय सुंदर मिळाल. सकाळी मंदिरातील पूजेचा आणि मन्त्रोचाराचा आवाज मन प्रसन्न करीत होता.


 अष्टविनायक यात्रेतील हा पाचवा गणपती

ओझरचा विघ्नेश्वर 

ओझरचा विघ्नेश्वर


गणपती पाचवा, पाचवा गणपती

ओझरचा विघ्नेश्वर, बाई ओझरचा विघ्नेश्वर

लांबरुंद हाये मुर्ती

जडजवाहिर त्यात

काय सांगू शिरीमंती

ओझरचा विघ्नेश्वर, बाई ओझरचा विघ्नेश्वर

डोळ्यामंदी मानक हो, बाई डोळ्यामंदी मानक हो

हिरा शोभतो कपाळा

तानभुक हारते हो, सारा पाहुन सोहाळा

चारी बाजु तटबंदी

मधे गनाच मंदिर

ओझरचा विघ्नेश्वर

ईघ्नहारी, ईघ्नहर्ता स्वयम्भू जसा


हे मंदिर लेण्याद्री पासून जवळ आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आहे. डोळ्यात माणिक जडलेले आहेत; तसेच मुर्तीवर शेषनाग व वास्तू पुरुष आहे. मंदिराचा कळस सोनेरी आहे. भक्कम दगडी भिंतीचे हे मंदिर असून त्यावर सुंदर शिल्पं आहेत. मंदीराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत आणि त्यातील दोघांच्या हातात शिवलिंग आहे. भक्तांची विघ्न दूर करतो म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात. तसेच विघ्नासुर राक्षसाचा वध केला म्हणूनही याला विघ्नेश्वर असे संबोधले जाते.


असेच अजून पुढचे बाप्पा आणि माझे अनुभव आठवणी पाहूया पुढच्या भागात...............


अष्टविनायका तुझा महिमा कसा




स्वस्ती श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धीद्म्

बल्लाळम् मुरुडम् विनायक महडम् चिंतामणीम् थेवरम्

लेण्याद्रीम् गिरीजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्

ग्रामो रांजण संस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्

कुर्यात सदा मंगलम्


आजचा सातवा दिवस 

२०१६ ला गणपतीच्या पहिल्याच दिवशी माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. एक  पोकळी निर्माण झाली,  त्यांच्या आठवणींची ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आता लिहिताना ही डोळे पाणावतात. असो त्या नंतर मनात येऊ लागले; वर्ष पूर्ण व्हायच्या आत आपण अष्टविनायक यात्रा करावी.एक दोन वेळा बुकींग करून काही न काही कारणाने ते रद्द करावे लागले. योग्य जुळून येत नव्हता. मन खट्टू होत होते. बाप्पाला मनोमन प्रार्थना करीत होते. शेवटी यांनी आणि मुलीने ठरवले आपण आपल्याच कार नि निघुया आणि जिथे जसे रहायची सोय असेल तिथे थांबून मुक्काम करत दर्शन करायचे. योग्य वेळ येणेच आवश्यक असते.

दिवस ठरला बॅगा भरल्या स्वतःच्या गाडीतून जायचे म्हंटल्यावर थोडं जास्त समान होतेच. नेमका निघायच्या दिवशी माझ्या मुलीला ताप भरला. मन धास्तावले आता परत यात्रा रद्द करायलाच लागणार. तापात इतक्या लांबचा प्रवास कसा जमणार या विचारात होतो पण ती स्वतःच तयार झाली. अगदीच कुठे दर्शन नाही घेऊ शकले तर कार मध्ये बसून राहीन अशी ही तयारी दाखवली. देवाला नारळ ठवताना कोणतीही विघ्न न येता ही यात्रा पूर्ण कर गजानना !! अशी प्रार्थना केली; आणि मार्गी लागलो.

आम्ही दर्शन याप्रमाणे घेतली 

ओझर-लेण्याद्री-मोरगाव-जेजुरी- रांजणगाव-सिद्धटेक-थेऊर-महड-पाली..... 

पण आत्ता मी अष्टविनायक गाण्यातील क्रमा प्रमाणे लिहीत आहे. 


अष्टविनायका तुझा महिमा कसा

दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा

अष्टविनायका तुझा महिमा कसा


मोरगाव - मयुरेश्वर 

गनपती, पहिला गनपती, आहा

मोरगावचा मोरेश्वर लई मोठ मंदिर

अकरा पायरी हो, अकरा पायरी हो 

नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर

शोभा साजरी हो, हो शोभा साजरी हो

मोरया गोसाव्यानं याचा घेतला वसा 

अष्टविनायक यात्रेतील हा पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर...असे म्हणतात या गावाचा आकार मोरा प्रमाणे होता आणि मोरांची वस्ती होती म्हणून या गावचे नाव मोरगाव असे पडले. पुण्या पासून ५५ किमी अंतरावर बारामती तालुक्यातील मोरगाव. कऱ्हा नदीच्या काठी मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. या मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. डाव्या सोंडेचा गणपती असून त्याच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे जडवलेले आहेत. या मूर्ती वर नागाचे संरक्षक छत्र असून रिद्धी-सिद्धि ही आहेत. मंदिरात प्रवेश करताच उंच दगडी उंदीर आणि नंदि चे दर्शन होते. नंदि चे तोंड गणपती समोर आहे. गणपती समोर नंदि असलेले हे एकमेव मंदिर आहे. अतिशय प्रसन्न वातावरण होते. गणपती दर्शन घेऊन आणि अथर्वशीर्ष म्हणून आम्ही पुढील प्रवासाला निघालो.



थेऊर - चिंतामणी 


गनपती, दुसरा गनपती, आहा

थेऊर गावचा चिंतामनी

कहाणी त्याची लई लई जुनी

काय सांगू, आता काय सांगू

डाव्या सोंडेच नवाल केल सार्‍यांनी, हो सार्‍यांनी

विस्तार ह्याचा केला थोरल्या पेशवांनी, हो पेशव्यांनी

रमाबाईला अमर केल वृंदावनी, हो वृंदावनी

जो चिंता हरतो जगातली त्यो चिंतामनी

भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा 


अष्टविनायक यात्रेतील हा दुसरा गणपती थेऊरचा चिंतामणी थेऊर गावही पुण्या जवळ आहे, पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गावर २२किमी अंतरावर आहे.भीमा-मुळा-मुठा नदी काठी संगमावर वसलेले हे थेऊर गाव. जो चिंता हरतो मनातली तो चिंतामणी अशी या गणपतीची महती आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून देवळाचे महाद्वार उत्तरे कडे आहे. मुर्तीचे डोळे रत्नजडित आहेत. या मंदिरात एक शिव मंदिरही आहे. पेशवेकालीन मंदिर असून 'चिंतामणी' पेशवे घराण्याचे कुलदैवत आहे. माधवराव पेशवे यांनी याच बाप्पाचे नाव घेत शेवटचा श्वास घेतला. येथेच मोरया गोसावी यांनी तपश्चर्या केली आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली ;अशी कथा आहे.

असेच आमचे गणपती दर्शन माहिती आणि अनुभव उद्याच्या भागात पाहू 






आधी वंदू तुज मोरया



आजचा दिवस सहावा 


आज जाणून घेऊ गणपती साठी म्हंटलं जाणाऱ्या अथर्वशीर्ष बद्दल

अथर्वशीर्ष म्हणजे कांय...?

*अथर्वशीर्ष*

थर्व म्हणजे  हलणारे आणि 

अथर्व म्हणजे ' न हलणारे 

शीर्षम् ' !!

हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या या 

गणपती अथर्वशीर्षाचा हा मराठी अनुवाद जरी वाचला, तरी त्या रचनाकाराच्या बुद्धिमत्तेचं आश्चर्य वाटतं.

नमस्कार करण्यासाठी आपले हात सहजपणानं, आदरानं जोडले जातात.

 हे एका व्हाट्सएपच्या ग्रुप वर आलं होतं... 

मला फार आवडलं कारण अथर्वशीर्ष म्हणायला लागल्या पासून इतक्या विस्तारित पद्धतीने त्याचा अर्थ  कधीच समजून घेतला नव्हता.

सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे

अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी

असलेलं मस्तक...!! 

अथर्वशीर्षाचं पठण केलं, की

बुद्धी आणि मन स्थिर होतं.


स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं कांम हे नेहमी यशस्वी होतं.

आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो.

अथर्वशीर्ष पठणामुळं मन एकाग्र होतं. 

आपल्या मनाची ताकद वाढविणं,हे आपल्याच हातात असतं.

माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. 

शरीराबरोबरच मन कणखर असलं तर मग आपण

संकटांवर मात करू शकतो. 


 अथर्वशीर्षामध्ये गणेश

म्हणजे या विश्वातील निसर्ग...!!

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि

आकाश या पंचमहाशक्तीच 

आहे, असे म्हटले आहे. 


हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे

म्हणणं तुमच्या वैज्ञानिक

दृष्टीकोनाला नक्कीच पटेल. 

या निसर्गाला आपण जपलेच

पाहिजे. 

तरच निसर्ग आपणांस जपेल असेही म्हणतां येईल.











अथर्वशीर्षाचा अर्थ        

मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष

संस्कृतमध्ये आहे. 

आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहू या. 


'हे  देवहो, आम्हांला 

 कानांनी 

शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी

चांगलं पाहावयास मिळो. 


सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी

देवानं (निसर्गानं) दिलेलं आयुष्य देवाच्या (निसर्गाच्या) स्तवनांत व्यतीत होवो. 


सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो.

ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण

करतो. 

संकटांचा नाश करणारा गरूड आमचं कल्याण करतो.

बृहस्पती आमचं कल्याण करतो.

सर्वत्र शांती नांदो...!! 


ॐकाररूपी गणेशाला नमस्कार असो.

 तूच  ब्रह्मतत्त्व आहेस. 

तूच सकलांचा कर्ता(निर्माता)

आहेस. तूच सृष्टीचे धारण करणारा, पोषण करणारा आहेस.

तूच सृष्टीचा संहार करणाराही 

आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप 

खरोखर तूच आहेस. 

तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस. 


मी योग्य तेच बोलतो, मी खरं

तेच बोलतो. तू माझे रक्षण कर.

तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं, 

तू रक्षण कर. तुझे नांव श्रवण

करणाऱ्या माझं तू रक्षण कर.

दान  देणाऱ्या अशा माझं तू 

रक्षण कर. उत्पादक अशा, 

माझं तू रक्षण कर.

 तुझी उपासना करणाऱ्या शिष्याचं रक्षण कर.    


माझं पश्चिमेकडून रक्षण कर.

माझं पूर्वेकडून रक्षण कर. 

माझं उत्तरेकडून रक्षण कर. 

माझं दक्षिणेकडून रक्षण कर.

माझं वरून रक्षण कर. 

माझे खालून रक्षण कर. 

सर्व बाजूनीं, सर्वप्रकारे तू 

माझं रक्षण कर. 


तू वेदादी वाड॒.मय आहेस. 

तू चैतन्यस्वरूप आहेस. 

तू ब्रह्ममय आहेस. 

तू सत् , चित् , आनंदस्वरूप,

अद्वितीय आहेस. 

तू साक्षात ब्रह्म आहेस. 

तू ज्ञानविज्ञानमय आहेस. 


हे सर्व जग तुझ्यापासूनच 

निर्माण होतं. हे सर्व जग 

तुझ्या आधारशक्तीनेच 

स्थिर राहातं. 

हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं,

हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं. 

पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्त्वे तूच आहेस.

तसेच परा, पश्यन्ती, मध्यमा

आणि वैखरी या चार वाणी तूच आहेस. 


तू सत्त्व, रज आणि तम या 

तीन गुणांपलीकडचा आहेस. 

तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद 

या तीन देहांपलीकडचा आहेस. 


तू भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचाआहेस. 

तू सृष्टीचा मूल आधार

म्हणून स्थिर आहेस.          


तू उत्पत्ती, स्थिती आणि लय

या तीनही शक्तींच्या पलीकडचा आहेस. 

योगी लोक नेहमी तुझं

ध्यान करतात. 


तूच ब्रह्मा,तूच विष्णू, तूच रुद्र,

तूच इंद्र, तूच भूलोक, 

तूच भुवर्लोक, तूच स्वर्लोक आणि 

ॐ हे सर्व तूच आहेस. 


गण शब्दातील आदि ' ग् ' 

प्रथम उच्चारून नंतर 'अ 'चा

उच्चार करावा. 

त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. 

तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा. 

तो तारक मंत्रानं ॐ कारानं 

युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र 

'ॐगं ' असा होतो. 


हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे. 

'ग्' हे मंत्राचे पूर्व रूप आहे. 

' अ' हा मंत्राचा मध्य आहे.

अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे.

अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे. 

या गकारादी चारांपासून एक नादतयार होतो. हा नादही एकरूप होतो.

 ती ही गणेशविद्या होय. 


या मंत्राचे ऋषी ' गणक ' हे होत. 

'निचृद् गायत्री ' हा या मंत्राचा छंद होय. 

गणपती ही देवता आहे. 


'ॐ गंं ' ह्या मंत्ररूपानं दर्शविल्याजाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो. 

आम्ही त्या एकदंताला जाणतो.

त्या वक्रतुण्डाचं ध्यान करतो.

म्हणून तो गणेश आम्हाला 

स्फूर्ती देवो. 

ज्याला एक दात असून पाश,

अंकुश व दात धारण केलेले तीन हात आणि वर देण्यासाठी चौथाहात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल

असून पोट मोठे आहे, कान

सुपासारखे आहेत, ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत,

अंगाला लाल चंदन लावले आहे,

ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे, भक्तांविषयी पूर्ण दया असलेला, अविनाशी, सृष्टीच्या आधी निर्माण झालेला, प्रकृतिपुरुषाहून वेगळा असलेला,अशा गणेशाचे जो ध्यान करतो,तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय.


व्रतधारिणांच्या प्रमुखांना,

व्रातपतीस नमस्कार असो.

देवसमुदायांच्या अधिपतीला

नमस्कार असो,

शंकरगणसमुदायाच्या 

अधिपतीला प्रमथपति 

नमस्कार असो, 

लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी,

शिवपुत्र, वरदमूर्ती अशा

गणपतीला माझा नमस्कार      
















 ही पोस्ट सुध्दा मला कालच व्हाट्सएपवर मिळाली होती. कसे असते की आपल्याला एखाद्या गोष्टी विषयी माहिती मिळवायची आहे; या भावनेत किती आर्तता आहे त्यावरून आपल्याला तसे लोक भेटतात किंवा तो रस्ता आपल्याला बरोबर सापडतोच. तसेच काही आज झाले आहे.

काही स्तोत्र अन श्लोक आपल्याला अगदी लहानपणा पासूनच तोंड पाठ असतात पण त्यांचे अर्थ किवा त्या मागचा भाव आपल्याला माहित नसतो. मला जे उमजले ते तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटा प्रयत्न समजा. 


अशाच काही बाप्पांच्या आठवणी बघू उद्याच्या भागात




गौराई सोनपावली आली





मुखवट्याच्या उभ्या गौरी 

आजचा दिवस पाचवा 

आज काही जणांकडे पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करतात. आजच्याच दिवशी गौरीचे आवाहन केले जाते. भाद्रपद षष्ठीला गौरी येतात. दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. गौरी-पूजन हे अखंड सौभाग्या साठी केले जाते. गौरी आवाहन आणि पूजन करण्याची पद्धत प्रत्येकाची प्रथे आणि परंपरे प्रमाणे वेगळी असते. काही जण धातूच्या मुखवट्याच्या गौरी आणतात तर काही पाच मडक्याच्या वर मातीचे मुखवटे करून  गौरी पूजतात. काही जण तर नदी काठची किंवा विहिरी काठची पाच दगड गौरी म्हणून पूजतात. 

आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी तेरडा अन आघाड्याची गौर पुजली जायची. माझी आई सांताक्रूझच्या काकांकडे ठाण्याहून गौर घेऊन जायची हे ठरलेलं असायचं...गौरीचे आगमन संध्याकाळीच होतें त्यामुळे आई बँकेतून निघाल्यावर गौर घेऊन ट्रेन आणि बस असा प्रवास करत बरोबर मुहूर्तावर पोहोचायची. आजी आणि काकीने सर्व तयारी करून ठेवलेली असायची. म्हणजे गौरीचे कपडे, वेणी, खण-नारळाची ओटी, दिवे लावलेल ताम्हण, हळद-कुंकू आणि पावलांची तयारी. माझी गौराई सोनपावली आली असे म्हणत तिचं स्वागत केले जायचे. कुंकवाची पावले टाकत गौर घरात यायची आणि तिला सर्व घर फिरवून पाटावर बसवले जायचे. तेरडा-आघाडा या दोन वनस्पतींची गौर असली तरीही त्या दिवशी तीच रूप महालक्ष्मी सारखंच दिसायचं. आजी, आई, काकी आणि इतर सवाष्णी गौराईला हळद-कुंकू, फुल वाहून पूजा करायच्या...त्या दिवशी संध्याकाळी नेवेद्यात पालेभाजी, भाकरी, गोडाचा शिरा, चटणी असे पदार्थ असायचे.

दुसऱ्या दिवशी वरणा-पुरणा चा नेवैद्य असायचा..खूप वर्षा आधी आईकडून ऎकलं होते की आमच्या गौरीला दुसऱ्या दिवशी मटणाचे जेवण असायचे पण गणपती आणि नॉनव्हेज  जेवण करताना सोवळं पाळणे कठीण झाले म्हणून मग आमच्या गौरी गोडाच्या केल्या. तिसऱ्या दिवशी खीर-पुरीचे जेवण असायचे. बोटव्याची खीर ही आमची खासियत. कोणत्याही पूजेला ही खीर केली जातेच. तसाच  पुरणाचा कानोलाही खास. आजीच्या हातच्या या पारंपरिक पदार्थांची चव जिभेवर अजूनही रेंगाळते.

अश्या या माहेरच्या गौराईच्या आठवणी...


तेरडा आणि आघाडा

तेरडा आणि आघाडा वनस्पती 


लग्नानंतर सासरी गणपती गौरी सोबत जाणार असायचे पण आमच्याकडे गौर नव्हती. तरीही सासूबाई गौरीच्या दिवशी खीर-पुरी, काकडीचे घारगे असे नेवेद्याला करायच्या.

याचं दिवशी मला आयुष्यभर लक्षात राहील अशी भेट मिळाली ती म्हणजे मी गौरी पूजनाचे वेळी आई झाले. माझ्याकडे छोटी हसत-खेळत  खरी खुरी गौराई आली तीही बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी जेवायच्या वेळीच. सासर-माहेरी आनंदी आनंद झाला. खुपच खुशीत होतो आम्ही सगळे. आई होणे हा एक अनुभव आहे तो अनुभवावाच लागतो तेव्हा आई होण्याचे महत्व कळते. अशी कायम स्मरणात राहील अशी भेट मला बाप्पा कडून मिळाली..


गौरीची आरती 

सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आई 

ओवाळीते कपूरने भक्त प्रसन्न झाली 

महालक्ष्मी आली 


कुंकवाने घातला सडा, मुखी आहे तांबुल विडा 

हती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेढा 


भाव भक्तीच्या केल्या माला 

घातल्या अंबिकेच्या गळा 

पायी वाजे घुंगर माला 

केला नवरात्रीचा सोहळा 


नेत्रांच्या लावल्या वाती 

पंच्प्रनाच्या या ज्योती 

आरती भक्त गण गाती 

तेथे अम्बिकेची वस्ती 


अम्बिकेची भरली ओटी 

लावली चंदनाची उटी 

कीर्ती तुझी हि जगजेठी 

झाली दर्शनाला दाटी 


सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आई 

ओवाळीते कपूरने भक्त प्रसन्न झाली 

महालक्ष्मी आली 


 असेच माझे या दिवसातील काही अनुभव आणि आठवणी उद्याच्या भागात पाहू...

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...