वसुबारस

 



दिवाळीची सुरवात वसुबारस या दिवसाने होते हे आपल्या सगळ्यांना नव्याने सांगायची आवशक्यता नाही. या दिवसाचे महत्व आणि माहिती जी मला वेगवेगळ्या सोशल साईटस वरून मिळाली आणि संकलित केली गेली ते आपण पाहूच परंतु माझ्या या दिवसाच्या आठवणी खूपच वेगळ्या आहेत. जेव्हा केव्हा पासून मला दिवाळी समजायला लागली तेव्हा पासून दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व आणि पूजा या बद्दल सुद्धा माहिती संग्रहित  करायला आवडू लागली.

आपल्या सगळ्यांना साधारणपणे दिवाळीच्या आठवणी  शाळेत असल्या पासून ताज्या होतात त्या म्हणजे शाळेतला  दिवाळीचा गृहपाठ, कंदील बनवणे, किल्ला तयार करणे, आणलेले फटाके वाळवणे आणि कपाटात ठेवणे. घरातील झाडलोट, नवीन कपड्यांची खरेदी, नातेवाईकांना भेटवस्तू, घरा समोरील गेरुवरची ठिपक्यांची रांगोळी, त्या रांगोळी करता तयार केलेला कागदही आठवला असेलच. (एक एक इंचावर कागदावर उदबत्तीने भोक पाडून तयार केला जात असे), याशिवाय आजी आणि आई यांच्या सोबत केलेली फराळाची मदत. 

आमच्याकडे फराळाची सुरवात बेसन लाडू आणि रवा लाडूनी व्हायची. त्यानंतर सोयी प्रमाणे पदार्थ केले जायचे परंतु कानोले मात्र वसुबारसाच्या दिवशीच केले जायचे आणि तेही नैवेद्य दाखवल्यावर पहिला कानोला आज्जी माझ्या पपांना खाऊ घालायची. हि प्रथाच झाली होती कारण वसुबारस हि माझ्या पापांची वाढदिवसाची तिथी होती. हिच सवय पुढे आईने सुद्धा चालू ठेवली आणि आई नंतर मी आणि माझ्या बहिणींनी सुद्धा पुढे नेली. आजही या दिवसाची आठवण पपांच्या पानातील कानोल्याचीच असते. काही गोष्टी आपल्या मनावर नकळतपणे खूप खोल रुजून जातात. तसेच या दिवसाचेही आहे. वसुबारस आणि आमच्या सीकेपी लोकांचा फराळाचा राजा कानोल्याचे हे अनोखे नाते मी आजही जपते. असो.....

पाहूया या दिवसाचे महत्व 

भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. 

ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.

 श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस !!!! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.

अये म्हणतात, या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो.

उद्या पासून सुरु होणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा



2 comments:

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...