माळ चौथी
नवदुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे.
आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी
असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी
तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. या देवीच्या उपासनेने
आपल्या शरीरातली 'अनाहतचक्र
प्रभावित झालेले असते. अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून
पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या
स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.
तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून
निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या
कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध
आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या
हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या
वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला
सुख, समृद्धी
आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.
देवी ही त्रिगुणात्मक आहे; जी तीन गुणांची स्वामीनी आहे, जी गुणांची संचयिनी आहे.
सत्व
(सकारात्मकता आणणारा गुण) सत्व म्हणजे अशी गुणवत्ता जी स्पष्टता, ज्ञान आणि योग्य कृती करण्यासाठी जबाबदार आहे. जेव्हा सत्व
सभोवतालच्या पर्यावरणात आणि आपल्या शरीरात वर्चस्व करत असते तेंव्हा आपण स्वत:ला
हलके-फुलके, आनंदी, आल्हाददायक, दक्ष आणि सजग अनुभवतो. आपली
आकलनशक्ती स्पष्ट असते.
रजस (क्रियाशीलता आणणारा गुण) रजस हा असा गुण आपल्या शरीर आणि
मनाच्या क्रियाशीलतेला जबाबदार आहे. आपण आपले ‘कर्म’ काही
प्रमाणात रजस शिवाय करू शकत नाही. रजसमध्ये आपले स्वतःचे असे काही गुण आहेत
जेंव्हा ते उरलेल्या दोन गुणांच्या बरोबर समतोल असतात.परंतु जेंव्हा रजस वाढतो
किंवा त्याचे वर्चस्व वाढते तेंव्हा आपल्यामध्ये खूप विचार येतात,आपल्याला अस्वस्थ वाटते, आपल्यामध्ये खूप इच्छा निर्माण होतात आणि खूप गोष्टी कराव्याश्या
वाटतात. तसेच आपण खूप आनंदी आणि उत्सुक असतो किंवा अतिशय ऊर्जाहीन वाटते. हा रजो
गुणांचा परिणाम आहे.
तमस (सुस्ती/ जडत्व आणणारा गुण) तमस हा असा गुण आपल्या शरीरातील व
मनातील संपूर्ण विश्रांतीच्या अवस्थेला जबाबदार आहे.तमसच्या एका विशिष्ट पातळी
शिवाय कोणीही ‘झोपू’ शकत नाही.परंतु जेंव्हा
तमसचा समतोलपणा नसतो तेव्हा भ्रम, चुकीचे समज, निरसता इत्यादी अनुभव
येतात.
नवरात्री मध्ये, प्रथम
तीन दिवस हे तमस ह्या गुणविशेषासाठी मानले जातात आणि देवी ही दुर्गेच्या स्वरुपात
सन्मानित होते. देवी दुर्गेची उपासना प्रथम तीन दिवस केल्याने तामसिक
प्रवृतींमध्ये समतोल साधता येतो. नंतरचे तीन दिवस हे रजस ह्या गुणविशेषचे आहेत. या
वेळी देवी ही लक्ष्मीच्या स्वरुपात उपासली जाते. देवी लक्ष्मीची उपासना केल्याने
राजसिक प्रवृतींचा समतोल साधता येतो. नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस हे सत्व
गुणविशेषाचे आहेत. जेथे देवी सरस्वतीच्या रुपात उपासली जाते. देवी सरस्वतीच्या
उपासनेने आपल्यातील सत्व वाढते. नवरात्रीमध्ये आपली चेतना तमस,रजस ह्या माध्यमातून जाऊन
शेवटच्या तीन दिवसात सत्व गुणात बहरते. तिन्ही गुणांवर उपासना आणि अध्यात्मिक
प्रक्रियांनी विजय मिळवणे आणि अंर्तमन केंद्रीत करणे हा नवरात्रीचा उत्सव साजरा
करण्याचा मुख्य उद्देश आहे.
अश्याच काही मला समजलेल्या देवी बद्दलची माहिती आणि माझे अनुभव
उद्याच्या भागात पाहू.

आधीच्या भागापेक्षा जास्त छान माहिती
ReplyDeleteछान लिहिलयस
ReplyDeleteतमस,रजस,सत्व ची माहिती छान!
ReplyDelete3 गुणांची छान माहीती
ReplyDelete