माळ तिसरी
नवदुर्गा मधील दुसरे रूप ब्रम्हचारिणी म्हणजे ब्रम्हचर्य व्रताचे पालन करणारी आणि विद्यार्थी दशेतील हि कुमारिका अविवाहित आहे. गुरुकुलात राहून तप,त्याग,वैराग्य, सदाचार आणि संयम या सत्व गुणांचे अध्ययन करत आहे. आपल्या माहिती प्रमाणे ब्रम्हचर्य व्रत हे पुरुष मंडळी करतात. परंतु इथे हि ब्रम्ह्चारिता दुर्गा या व्रताचे म्हणजेच त्या विशिष्ट जीवनशैलीचे पालन करत आहे. धैर्य, आत्मसंयम आणि इंद्रियनिग्रह अशा योगी आणि तपस्वी ब्रम्हचारिणी दुर्गाचे वैशिष्ट्य आहेत. पंच महा भूतां पैकी जलतत्व या देवीचे प्रतिक आहे.
नवदुर्गा मधील तिसरे रूप चंद्रघन्टा या देवीच्या एका हातात घन्टा आहे
आणि ती सिंहावर आरूढ झालेली आहे. देवीचे वाहन सिंह यांच्या डरकाळी बरोबर तिने
केलेल्या अद्भुत घंटेचा नाद म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी झालेला; महादेवांनी
निर्माण केलेला आदिनाद आहे. यामुळेच तिला वागेश्वरी म्हणूनही संबोधले जाते. अग्नीतत्व
हे या देवीचे प्रतिक आहे. या देवीच्या साधनेने आपल्या शरीरातील मणिपूरचक्र प्रभावित
होते.
जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे.
देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात
जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा
पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे
विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर
एक भारूड रचले आहे. ते असे-
अनादी निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर मर्दना लागुनी
॥
त्रिविध तापांची कराया झाडणी । भक्तांलागुनी पावसी
निर्वाणी ॥
आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥
हाती बोधाचा झेंडा घेईन । भेदरहित वारिसी जाईन ॥
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा । करुनी पीटी मागेन
ज्ञानपुत्रा ॥
नवरात्रीमध्ये बायका जोगवाही मागतात. जोगव्याची अनेक गाणी आहेत,
‘आईचा
तुळजा, देवही
तुळजा, देवाच्या भगती गोंधुळ
घालिती
खिरी तूप पतरी भरती, आई बसली नवराती,
दहा दिसांची भरती, पाटील पांडेया मिळूनी,
गाव लोक या मिळुनी, शिवलगनाला जाती,
धानाचे तुरे लेती, येतील मांगिणी जोगिणी
हाती कुकाचा करंडा, भांग भरिला मोत्याने,
पतर भरिला तुपाने,’ आणि शेवटी, ‘जोगवा वाढाहो माय’ असे म्हणत असत.
नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजात प्रचलित
आहे. देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या
साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या कला प्रकाराला गोंधळ
घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला
आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक
वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या
आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरु झाली असे मानले जाते.
अश्याच काही मला समजलेल्या देवी बद्दलची माहिती आणि माझे अनुभव उद्याच्या
भागात पाहू.


छान च माहिती आणि जोगवा
ReplyDeleteसुप्रिया
सुंदर माहिती अणि जोगवा पण
ReplyDeleteसुरेख!
ReplyDeleteMaat
ReplyDelete