अश्विन महिना आला कि डोळ्यासमोर येतात देवीची प्रसन्न रूप, रुजवण
केलेला घट, अखंड प्रज्वलित दिवा, सजवलेला गरबा, लाल रंगाची चुनर, खण-नारळाची ओटी,
झेंडू फुलांची माळा, शेवंतीची वेणी, गंध-धूप दीपाचा दरवळ, होम-हवन, सौभाग्याची
लेणी लेवून तयार झालेल्या सवाष्णी, मसाले दुधाचा सुगंध आणि फळांचा आहार.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी हा उत्सव साजरा केला
जातो. शरद ऋतूच्या प्रारंभी येणाऱ्या या नवरात्री उत्सवाला शारदीय नवरात्र
म्हणतात.
देवीची घटस्थापना करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजाअर्चा केली
जाते. अखंड दीप तेवत ठेवला जातो. रोज एक एक झेंडूची फुलमाळ चढवली जाते. देवी
महात्म्य आणि सप्तशती पाठ केले जात्तात. प्रत्येक घराण्याच्या कुलाचारा प्रमाणे देवीचे
टाक किंवा देवी यंत्र पूजले जाते. नऊ दिवस व्रतस्थ राहून आदिशक्तीची आराधना केली
जाते. पंचमी, अष्टमी यादिवशी सवाष्णी आणि कुमारिकांचे पूजन केले जाते.
अशाच या नवरात्रीचे माझे अनुभव आठवणी आणि माहिती मी तुमच्या सोबत
शेयर करू इच्छिते.
माझ्या आठवणी प्रमाणे साधारण तीन ते साडेतीन वर्षाची असल्या पासूनच्या आठवणी आहेत. आमच्यात साडेतीन वर्षाच्या वाढदिवसाला; आत्या, भाचीला परकर-पोलका भेट देते. माझ्या आत्यानी सुद्धा मला साडेतीन वर्षाच्या वाढदिवसाला खणाचा परकर-पोलका शिवला होता आणि त्या वर्षी पासूनच मला आजीच्या माहेरी नवरात्रातील अष्टमीला कुमारिका म्हणून पूजले गेले. मला पहिला मान म्हणून पहिल्या पाटावर बसवले होते. सगळे वाण पहिले मला दिले जात होते. सगळे मला वाकून नमस्कार करतायत, हे सगळे माझ्या बाल मनावर इतके खोलवर रुजले गेले कि आजही त्या आठवणी जाग्या झाल्यावर मला केशर आणि बदाम चारोळी घातलेल्या मसाल्या दुधाचा सुगंध येतो. मामा आजोबांकडचे नवरात्र म्हणजे एक वेगळाच उत्साह असायचा. त्याच्या सविस्तर आठवणी या नऊ दिवसात नकीच सांगितल्या जातील. याच पद्धती माझ्या आज्जीने आमच्या घरी सुद्धा सुरु केल्या. आमच्या घरी टाक किंवा देवी यंत्र नव्हते पण तरी आजी नवरात्रात व्रतस्थ राहून रोज कुन्जीका स्त्रोत्राचे सोळा पाठ करायची. पुढे आई-बाबांनी सुद्धा हीच प्रथा चालू ठेवली. आई तिळाच्या फुलांचे हार आणि देवींना वेण्या घालायची. अखंड दिवा तेवत असायचा. रोज सकाळ संध्याकाळी आमच्याकडे धूपदीप लावून देवीची आरती म्हंटली जायची. गोडाचा नैवेद्य असायचा. रोज कुमारिका आणि सवाष्णीला पूजले जायचे आणि नऊ दिवसातल्या एका रविवारी नऊ सवाष्णी आणि एक कुमारिका असे पूजन केले जायचे. घरात एक वेगळाच प्रकाश जाणवायचा, एक वेगळीच उर्जा निर्माण झालेली अनुभवायला मिळायची ज्याचे आता शब्दात वर्णन करणे अशक्यच आहे.
उद्या पासून देवीची वेगवेगळी रूप आणि त्यांचे महत्व, तसेच विविध
रंगांचे महत्व, देवीची शक्तिपीठे आणि अश्या अनेक माहितीपूर्ण अनुभव लिहायचा प्रयत्न
करणार आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते. तुमचे अभिप्राय नक्कीच वंदनीय
आहेत.

सुंदर
ReplyDeleteVery nice 👌
ReplyDelete👌👌
ReplyDeleteखूप च छान वर्णन केलं आहेस डोळ्यासमोर उभं राहिलं अगदी वातावरण
ReplyDeleteसुप्रिया
छान
ReplyDeleteअतिशय उपयुक्त माहिती
ReplyDeleteखरंच पावित्र्य नांदते ह्या दिवसात, छान लिहिले आहेत
ReplyDeleteWah Chhan
ReplyDeleteWah Chhan
ReplyDelete