आजचा तिसरा दिवस; काल दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन झाले. यावर्षी बऱ्याच जणांनी दीड दिवसांचा गणपती ठेवला होता. आपल्यावरचे हे कोरोना चे सावट लवकरात लवकर नष्ट होऊन सगळे पूर्ववत होउ दे!!! अशीच प्रार्थना सगळ्यांनी केली असणार. आज मला उमजलेल्या ओंकाराच्या आणि स्वस्तिक चिन्हाच्या महत्वा बद्दल जाणून घेऊ.
ओंकार
हा ओंकार तीन अक्षरांचे संयुक्त रुप आहे;
अ-अकार म्हणजे ब्रम्हा; जो सृजन कर्ता आहे. जो उत्पत्ती करतो.
उ-उकार म्हणजे विष्णू; जो पालन कर्ता आहे. जो विकास करतो.
म-मकार म्हणजे महेश ;जो संहार कर्ता आहे. जो मोक्षाची दिशा देतो.
सकारात्मक शक्तीचे रूप म्हणजे ओंकार. प्रत्येक मंत्राची सुरवात ओंमनीच होते...संपूर्ण ब्रम्हांड म्हणजे ओम...
ओम हा एक अनाहत ध्वनी आहे म्हणजे कोणताही नाद करायचा असेल तर दोन गोष्टी एकमेकांवर आपटणे गरजेचे असते. पण ओंकार हा एक स्वतंत्र नाद आहे जो कोणत्याही वस्तूवर आदळून उत्पन्न नाही झाला.
अनादी अनंत रूप म्हणजे ओंकार... म्हणून ओंकार प्रधान रूप गणेशाचे असे म्हंटले जाते. आत्मिकबळ आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ओंकाराचा एकक्षरी जप केला जातो. शरीरातील सप्त चक्र ओंकारानेच जागृत होतात. ओंकाराच्या जपातून निर्माण होणारी कंपने शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार करतात. तिमिरातून तेजाकडे पोहोचवणारा असा हा ओंकार
ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम च्या नमनानी केली आहे.
ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा।।
ओंकाराच्या उच्चराने वाणी तर शुद्ध होतेच पण सम्पूर्ण शरीराची शुद्धि होते. आपल्या शरीरात अनंत कोटी पेशी आहेत. दररोज १०८ वेळा हा एक्काक्षरी बीजमंत्र जपल्याने पेशींना नवचैतन्य मिळते. सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते. या ओंकाराचे पाच तत्व आहेत आणि त्या पाच तत्वांचे पाच रंग आहेत.
अकाराचा रंग पिवळा आणि तो पृथ्वीचे प्रतीक आहे.
उकराचा रंग पांढरा असून तो पाण्याचे प्रतीक आहे.
मकाराचा रंग लाल असून तो अग्नि चे प्रतीक आहे.
अर्धचंद्राकृती रेषेचा रंग निळा असून तो वायू चे प्रतीक दर्शवतो.
वरचा टिम्ब काळा रंगाचा असून तो आकाश तत्व प्रतीत करतो.
स्वस्तिक
हे आपल्या भारतीय संस्कृतीत शुभचिन्ह मानले जाते. कोणत्याही मंगल समयी हे शुभ चिन्ह मुख्य द्वारावर आणि देवाच्या बैठकी खाली काढले जाते. कलशांवर सुद्धा स्वस्तिक काढून त्याची पूजा केली जाते.
सु + अस्ति म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे चिन्ह. कुंकू, हळद किंवा अक्षतांनी हे स्वस्तिक काढले जाते. स्वस्तिकही गणेशाचे रूप आहे असेच मानले जाते. स्वस्तिक म्हणजे ऊर्जा, समृद्धी, धन, वैभव आणि सफलता यांचे प्रतीक आहे.
त्यातील उभी रेष म्हणजे सृष्टीची उत्पती आणि आडवी रेष म्हणजे सृष्टीचा विस्तार.
यातील चार बिंदू म्हणजे चार वेद असे मानले जाते. तसेच काही जण चार बिंदू म्हणजे चार आश्रम मानतात जसे की ब्रम्हचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यास.
चार भुजा म्हणजे चार युग जसे की सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग.
प्रत्येक भुजे वरील चार बाजू म्हणजे चार दिशा किंवा चार जाती ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र.
यावरून स्वस्तिक हे सर्वव्यापी अनंत रूप आहे असेच समजते...
आपल्या घरी शुभ मुहूर्तावर नेहमीच ओंकार आणि स्वस्तिक या दोन्ही उर्जाना फार महत्त्व आहे...आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीच्या असण्याची कारणं आणि त्यांची अभ्यासपूर्ण माहिती व्यवस्थित दिली आहेत.
अजून माझे काही अनुभव आणि बाप्पा विषयी माहिती जाणून घेऊ उद्याच्या भागात....

अतिशय छान माहिती.
ReplyDeleteअशीच चांगली महिती वाचायला मिळेल ही खात्री आहे
नेहमीप्रमाणे छान माहितीपूर्ण ब्लॉग
ReplyDeleteखूपच उपयुक्त माहिती दिलीत..शुभेच्छा
ReplyDeleteखूपच छान माहिती सांगितली आहेस ग
ReplyDeleteसुप्रिया