श्रावणी सोमवार


श्रावणी सोमवार




श्रावणी सोमवारला अध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. 
अनेकजण श्रावणात सोमवारचे व्रत करतात. 
असे म्हणतात देवी पार्वतीने याच महिन्यात 
शिव शंकराना प्राप्त केले म्हणून 
हा महिना भगवान शंकरांना  प्रिय असतो, 
त्यामुळे याच महिन्यात भगवान शंकराची 
व्रत, उपास, उपासना केली जाते. 

माझ्या लहानपणापासून मी हे व्रत आजीने केलेलें पाहिलं आहे. 
अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आजी हे व्रत करायची. 
पहाटे उठून ओलेत्या वस्त्राने देवाची पूजा करायची. 
त्यानंतर देव्हाऱ्यातील शंकराची पिंडी ताम्हणात ठेवून 
त्यावर गधं-अक्षता वाहायची. पांढरे फुलं, 
कापसाचा चौसर, बिल्वपत्र वाहून 
मनोभावे नमस्कार करायची. 
दूध-पाण्याचा अभिषेक होई पर्यंत १०८ वेळा
 "ओम नमः शिवाय" हा जप करायची. 
त्यानंतर ताम्हण पूर्ण स्वच्छ कोरडे करून 
पिंडीवर धान्याचा अभिषेक करायची; 

दर सोमवारी वेगवेगळ्या प्रकारची धान्य असायची. 
जसे तांदूळ, तीळ, मूग, जवस; असे चार सोमवार 
चार धान्य मूठ मूठ पिंडीवर वहात असे...
ते वहात असतानाही ती स्तोत्र म्हणत असे...
ते म्हणजे

‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने ।
शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। 

बहुतेक सर्व व्रत आजी घरीच करीत असे;
तिच्या मानण्या प्रमाणे असे केल्यानं 
एक सकारात्मक परिणाम आपल्या वास्तूत होतो. 
त्यामुळे जितके तुम्ही तुमच्या वास्तूत 
अध्यात्मिक वातावरण ठेवता तितकी 
मनःशांती त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीना मिळते.
अशुद्ध भाव नाहीसे होतात.
पूर्ण दिवस आजीचा उपवास असायचा 
फक्त फळं नि दूध यावर असायची; 
तिन्हीसांजेला मौनात उपवास सोडायची. 


या चार सोमवार पैकी; कधी लघुरुद्र, 
कधी शिवमहिमन्न  तर कधी शिवलीलामृत पाठ केला जायचा. 
माझ्या आठवणी प्रमाणे आमच्याकडे 
तुळपुळे गुरूजी येऊन हे पाठ करायचे. 
आजी त्यांना पिंडीवर वाहिलेली धान्य दान करत असे.

हेच व्रत पण थोडे वेगळ्या पद्धतीने 
माझ्या आई-पपानी पण पुढे चालू ठेवले. 
अतिशय देवभोळे असल्याने वर्षभर 
त्यांची व्रतवैकल्य चालू असायची. 
माझ्या सासरीही अध्यात्मिक वातावरण असायचे.
पूजा-पाठ, व्रत, उपासना हे चालुच असायचे. 

लग्नानंतर पहिली पाच वर्षे मी हे शिवामूठ व्रत केले 
शिवमंदिरात जाऊन गधं, अक्षता, बेल 
आणि दूध-पाणी वाहून झाल्यावर 
पिंडीवर शिवामूठ मी वाहिली आहे. 
ती वाहताना 

"शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरदेवा, 
मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा" असे ३ वेळा म्हणायचे

पूर्ण दिवस उपवास आणि संध्याकाळी शिवकथा वाचून 
नेवैद्य दाखवून उपवास सोडण्यात यायचा. 

यासगळ्या वातावरणाने मन प्रसन्न होते.
आपली सकारात्मक विचार करण्याची क्षमता 
अन मनाची एकाग्रता वाढते. 
आजही अनेकजण इतक्या भक्तीभावाने ही पूजा करतात. 
अनेकजण असेहि आहेत जे त्यांच्या
 दैनंदिन व्यवहारात जप आणि मानसपूजन यावर विश्वास ठेवतात. 

माझे मन मला सांगते जी प्रार्थना मनोभावे केली जाते 
ती ईश्वरचरणी पोहोचतेच आणि 
त्याची प्रचीती आपल्याला वेळोवेळी येत असते. 
।। ओम नमः शिवाय ।।

8 comments:

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...