श्रावणी शुक्रवार
आजचा पहिला श्रावणी शुक्रवार
हिंदू धर्मातील अतिशय सात्विक महिना म्हणजे श्रावण महिना.
या महिन्यात सणांची रेलचेल असते हे आपल्याला माहिती आहेच.
प्रत्येक दिवशीचे महत्व आहे आणि त्याप्रमाणे त्याची व्रतवैकल्ये आहेत.
मला माझ्या लहानपणीचा हा दिवस आठवतो;
एकत्र कुटुंबात वाढल्याने सगळेच सण
मोठया प्रमाणात साजरे केले जायचे.
आजी श्रावणात एक तसबीर देव्हाऱ्यात ठेवायची
या तसबिरी बद्दल माझ्या मनात खूप कुतुहल असायचे
कारण वर्षभर ती दिसायची नाही पण या महिन्यात
मात्र आवर्जून देव्हाऱ्यात ठेवली जायची.
या दिवशी आजी, आई आणि काकी उपास करायच्या.
संध्याकाळी देवापुढे दिवा लावला की
आजी आम्हाला पाटावर बसवायची
आणि वाण म्हणून पुरणाचे कानोले, गोड आरत्या हाती लावायची.
कुमारिका आणि सवाष्ण बायकांना बोलवून
हळद-कुंकू, गजरा किंवा फुल द्यायची.
मग चणे-गुळाचा प्रसाद आणि गोड दूध दिले जायचे.
दर शुक्रवारी हे ठरलेले असायचे.
तेव्हा इतकंच समजायचे की आज वाण मिळणार
आणि सगळ्या मैत्रीण येणार.
मोठे झाल्यावर कळू लागले की हें व्रत
आपल्या मुलांच्या आयु-आरोग्यासाठी केले जाते.
ती तसबिरी जिवंतिका देवीची असते;
जिवती देवी म्हणजे पार्वतीचे रूप
जी आपल्या बाळांचे रक्षण करते.
तिचीच हळद-कुंकू, गजरा वाहून पूजा केली जाते आणि
नेवेद्य म्हणून पुरणाचा कानोला व गोड आरत्या केल्या जातात.
जे आजीने व्रत केले तेच आई आणि काकीने पुढे चालू ठेवले;
त्या अजूनही आम्हाला वाण द्यायला चुकत नाहीत.
लग्नानंतर माझ्या सासूबाई सुध्दा हे व्रत करायच्या
आणि आत्ता मीही हे व्रत करते.
आपण आपल्या संस्कृतिला जपले पाहिजे
आणि ते पुढे चालू राहिले पाहिजे हे महत्त्वाचे.
आता या सगळ्या रूढी, परंपरा, प्रथा बंद होत चालल्या आहेत.
काही तर आजी आजोबांच्या सोबत लोप पावल्या
असे म्हणायला हरकत नाही.
तरीही छोट्या प्रमाणात का होईना
हे सगळे सणवार साजरे केले की आपल्या
पुढच्य पिढीला त्याचे महत्व समजते.
रोजच्या धावपळीच्या जीवनात आनंद मिळतो
घरातील वातावरण प्रसन्न होते
सगळे जण एकत्र येऊन या सणांचा आनंद घेऊ शकतात.
आपल्या सर्वांना श्रावणी शुक्रवारच्या
हार्दिक शुभेच्छा


छान लिहिलं आहेस खरंच आपल्या संस्कृतीला आपण जपलं च पाहिजे
ReplyDeleteछान माहिती....🙏🙏
ReplyDeleteअशी छान माहिती आपल्या सणांच्या निमित्ताने लिहीत जा अशी मागणी.....त्यांची पुढल्या पिढीला ओळख व्हावी ही इच्छा
ReplyDeleteupyukta mahiti
ReplyDeleteKhup Chan, very true,apan he sanskruti japali paheja
ReplyDeleteछान माहिती आहे ही 👍
ReplyDelete