दुर्गापूजन


माळ सातवी 



ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते॥

जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्तिहारिणि।

जय सर्वगते देवि कालरात्रि नमोस्तु ते॥

आजच्या नवदुर्गेतील नाव आहे कालरात्री. या देवीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वाना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कटय़ार) आहे. कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव शुभंकारीसुद्धा आहे. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे, असे मानतात. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे. मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही.

सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। 

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ।।

अश्विन शुद्ध षष्टी पासून बंगाली लोकांचे दुर्गा पूजन आणि देवीचा उत्सव सुरु होतो. दुर्गापूजा हा बंगाली लोकांचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे. सुमारे एक हजार वर्षे बंगालमध्ये हा उत्सव चालू आहे असे मानले जाते. दुर्गापूजेच्या प्रारंभी दुर्गेची मातीची दशभुज मूर्ती बनवितात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असतात. देवीचा सहचर असलेल्या भगवान शंकराला तिच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला स्थान दिलेले असते. दुर्गापूजेच्या उत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध पंचमीला होते. त्या दिवशी संध्याकाळी दुर्गेला प्रिय असणाऱ्या बेलाच्या वृक्षावर तिचे आवाहन करतात. षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अधिवास नामक विधी करतात. यात देवीच्या निरनिराळ्या अंगांना विविध पवित्र वस्तूंनी स्पर्श करतात व त्यांना पावित्र्य आणतात. सप्तमीच्या दिवशी देवीच्या पूजेला सुरुवात होते. प्रथम बेल, डाळिंब, अशोक, हरिद्रा इ. नऊ प्रकारच्या पल्लवांची एक जुडी करतात व ती अपराजिता वल्लीने बांधतात. मग त्या जुडीला स्नान घालून साडी नेसवतात. तिला कलाबहू (कदलीवधू) असे म्हणतात. ती गणपतीची पत्नी असते. उत्सवमूर्तीच्या मांडणीत गणपतीच्या शेजारी तिची स्थापना करतात. त्यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे महास्नानाचा होय. त्यावेळी एका कलशावर आरसा ठेवतात आणि त्यात देवीचे जे प्रतिबिंब पडते, त्यावर स्नानाचे सगळे उपचार समर्पित करतात. देवीच्या स्नानासाठी थंड व उष्ण जल, शंखोदक, गंगाजल, समुद्रजल, इ. जले, पंचगव्य, पंचामृत, आणि गोठा, चौक, वारूळ, नदीचे पात्र इ. ठिकाणची माती आणतात. त्यानंतर देवीची तिच्या परिवारासहित पूजा करतात. मग तिला पशुबळी देतात. पूर्वी हे बलिदान फार मोठ्या प्रमाणावर होत असे, पण सांप्रत त्याचे प्रमाण घटले आहे. अशीच पूजा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही करतात. याशिवाय संधिपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधिकाली करतात.


दुर्गापूजा 

बंगालमधील तारिकपूर भागात ही प्रथा सुरू झाली. बंगालमधून ही प्रथा बनारसला व आसामलाही पोहोचली. तिथून इ.स.१९११मधे दिल्लीत ही पूजा सुरू झाली. सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता, पण सांप्रत त्याला सामाजिक स्वरूप आले आहे.

गृहस्थ सकाळी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करतात. मग सपत्नीक बसून देशकालोच्चारपूर्वक पूजेचा संकल्प करतात. मग गणपतीपूजन, स्वस्तिवाचन इ. करून मातीच्या वेदीवर एका कलशाची स्थापना करतात. मग षोडशोपचारे पूजा करतात. दुर्गेजवळ अखंड दीप तेवत ठेवतात. नंतर दुर्गास्तोत्राचा पाठ करतात. दुर्गेवर फुलांची माळ बांधतात. नंतर एका कुमारिकेचे पूजन करून तिला भोजन घालतात, ब्राह्मण भोजनही घालतात. बंगालमधील अनेक लोक दुर्गेला आपली कुलदेवता मानून तिची नित्य पूजा करतात. ते तिला दुर्गतिनाशिनी म्हणतात. पुराणांत व अनेक तंत्रग्रंथांत दुर्गापूजेचे महत्त्व वर्णिले आहे. अशा प्रकारे दुर्गापूजा घरगुती पातळीवर साजरी केली जाते.

बंगालमध्ये कालीची उपासना प्राचीन कालापासून प्रचलित आहे. पूर्णानंदांचा श्यामारहस्य आणि कृष्णानंदांचा तंत्रसार हे दोन ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. या पूजेत सुरा (मद्य) ही अत्यावश्यक वस्तू मानली आहे. मंत्राने शुद्ध करून तिचे सेवन केले जाते. कालीपूजेसाठी वापरले जाणारे कालीयंत्र त्रिकोण, पंचकोन किंवा नवकोन करावे, असे कालिकोपनिषदात सांगितले आहे. काही वेळा ते पंधरा कोनांचेही करतात. कालीपूजा कार्तिक कृष्णपक्षात, विशेष करून रात्रीच्या वेळी फलप्रद सांगितली आहे. या पूजेत कालीस्तोत्र, कवच, शतनाम आणि सहस्रनाम यांचा पाठ विहित आहे.

देवीने आवश्यकेनुसार विविध अवतार धारण केले, उदा. दुर्गमासुराला नष्ट करण्यासाठी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या देवींचे संयुक्त तत्त्व दुर्गादेवीच्या रूपाने अवतीर्ण झाले. पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या देवींच्या एकत्रित तत्त्वातून वैष्णोदेवीचा अवतार साकार झालेला आहे.’ (कु. मधुरा भोसले यांना ज्ञानातून मिळालेली माहिती) महालक्ष्मीदेवीने श्रीविष्णूच्या रामावताराच्या वेळी सीता आणि कृष्णावताराच्या वेळी रुक्मिणी यांचा अवतार धारण केला होता. महिषासुराला नष्ट करण्यासाठी पार्वतीने महिषासुरमर्दिनीचा अवतार धारण केला.

महिषासुरमर्दिनी

अन्नपूर्णादेवी : पार्वतीमातेने शिव, गणेश, कार्तिकेय आणि शिवगण यांची भूक शमवण्यासाठी अन्नपूर्णादेवीचे रूप धारण करून पक्वाने बनवली. याच अन्नपूर्णादेवीचा वास प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकघरात सूक्ष्मातून असतो.

अन्नपूर्णा देवी 

शताक्षी आणि शाकंभरीदेवी : दुर्गमासुरनावाच्या असुराचा विनाश करण्यासाठी देवीने धारण केलेल्या श्रीदुर्गादेवीच्या रूपातून शताक्षी आणि शाकंभरी’, या उपदेवींची निर्मिती झाली. दुर्गमासुराने वेदांना पाताळात नेऊन ठेवल्यामुळे सर्वत्र धर्मज्ञानाचा लोप होऊन अधर्म बळावला. त्यामुळे अनावृष्टी होऊन सर्वत्र दुष्काळ पडला. दुष्काळामुळे पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या जिवांना पिण्यासाठी पाणी देण्याकरता देवीचे शताक्षीहे रूप कार्यरत झाले. या रूपात देवीच्या शंभर नेत्रांतून वहाणार्‍या अश्रुधारांमुळे पृथ्वीवर विविध नद्यांची निर्मिती झाली आणि दुष्काळाचे संंकट टळले. भक्तजनांची भूक शमवण्यासाठी त्यांना शाक’, म्हणजे वनस्पती मिळाव्यात यासाठी देवीचे शाकंभरीहे रूप कार्यरत झाले. अशाप्रकारे देवीच्या शताक्षी आणि शाकंभरी’, या रूपांनी भक्तांवर आलेल्या आसुरी संकटाचे निवारण केले.

गंगा इत्यादी विविध नद्यांच्या रूपातील देवी. हिंदु धर्मात जलाधिपती म्हणून वरुणदेवाचे वर्णन केले आहे. या जलाचे विराट रूप असणारा सागर समुद्रदेव म्हणून ओळखला जातो आणि विविध नद्या या देवीच्या रूपाने ओळखल्या जातात, उदा. गंगानदी, नर्मदानदी, यमुनानदी इत्यादी.

गोमाता : हिंदु धर्मानुसार गायीला केवळ दूध देणारा प्राणी न मानता गोमाता मानले आहे. गायीच्या उदरात ३३ कोटी देवतांचा वास असतो. त्यामुळे हिंदूंसाठी गोमाता पूजनीय आहे.

कुलदेवी : प्रत्येक मनुष्य ज्या कुळात जन्माला येतो, त्या कुळाची एक प्रमुख देवी किंवा देव असतो. कुलदेवीच्या कृपेमुळे कुळाला ऐहिक आणि पारमार्थिक लाभ होतो. ती कुळाचे रक्षण आणि कल्याण करते. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी तिच्या दर्शनाला जाणे, तिच्या वार्षिक उत्सवात सहभागी होणे आणि तिचे नामस्मरण करणे, अशी उपासना प्रत्येक हिंदूने करणे

धरणी म्हणजे केवळ ग्रह नसून ती धरणीमाताआहे. तिला भूदेवीअसेही संबोधले जाते. श्रीविष्णूच्या श्रीदेवी आणि भूदेवी या दोन पत्नी आहेत.

संबंधित तीर्थक्षेत्र, शक्तीपीठ किंवा जागृत देवस्थाने

उत्तरेतील जम्मू येथील श्री वैष्णोदेवी आणि शारदादेवी, आसाम मधील कामाख्यादेवी, आंध्रप्रदेशमधील बोधन अन् बासर येथील श्री सरस्वतीदेवी, तमिळनाडूतील कांची येथील कामाक्षी, मदुराई येथील मीनाक्षी आणि कन्याकुमारी येथील कन्याकुमारीदेवी, कर्नाटकातील म्हैसुरू येथील चामुंडा, सौंदती येथील रेणुका, अल्लुक्का, मरिय्यम्मा, मुकांबिका, दुर्गापरमेश्‍वरी अन् महाराष्ट्रातील माहूरची रेणुका, तुळजापूरची भवानीमाता, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगीदेवी, गोव्यातील शांतादुर्गा, गुजरात मधील अंबामाता, बंगालमधील कालीमाता आणि तारा, झारखंड राज्यातील छिन्नमस्तिका इत्यादी देवींची मंदिरे सुप्रसिद्ध आहेत.

कलकत्ता येथे दुर्गेचे शक्तिपीठ असून तेथे दुर्गेला काली म्हणतात. आसाममधील कामाख्या हेही एक शक्तिपीठ आहे. या देवतेच्या उपासनेची आणि पूजापद्धतीची माहिती कालिकापुराणात सांगितली आहे. बंगालमधील या उत्सवासाठी मंदिराबाहेर दुर्गेची सिंहारूढ मूर्ती बसवितात. तिचे रूप महिषासुरमर्दिनीचे असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पहिले चार दिवस देवीची सजावट करतात. पाचव्या व सहाव्या दिवशी देवीला आवाहन करून तिची षोडशोपचार पूजा करतात. सात, आठ, नऊ हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानतात. दहाव्या दिवशी देवीला असंख्य पशुबळी अर्पण करतात. काली ही रुधिरप्रिया आहे. देवीची पूजा करून तिला मिरवणुकीने मंदिरात आणतात. उत्सवमूर्तीचे विसर्जन करतात. या काळात दुर्गा माहेरी आलेली आहे, अशी समजूत असल्याने स्त्रिया आपापल्या माहेरी जाऊन हा उत्सव साजरा करतात.

नेपाळमध्येही दुर्गापूजेचा उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस होतो. नवव्या दिवशी शस्त्रांची आणि ध्वजांची पूजा करून देवीला रेड्याचा बळी दिला जातो. बळी दिलेल्या पशूच्या रक्तात हात भिजवून ध्वजांना ते रक्त लावण्याची प्रथा तेथे रूढ आहे.

उत्तर भारतात, विशेषतः बंगालआसाममध्ये दुर्गा ही तांत्रिकांची देवता मानलेली आहे. त्यामुळेच मंत्रतंत्र, पशुबली इ. गोष्टीना या उत्सवात विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जातिजमातींमध्ये दुर्गापूजा केली जाते. प्राचीन शबर जमातीतील या उत्सवात जागरण व नृत्य करीत आणि पशूंना बळी देत. देवीला दिल्या जाणाऱ्या पशुबलींच्या संदर्भात कालिकापुराणाने नरबलीचाही उल्लेख केला आहे. बाणभट्टाने (सातवे शतक) आणि भवभूतीने (आठवे शकत) चंडिकेसमोर दिल्या जाणाऱ्या नरबलीचा उल्लेख केला आहे, तसेच हरिभद्रने (नववे शतक) समराइच्च कहा  नावाच्या ग्रंथात शबरांनी कालीला दिलेल्या नरबळीचा निर्देश केला आहे.

 

 देविमाते बद्दल खूप काही लिहायचे आहे जे अजून पुढच्या भागात वाचायला मिळेल. नवदुर्गेची माहिती मी वाचलेली पुस्तके आणि  काही साईटस वरून लिहिली आहेत. यातील माहिती मिळवताना माझाही अभ्यास होत आहे. 

असेच  काही अनुभव आणि मला समजलेली माहिती उद्याच्या भागात पाहू. 

!!!!!!!!!!! अंबे मात कि जय !!!!!!!!!

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


माळ सहावी - देवीची शक्तिपीठे

 



माळ सहावी

नवदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनीया नावाने ओळखले जाते. देवीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहेतिला चारभुजा आहेतदेवीचा उजव्याबाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातातवर मुद्रा आहेडावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहेतिचे वाहन सिंह आहे. या देवीच्या उपासनेने आपल्या शरीरातील 'आज्ञा चक्रा प्रज्वलित होते. योगसाधनेत या आज्ञाचक्राचे विशेष स्थान आहे

कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थधर्मकाम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होतेतो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतोजो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतोतो रोगभयदु: आणि संतापापासून मुक्त होतोसात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.

या नवदुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. याकात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून यादेवीला कात्यायनी देवी असे नाव पडले.  अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमीअष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायनयांच्या घरी पूजाग्रहण करून दशमीच्यादिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशीही कथापुराणात आहे. कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रज मंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे


 देवीची शक्ती पिठे 

भारतातील शक्ति देवताच्या १०८ शक्तीपिठांपैकी; साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यापैकी  एक कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, दुसरे तुळजापूरचे भवानी देवीचे मंदिर, तिसरे माहूरचे रेणुका मातेचे मंदिर आणि वणीचे सप्तशृंगी देवीचे मंदिर. 

असे म्हणत्तात आई मातेचे बोलावणे आल्या शिवाय योग येत नाही. हो; हे, अगदी खर आहे कारण आपण कितीही ठरवून काही गोष्टी करायच्या ठरवल्या तरीही ती योग्य वेळ आली कि त्या गोष्टी अगदी विनासायास घडून येतात. आमची देवीची दर्शने सुद्धा अशीच झाली. कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन तर आम्ही खूप वेळा घेतलय. पण एका दर्शनाच्या वेळी समजले कि ज्यादिवशी सूर्याची किरणे देवीच्या मुखापासून चरणापर्यंत पडतात त्या दिवशी आम्ही देवीचे दर्शन घेण्यास गेलो होतो. हा योग आमच्या नकळत, ध्यानीमनी नसताना घडून आला होता. 

तुळजापूर भवानी आईचे दर्शन घेण्याचे आम्ही २०१३ मध्ये ठरवले होते पण काही कारणाने ते रद्द करावे लागले आणि त्या नंतर जेव्हा आम्ही २०१८ मध्ये भवानी आईचे दर्शन घेतले तेव्हा लक्षात आले कि आपण २०१३ मध्ये त्याच तारखेची तिकीट बुक केली होती जी आम्ही २०१८ ला दर्शन घेताना होती. हे हि आमच्या नकळतच घडले होते.

वणीचा आणि माहूरचा गड चढायला खूपच कठीण आहे. या दोन्ही गडांवर देवी मातेचे दर्शन घेताना माझे वडील आमच्या सोबत होते. त्यांच्या पायाला प्रचंड दुखापत होती पण तरीही ते डोली न घेता ते पायी दोन्ही गड चढले होते. आमच्यासाठी हा एक चमत्कारच होता. सर्व देवींच्या मंदिर परिसरात खूपच प्रसन्न वातावरण आहे. एक वेगळाच सकारात्मक उर्जेचा प्रभाव जाणवतो. जितके निरागसतेने तुम्ही या देवतांवर श्रद्धा ठेवाल त्याच प्रमाणे तुम्हाला त्यांच्या तिथल्या अस्तित्वाची प्रचीती येते हे मात्र खरे आहे. 

मी नेहेमीच म्हणते जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दयाघना


पाहिलं शक्तिपीठ - कोल्हापूरची अंबाबाई 

कोल्हापूरची महालक्ष्मी 

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.

कोल्हापूर देवी मंदिर परिसर 

 महालक्ष्मी ही विष्णूची भार्या, म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.

दुसरे शक्ती पिठ - तुळजापूरची भवानी माता 


तुळजापूरची भवानी माता

श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.


तुळजापूर मंदिर परिसर 

स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.


तिसरे शक्तीपिठ - माहूरची रेणुका माता  


माहूरची रेणुका माता

 माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत.येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.



माहूर गड 

 कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्निसंस्कार करअसे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले.

 त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूरम्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ऊरम्हणजे गाव ते माऊर आणि पुढे माहूर झाले..!!


चौथे अर्ध शक्तीपिठ - वणीची सप्तशृंगी माता 


सप्तशृंगी माता

 महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.


वणीचा गड

आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.

देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.


देवीच्या १०८ शक्तीपिठांची नावं

 १) विश्वलाक्षी २) लिंगधारिणी ३) ललिता ४) कामाक्षी ५) कुमुदा ६) गोमती ७) कामचारणी ८) मदोत्कटा ९) जयंती १०) गौरी ११) रंभा १२) कार्तीमती १३) विश्वेश्वरी १४) पुरूहुता १५) सन्मार्गदायिनी १६) नंदा १७) भद्रकर्णिका १८) भवानी १९) बिल्वपत्रिका २०) माधवी २१) भद्रा २२) जया २३) कमला २४) रुद्राणी २५) काली २६) कपिला २७) महादेवी २८) जलप्रिया २९) मुकुटेश्वरी ३०) कुमारी ३१) ललिताअंबिका ३२) मंगला ३३) उत्पलाक्षी ३४) महोत्पला ३५) आमोक्षादी ३६) पाडळा ३७) नारायणी ३८) रुद्रसुंदरी ३९) विपुला ४०) कल्याणी ४१) एकवीरा ४२) चंद्रिका ४३) रमणा ४४) मृगावती ४५) कोटवी ४६) सुगंधा ४७) त्रिसंध्या ४८) रतिप्रिया ४९) शुभानंदा ५०) नंदिनी ५१) रुक्मिणी ५२) राधा ५३) देवकी ५४) परमेश्वरी ५५) सीता ५६) विंध्यवासिनी ५७) महालक्ष्मी ५८) उमा ५९) आरोग्या ६०) माहेश्वरी ६१) अभया ६२) नितंबा ६३) मांडवी ६४) स्वाहा ६५) प्रचंडा ६६) चंडिका ६७) वरारोहा ६८) पुष्करावती ६९) देवमाता ७०) परावरा ७१) महाभागा ७२) पिंगळेश्वरी ७३) सिहिका ७४) अतिशांकरी ७५) उत्पला ७६) लोला ७७) लक्ष्मी ७८) अनंगा ७९) विश्वमुखी ८०) तारा ८१) पुष्टी ८२) मेधा ८३) भीमा ८४) तुष्टी ८५) शुद्धिकाया ८६) माता ८७) धरा ८८) धृती ८९) कळा ९०) शिवधारिणी ९१) अमृता ९२) उर्वशी ९३) औषधी ९४) कुशोदका ९५) मन्मंथा ९६) सत्यवादिनी ९७) निधी ९९) गायत्री १००) पार्वती १०१) इंद्राणी १०२) सरस्वती १०३) प्रभा १०४) वैष्णवी १०५) अरुंधती १०६) तिलोतमा १०७) विमला १०८) ब्रह्मकला

 

उद्याच्या भागात पाहू माझे काही अनुभव आणि मला देवीच्या संबंधी समजलेली माहिती 

 

 


माळ पाचवी - ललिता पंचमी






पाचवी माळ

नवदुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.

स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या दुर्गेच्या पूजनाने आपल्या शरीरातील विशुद्ध चक्र प्रज्वलित होते.

ललिता पंचमी 

नवरात्रोत्सवात ललिता पंचमी हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे. याला उपांग ललिता व्रतही म्हणतात. अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा करतात. या पूजाविधीमुळे विद्या, धन, संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होते.

ललिता पंचमी हे व्रत धनप्राप्ती, विद्या प्राप्ती तसेच सर्व इच्छा पूर्ती होण्यासाठी केले जाते. या दिवशी स्त्रिया रात्री एकत्र जमून देवीची गाणी आरती करतात. स्वतःच्या परसदारी तयार झालेल्या कोवळ्या काकड्या आणि दूध असा रात्री प्रसाद म्हणून खाण्याची पद्धत आहे. या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा अठ्ठेचाळीस दुर्वांची एक याप्रमाणे अठ्ठेचाळीस दुर्वांच्या जुड्या करून मातेला अर्पण करण्याची प्रथा आहे.

जप करणे मंत्र हे ऊर्जेने युक्त असतात.सर्व शब्दांशी शक्ती, ऊर्जा संलग्न असते. जर तुमचा कोणी एखाद्या अप्रिय,कटू शब्दाने अपमान केला तर त्याचा तुमच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि जर कोणी तुमची प्रशंसा, स्तुती केली, तुम्हाला सुंदर किंवा दयाळू म्हटले तर तुमच्यात काहीतरी मानसिक उन्नती झाल्यासारखे वाटते.

मंत्र ह्या अतिशय प्राचीन ध्वनीलहरी आहेत.त्यांच्या बरोबर त्या सखोल आणि परिवर्तन करणारी उर्जा घेवून येतात. आणि पूर्वापार, हजारो वर्षांपासून तेच मंत्र म्हटले जात असल्यामुळे त्यांचात अतिशय शक्ती आहे.

आपल्या रोजच्या जीवनात, आपण वेगवेगळ्या क्रियांमध्ये अडकलेले असतो. शिवाय येथे सतत आपल्या मनात विविध प्रकारचे विचार सुरु असतात-जसे झगडणे, निर्णय घेणे इत्यादी. नवरात्र हि अशी एकच वेळ आहे की ज्यावेळी आपण ह्या सर्व प्रवृत्ती बाजूला ठेवून आपल्या मूळ स्त्रोत्राशी एक होऊ शकतो.   

ध्यान ध्यान तुम्हाला स्वत:च्या अंतर्मनाकडे आणि मनाच्या पलीकडे घेऊन जाते. हा तुम्हाला तुमच्या आत्म्याकडे, सत्वाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. म्हणून नवरात्रीमध्ये दररोज ध्यान करा. ध्यानामुळे तुमचे शरीर सामर्थ्यवान-स्वस्थ,मन शुद्ध आणि भावना मृदू,सौम्य आणि सकारात्मक होतात.तुमची अंत:प्रेरणा वाढते,तुमच्यातील ऊर्जा लहरी आणि सभोवतालची सकारात्मक ऊर्जा वाढते.जर तुम्ही एकत्र येऊन समूहामध्ये ध्यान केलेत तर तो यज्ञ होतो.जेंव्हा एकत्र समुहामध्ये ध्यान केले जाते तेंव्हा त्याचे फायदे जास्त अनुभवास येतात.कारण एकत्रित ध्यानात तुमच्या ऊर्जेचा स्तर त्वरित उंचावतो.

 

अश्याच काही मला समजलेल्या देवी बद्दलची माहिती आणि माझे अनुभव उद्याच्या भागात पाहू.



शेरोवाली मां !!!!!!!!!!!!!!

 



माळ चौथी  

नवदुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. या देवीच्या उपासनेने आपल्या शरीरातली 'अनाहतचक्र प्रभावित झालेले असते. अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.

देवी ही त्रिगुणात्मक आहे; जी तीन गुणांची स्वामीनी आहे, जी गुणांची संचयिनी आहे.  

सत्व (सकारात्मकता आणणारा गुण) सत्व म्हणजे अशी गुणवत्ता जी स्पष्टता, ज्ञान आणि योग्य कृती करण्यासाठी जबाबदार आहे. जेव्हा सत्व सभोवतालच्या पर्यावरणात आणि आपल्या शरीरात वर्चस्व करत असते तेंव्हा आपण स्वत:ला हलके-फुलके, आनंदी, आल्हाददायक, दक्ष आणि सजग अनुभवतो. आपली आकलनशक्ती स्पष्ट असते.

रजस (क्रियाशीलता आणणारा गुण) रजस हा असा गुण आपल्या शरीर आणि मनाच्या क्रियाशीलतेला जबाबदार आहे. आपण आपले कर्मकाही प्रमाणात रजस शिवाय करू शकत नाही. रजसमध्ये आपले स्वतःचे असे काही गुण आहेत जेंव्हा ते उरलेल्या दोन गुणांच्या बरोबर समतोल असतात.परंतु जेंव्हा रजस वाढतो किंवा त्याचे वर्चस्व वाढते तेंव्हा आपल्यामध्ये खूप विचार येतात,आपल्याला अस्वस्थ वाटते, आपल्यामध्ये खूप इच्छा निर्माण होतात आणि खूप गोष्टी कराव्याश्या वाटतात. तसेच आपण खूप आनंदी आणि उत्सुक असतो किंवा अतिशय ऊर्जाहीन वाटते. हा रजो गुणांचा परिणाम आहे.

तमस (सुस्ती/ जडत्व आणणारा गुण) तमस हा असा गुण आपल्या शरीरातील व मनातील संपूर्ण विश्रांतीच्या अवस्थेला जबाबदार आहे.तमसच्या एका विशिष्ट पातळी शिवाय कोणीही झोपूशकत नाही.परंतु जेंव्हा तमसचा समतोलपणा नसतो तेव्हा भ्रम, चुकीचे समज, निरसता इत्यादी अनुभव येतात.

नवरात्री मध्ये, प्रथम तीन दिवस हे तमस ह्या गुणविशेषासाठी मानले जातात आणि देवी ही दुर्गेच्या स्वरुपात सन्मानित होते. देवी दुर्गेची उपासना प्रथम तीन दिवस केल्याने तामसिक प्रवृतींमध्ये समतोल साधता येतो. नंतरचे तीन दिवस हे रजस ह्या गुणविशेषचे आहेत. या वेळी देवी ही लक्ष्मीच्या स्वरुपात उपासली जाते. देवी लक्ष्मीची उपासना केल्याने राजसिक प्रवृतींचा समतोल साधता येतो. नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस हे सत्व गुणविशेषाचे आहेत. जेथे देवी सरस्वतीच्या रुपात उपासली जाते. देवी सरस्वतीच्या उपासनेने आपल्यातील सत्व वाढते. नवरात्रीमध्ये आपली चेतना तमस,रजस ह्या माध्यमातून जाऊन शेवटच्या तीन दिवसात सत्व गुणात बहरते. तिन्ही गुणांवर उपासना आणि अध्यात्मिक प्रक्रियांनी विजय मिळवणे आणि अंर्तमन केंद्रीत करणे हा नवरात्रीचा उत्सव साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.

अश्याच काही मला समजलेल्या देवी बद्दलची माहिती आणि माझे अनुभव उद्याच्या भागात पाहू.


 

 


आईचा जोगवा मागेन !!!!!!!!!!!!

 

माळ तिसरी 


नवदुर्गा मधील दुसरे रूप ब्रम्हचारिणी म्हणजे ब्रम्हचर्य व्रताचे पालन करणारी आणि विद्यार्थी दशेतील हि कुमारिका अविवाहित आहे. गुरुकुलात राहून तप,त्याग,वैराग्य, सदाचार आणि संयम या सत्व गुणांचे अध्ययन करत आहे. आपल्या माहिती प्रमाणे ब्रम्हचर्य व्रत हे पुरुष मंडळी करतात. परंतु इथे हि ब्रम्ह्चारिता दुर्गा या व्रताचे म्हणजेच त्या विशिष्ट जीवनशैलीचे पालन करत आहे. धैर्य, आत्मसंयम आणि इंद्रियनिग्रह अशा योगी आणि तपस्वी ब्रम्हचारिणी दुर्गाचे वैशिष्ट्य आहेत. पंच महा भूतां पैकी जलतत्व या देवीचे प्रतिक आहे.



नवदुर्गा मधील तिसरे रूप चंद्रघन्टा या देवीच्या एका हातात घन्टा आहे आणि ती सिंहावर आरूढ झालेली आहे. देवीचे वाहन सिंह यांच्या डरकाळी बरोबर तिने केलेल्या अद्भुत घंटेचा नाद म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी झालेला; महादेवांनी निर्माण केलेला आदिनाद आहे. यामुळेच तिला वागेश्वरी म्हणूनही संबोधले जाते. अग्नीतत्व हे या देवीचे प्रतिक आहे. या देवीच्या साधनेने आपल्या शरीरातील मणिपूरचक्र प्रभावित होते.

जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे. ते असे-

अनादी निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥

त्रिविध तापांची कराया झाडणी । भक्तांलागुनी पावसी निर्वाणी ॥

आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥

हाती बोधाचा झेंडा घेईन । भेदरहित वारिसी जाईन ॥

नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा । करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा ॥

नवरात्रीमध्ये बायका जोगवाही मागतात. जोगव्याची अनेक गाणी आहेत,

आईचा तुळजा, देवही तुळजा, देवाच्या भगती गोंधुळ घालिती

खिरी तूप पतरी भरती, आई बसली नवराती,

दहा दिसांची भरती, पाटील पांडेया मिळूनी,

गाव लोक या मिळुनी, शिवलगनाला जाती,

धानाचे तुरे लेती, येतील मांगिणी जोगिणी

हाती कुकाचा करंडा, भांग भरिला मोत्याने,

पतर भरिला तुपाने,’ आणि शेवटी, ‘जोगवा वाढाहो मायअसे म्हणत असत.

नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजात प्रचलित आहे. देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या कला प्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरु झाली असे मानले जाते.

अश्याच काही मला समजलेल्या देवी बद्दलची माहिती आणि माझे अनुभव उद्याच्या भागात पाहू.

 

 

 

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...