माळ सहावी
नवदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनीया नावाने ओळखले जाते. देवीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चारभुजा आहेत. देवीचा उजव्याबाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातातवर मुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे. या देवीच्या उपासनेने आपल्या शरीरातील 'आज्ञा’ चक्रा प्रज्वलित होते. योगसाधनेत या आज्ञाचक्राचे विशेष स्थान आहे.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.
या नवदुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. याकात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून यादेवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायनयांच्या घरी पूजाग्रहण करून दशमीच्यादिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशीही कथापुराणात आहे. कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रज मंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे.
देवीची शक्ती पिठे
भारतातील शक्ति देवताच्या १०८ शक्तीपिठांपैकी; साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यापैकी एक कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, दुसरे तुळजापूरचे भवानी देवीचे मंदिर, तिसरे माहूरचे रेणुका मातेचे मंदिर आणि वणीचे सप्तशृंगी देवीचे मंदिर.
असे म्हणत्तात आई मातेचे बोलावणे आल्या शिवाय योग येत नाही. हो; हे, अगदी खर आहे कारण आपण कितीही ठरवून काही गोष्टी करायच्या ठरवल्या तरीही ती योग्य वेळ आली कि त्या गोष्टी अगदी विनासायास घडून येतात. आमची देवीची दर्शने सुद्धा अशीच झाली. कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन तर आम्ही खूप वेळा घेतलय. पण एका दर्शनाच्या वेळी समजले कि ज्यादिवशी सूर्याची किरणे देवीच्या मुखापासून चरणापर्यंत पडतात त्या दिवशी आम्ही देवीचे दर्शन घेण्यास गेलो होतो. हा योग आमच्या नकळत, ध्यानीमनी नसताना घडून आला होता.
तुळजापूर भवानी आईचे दर्शन घेण्याचे आम्ही २०१३ मध्ये ठरवले होते पण काही कारणाने ते रद्द करावे लागले आणि त्या नंतर जेव्हा आम्ही २०१८ मध्ये भवानी आईचे दर्शन घेतले तेव्हा लक्षात आले कि आपण २०१३ मध्ये त्याच तारखेची तिकीट बुक केली होती जी आम्ही २०१८ ला दर्शन घेताना होती. हे हि आमच्या नकळतच घडले होते.
वणीचा आणि माहूरचा गड चढायला खूपच कठीण आहे. या दोन्ही गडांवर देवी मातेचे दर्शन घेताना माझे वडील आमच्या सोबत होते. त्यांच्या पायाला प्रचंड दुखापत होती पण तरीही ते डोली न घेता ते पायी दोन्ही गड चढले होते. आमच्यासाठी हा एक चमत्कारच होता. सर्व देवींच्या मंदिर परिसरात खूपच प्रसन्न वातावरण आहे. एक वेगळाच सकारात्मक उर्जेचा प्रभाव जाणवतो. जितके निरागसतेने तुम्ही या देवतांवर श्रद्धा ठेवाल त्याच प्रमाणे तुम्हाला त्यांच्या तिथल्या अस्तित्वाची प्रचीती येते हे मात्र खरे आहे.
मी नेहेमीच म्हणते जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दयाघना
पाहिलं शक्तिपीठ - कोल्हापूरची अंबाबाई
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्या अर्थाने महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.
महालक्ष्मी ही विष्णूची भार्या, म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.
दुसरे शक्ती पिठ - तुळजापूरची भवानी माता
श्री क्षेत्र
तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात
वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे
प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने
सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना
करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.
स्वराज्य
स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने
शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना
दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली
होती, अशी
आख्यायिका आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ
गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी
हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ
दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.
तिसरे शक्तीपिठ - माहूरची रेणुका माता
माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून
येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम
यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत.येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता
होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक
परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन
राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी
भाविकांची श्रद्धा आहे.
कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव
रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले.
जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी
कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने
जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी
जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून
जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे
आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली.
पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात
जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो
माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली
व ‘इथेच
पित्यावर अग्निसंस्कार कर’ असे
सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या
पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली.
या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले.
त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ
लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ‘तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. ‘परंतु परशुरामाची उत्सुकता
चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच
जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळा रूपातल्या मुखाचीच
माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. शेजारच्या
आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले..!!
चौथे अर्ध शक्तीपिठ - वणीची सप्तशृंगी माता
महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे
पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचावरील
सप्तशृंगगडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश
म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी
ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.
आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन् होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.
देवीच्या
अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने
सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी
खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती
सापडली, अशीही एक
दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या
महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित
असून, रक्तवर्ण
आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी
महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.
देवीच्या १०८ शक्तीपिठांची नावं
१) विश्वलाक्षी २) लिंगधारिणी ३) ललिता ४) कामाक्षी
५) कुमुदा ६) गोमती ७) कामचारणी ८) मदोत्कटा ९) जयंती १०) गौरी ११) रंभा १२)
कार्तीमती १३) विश्वेश्वरी १४) पुरूहुता १५) सन्मार्गदायिनी १६) नंदा १७)
भद्रकर्णिका १८) भवानी १९) बिल्वपत्रिका २०) माधवी २१) भद्रा २२) जया २३) कमला २४)
रुद्राणी २५) काली २६) कपिला २७) महादेवी २८) जलप्रिया २९) मुकुटेश्वरी ३०) कुमारी
३१) ललिताअंबिका ३२) मंगला ३३) उत्पलाक्षी ३४) महोत्पला ३५) आमोक्षादी ३६) पाडळा
३७) नारायणी ३८) रुद्रसुंदरी ३९) विपुला ४०) कल्याणी ४१) एकवीरा ४२) चंद्रिका ४३)
रमणा ४४) मृगावती ४५) कोटवी ४६) सुगंधा ४७) त्रिसंध्या ४८) रतिप्रिया ४९) शुभानंदा
५०) नंदिनी ५१) रुक्मिणी ५२) राधा ५३) देवकी ५४) परमेश्वरी ५५) सीता ५६)
विंध्यवासिनी ५७) महालक्ष्मी ५८) उमा ५९) आरोग्या ६०) माहेश्वरी ६१) अभया ६२)
नितंबा ६३) मांडवी ६४) स्वाहा ६५) प्रचंडा ६६) चंडिका ६७) वरारोहा ६८) पुष्करावती
६९) देवमाता ७०) परावरा ७१) महाभागा ७२) पिंगळेश्वरी ७३) सिहिका ७४) अतिशांकरी ७५)
उत्पला ७६) लोला ७७) लक्ष्मी ७८) अनंगा ७९) विश्वमुखी ८०) तारा ८१) पुष्टी ८२)
मेधा ८३) भीमा ८४) तुष्टी ८५) शुद्धिकाया ८६) माता ८७) धरा ८८) धृती ८९) कळा ९०)
शिवधारिणी ९१) अमृता ९२) उर्वशी ९३) औषधी ९४) कुशोदका ९५) मन्मंथा ९६) सत्यवादिनी
९७) निधी ९९) गायत्री १००) पार्वती १०१) इंद्राणी १०२) सरस्वती १०३) प्रभा १०४)
वैष्णवी १०५) अरुंधती १०६) तिलोतमा १०७) विमला १०८) ब्रह्मकला
उद्याच्या भागात पाहू माझे काही अनुभव आणि मला देवीच्या संबंधी समजलेली माहिती














