माळ दुसरी - अंबे माते कि जय !!!!!

आज दुसरा दिवस 



माळ दुसरी – अंबे माते कि जय !!!!!!!!!!!!!

देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून; दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

पाहिली नवदुर्गा शैलपुत्री म्हणजे पर्वत कन्या, हि वृषभावर आरूढ आहे. या देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. हि देवी बालिका स्वरूप असूनही सक्षम आणि सबला आहे याचे प्रतिक म्हणजे तिच्या उजव्या हातातले त्रिशूळ आणि कमळ म्हणजे तिच्या अलौकिक ज्ञानाचे आणि उर्जेचे प्रतिक आहे. हिमालायची कन्या असलेल्या या शैलपुत्री देवीला शुभ्रवस्त्र शुभ्र फुला आणि पांढऱ्या गोड पदार्थाचा नेवेद्य अर्पण केला जातो. पर्वत कन्या असल्याने पंचमहाभूतातील पृथ्वीतत्त्व हे  तिचे प्रतिक आहे.   

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाजगटांत आहे.

पहिली माळ - शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ

दुसरी माळ - अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.

तिसरी माळ - निळी फुले. गोकर्णीच्या किंवा |कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.

चौथी माळ - केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

पाचवी माळ - बेल किंवा कुंकवाची वाहतात..

सहावी माळ - कर्दळीच्या फुलांची माळ.

सातवी माळ - झेंडू किंवा नारिंगीची फुले.

आठवी माळ - तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.

नववी माळ - कुंकुमार्चन करतात.

नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. रंगांची कल्पना एकोणिसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती.

उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी,

चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा,

मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल

बुधवारचा निळा,

गुरुवारचा पिवळा,

शुक्रवारचा हिरवा, आणि

शनिवारचा करडा.  

अश्याच काही मला समजलेल्या देवी बद्दलची माहिती आणि माझे अनुभव उद्याच्या भागात पाहू.

 

 


उदे ग अंबे उदे !!!




अश्विन महिना आला कि डोळ्यासमोर येतात देवीची प्रसन्न रूप, रुजवण केलेला घट, अखंड प्रज्वलित दिवा, सजवलेला गरबा, लाल रंगाची चुनर, खण-नारळाची ओटी, झेंडू फुलांची माळा, शेवंतीची वेणी, गंध-धूप दीपाचा दरवळ, होम-हवन, सौभाग्याची लेणी लेवून तयार झालेल्या सवाष्णी, मसाले दुधाचा सुगंध आणि फळांचा आहार.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी हा उत्सव साजरा केला जातो. शरद ऋतूच्या प्रारंभी येणाऱ्या या नवरात्री उत्सवाला शारदीय नवरात्र म्हणतात.

देवीची घटस्थापना करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजाअर्चा केली जाते. अखंड दीप तेवत ठेवला जातो. रोज एक एक झेंडूची फुलमाळ चढवली जाते. देवी महात्म्य आणि सप्तशती पाठ केले जात्तात. प्रत्येक घराण्याच्या कुलाचारा प्रमाणे देवीचे टाक किंवा देवी यंत्र पूजले जाते. नऊ दिवस व्रतस्थ राहून आदिशक्तीची आराधना केली जाते. पंचमी, अष्टमी यादिवशी सवाष्णी आणि कुमारिकांचे पूजन केले जाते.

अशाच या नवरात्रीचे माझे अनुभव आठवणी आणि माहिती मी तुमच्या सोबत शेयर करू इच्छिते.

माझ्या आठवणी प्रमाणे साधारण तीन ते साडेतीन वर्षाची असल्या पासूनच्या आठवणी आहेत. आमच्यात साडेतीन वर्षाच्या वाढदिवसाला; आत्या, भाचीला परकर-पोलका भेट देते. माझ्या आत्यानी सुद्धा मला साडेतीन वर्षाच्या वाढदिवसाला खणाचा परकर-पोलका शिवला होता आणि त्या वर्षी पासूनच मला आजीच्या माहेरी नवरात्रातील अष्टमीला कुमारिका म्हणून पूजले गेले. मला पहिला मान म्हणून पहिल्या पाटावर बसवले होते. सगळे वाण पहिले मला दिले जात होते. सगळे मला वाकून नमस्कार करतायत, हे सगळे माझ्या बाल मनावर इतके खोलवर रुजले गेले कि आजही त्या आठवणी जाग्या झाल्यावर मला केशर आणि बदाम चारोळी घातलेल्या मसाल्या दुधाचा सुगंध येतो. मामा आजोबांकडचे नवरात्र म्हणजे एक वेगळाच उत्साह असायचा. त्याच्या सविस्तर आठवणी या नऊ दिवसात नकीच सांगितल्या जातील. याच पद्धती माझ्या आज्जीने आमच्या घरी सुद्धा सुरु केल्या. आमच्या घरी टाक किंवा देवी यंत्र नव्हते पण तरी आजी नवरात्रात व्रतस्थ राहून रोज  कुन्जीका स्त्रोत्राचे सोळा पाठ करायची. पुढे आई-बाबांनी सुद्धा हीच प्रथा चालू ठेवली. आई तिळाच्या फुलांचे हार आणि देवींना वेण्या घालायची. अखंड दिवा तेवत असायचा. रोज सकाळ संध्याकाळी आमच्याकडे धूपदीप लावून देवीची आरती म्हंटली जायची. गोडाचा नैवेद्य असायचा. रोज कुमारिका आणि सवाष्णीला पूजले जायचे आणि नऊ दिवसातल्या एका रविवारी नऊ सवाष्णी आणि एक कुमारिका असे पूजन केले जायचे. घरात एक वेगळाच प्रकाश जाणवायचा, एक वेगळीच उर्जा निर्माण झालेली अनुभवायला मिळायची ज्याचे आता शब्दात वर्णन करणे अशक्यच आहे.

उद्या पासून देवीची वेगवेगळी रूप आणि त्यांचे महत्व, तसेच विविध रंगांचे महत्व, देवीची शक्तिपीठे आणि अश्या अनेक माहितीपूर्ण अनुभव लिहायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते. तुमचे अभिप्राय नक्कीच वंदनीय आहेत. 




लॉकडाउन तमाशा






जीवनावश्यक गोष्टी मिळतील बाकी सगळे बंद ठेवले जाईल असे जाहीर केले जाते. या काळात काय चालू असणार हे सांगितले जाते दूध,मेडिसिन इतकंच चालू राहील आणि बाकी सगळे बंद असेल ; घरात धान्याचा भाजीपाल्याचा साठा  करण्यासाठी व्यवस्थित वेळ शासनाने दिलेला असतो.

घरातच राहा बाहेर पडू नका हेच या दिवसात अपेक्षित असते पण तरीही काही महाभाग स्वतःच्या अतिहुशारीने नव्हे अतिशहाणपणाने ने घर बाहेर पडतातच. 

लॉक डाउन सुरू झाला 23 मार्च 2020 ला त्यानंतर न्युज चॅनेल्स नी कोण कुठे या लॉकडाउनचा फज्जा उडवतय हे दाखवायला सुरवात केली आणि गांभीर्याने ज्या गोष्टींची दखल घ्यायला हवी त्या अतिशय हास्यास्पद पद्धतीने दाखवल्या गेल्या.

पोलिस कर्मचारी वर्ग;  जे  दिवस-रात्र न पाहता कामावर रुजू होते त्यांना ही न जुमानता हे अतिशहाणे महाभाग रोज मॉर्निंग वॉक काय घेतात, रोज भाजीपाला आणायला बाहेर काय जातात, रोज वाणी सामानसाठी काय जातात. या सगळ्याची माहिती न्यूज चॅनल्स व्यवस्थित दाखवत होते. 

या महारथींना लाठ्या मारल्या तरी त्रास होऊ लागला. शेवटी हताश होऊन पोलीस कर्मचारी वर्गाने त्याची चक्क आरती ओवाळणी करायला सुरुवात केली. गांधीगिरीचा अवलंब करून सुध्दा हे सुधारले नाहीतच. हेही आपण पाहिलं.  

जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना त्यात कित्येक जण पिझ्झा बेस आहे का?? बेकिंग सोडा द्या ना, custurd आहे का?? पनीर, चीज, चिली फ्लेक्स, ओरिगणो या वस्तू घेत असायचे. या जीवनावश्यक वस्तू आहेत हे आताच लक्षात आले. 

कोणी म्हणालं दारूची दुकाने उघडा कारण अर्थ व्यवस्था व्यवस्थित होईल. जी दारूच्या दुकाना समोर झुंबड उडाली होती. न्यूज चॅनेल्स नी दाखवली. पहिली ना आपण घरी बसून;  मस्त चर्चेचा विषय होता तो. त्यानंतर साधारण 10 ते 15 दिवस देशाने दारूच्या माध्यमातून किती कमावले ह्याची चर्चा केली. 

लॉकडाउन संपत आला की माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा माननीय पंतप्रधान साहेब येऊन लॉकडाऊन वाढलाय आणि तो का वाढवलाय तर तुम्ही सुरक्षित राहावेत या साठी हे अत्यंत उत्तम प्रकारे आपल्याला पटवून देत होते. 

नक्कीच योग्य होते ते; या विषाणू सोबत लढताना घरा बाहेर न पडणे हेच महत्वाचे आहे हे ज्यांना समजले ते तुमच्या आमच्या सारखे खरंच शासनाच्या शिस्तीत राहूनच वागले. त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या प्रमाणे सगळेच नियम पाळले. का? तर सगळे सुरळीत चालू व्हावे.

पण काही जणांच्या निष्काळजीपणाने हे सगळं हाता बाहेर जाऊ लागले आणि परत लॉकडाउन वाढवावा लागला. एकदा दोनदा नाही तर पाच ते सहा वेळा लॉकडाउन वाढवला  गेला.

रुग्ण वाढतायत म्हणून हा लॉक डाउन वाढवला जातोय मान्य आहे. पण कडक लॉक डाउन हा चक्क जोक झाला आहे. खरंच लोकं कितीही प्रयत्न करून काहींना काही क्षुल्लक कारणे देऊन बाहेर पडतायत आणि प्रशासन त्यावर कडक कारवाई का करत नाही.

अशा लोकांना सरळ तुरुंगात डांबून ठेवा नाही तर हॉस्पिटलमध्ये टॉयलेट्स साफ करायला ठेवा. 

खरंच हा कडक लॉकडाउन  सुरवातीलाच हास्यास्पद न होऊन देता काटेकोरपणे पाळला गेला असता तर कदाचित ही वेळ आली नसती.

माननीय साहेब; आम्ही जे तुमचे नियम पाळतो, आमचे व्यवसाय, उद्योगधंदे बंद करून सगळ्या नियमांची अंमलबजावणी करतो, आमची ऑफिसेस बंद आहेत, पगार बंद आहेत या सगळ्याचा विचार करावा आणि या लॉक डाउनला अतिशय कडक रित्याच बंद ठेवावा. अत्यंत कळकळीची विनंती आहे की या वेळी जो लॉकडाउन आपण वाढवला आहे तो कडक रीतीने त्याचे पालन करण्यात यावे आणि जे लोक पाळणार नाहीत त्याच्यावर सुचवलेली कार्यवाही करण्यात यावी. 

मध्यमवर्गीय यात भरडला जातोय...



राममारुती माऊली करी कृपेची साऊली



राम मारुती महाराज देवस्थान (कल्याण )


माझ्या वडिलांनी सद्गुरू श्री राममारुती महाराज यांच्या आठवणी त्यांच्या वहीत लिहून ठेवलेल्या होत्या त्याच मी इथे लिहिल्या आहेत. 

श्री राममारुती महाराजांचा उत्सव भाद्रपद व. प्रतिपदा ते भाद्रपद व. नवमी असा नऊ दिवस साजरा केला जातो. या नऊ दिवसात भजन, कीर्तन, नामजप, महाप्रसाद असे सर्व आयोजित करण्यात येते. 

माझे पणजोबा श्री वामनराव रामचंद्र प्रधान हे पूर्ण गुरुकृपा लाभलेले सतपुरुष होते. त्यांना अनेक सत पुरुषांचा सहवास लाभला होता. त्यापैकी श्री सद्गुरू वाघदेव महाराज आणि श्री सद्गुरू गाडगे महाराज व श्री राममारुती महाराज. पणजोबा आणि श्री सद्गुरू राम मारुती महाराजांची भेट कधी आणि केव्हा झाली हे नमूद केलेले नाही. पण महाराजांनी पणजी आज्जी आणि पणजोबांना एका बंद खोलीत यथासांग पूजे नंतर अनुग्रह दिला होता व तुझ्या घराण्यावर माझी कृपा राहील असे वचनही दिले होते. श्री सद्गुरू राम मारुती महाराज दादर मुक्कामी असलेल्या माझ्या पणजोबांकडे नेहमी येत असत. माझ्या दोन आत्या आजींना त्यांच्या कृपेचा लाभ झाला होता. 

महाराज हे बाल ब्रम्हचारी होते. त्यांचे मूळ नाव श्री रामजी देशपांडे आणि श्री शंकर हे पाळण्यातील नाव. मूळ नक्षत्रात त्यांचा जन्म झाला त्यामुळे घरातील मंडळी चिंतेत असत.  महाराजांचे वय ५-६ असताना त्यांच्या वडिलांना मोठा आजार झाला होता. महाराजांच्या मामांचे सदगुरू श्री बाल मुकुंद स्वामी यांची मामांवर कृपा होती. एकदा अचानक स्वामी मामांना भेटायला आले तेव्हा राजाराम पंत  (श्री सदगुरू राम मारुती महाराजांचे वडील) यांचा आजार व महाराजांचा मूळ नक्षत्रात झालेला जन्म या सर्व गोष्टी सांगितल्या. महाराजांच्या मातोश्री सौ. सीताबाई यांनी श्री राम मारूती महाराजांना स्वामींच्या चरणावर ठेवले; तेव्हा श्री परमगुरू बाल मुकुंद स्वामीं म्हणाले "आता हा आमचा मुलगा आहे; तुम्ही याचा सांभाळ निर्भयपणे करा" आणि श्री राजाराम पंतांना आशिर्वाद देऊन आजार बरा होईल असे अभय दिले. पुढे राजाराम पंतांना आराम पडून ते कामावर रुजू झाले. 

श्रीराममारुती महाराज मोठे होताना त्यांच्या वृत्तीत खूपच फरक पडला. त्यांचे खेळ देवाशी निगडित असत, मंदिरात जाणे, कीर्तनाला जाणे, शंकर किंवा राम मंदिरात एकटे जाऊन बसणे. शाळेत जाताना दप्तरात तुकाराम महाराजांची गाथा नेणे. असे जगावेगळे कार्य सुरू झाले व त्याचा प्रत्यय शिक्षकांना येऊ लागला. श्री महाराज आठ वर्षाचे असताना नाशिक जवळील टाकळी येथे समर्थ मठातील गंगाधर महाराज नावाचे सत पुरुष आले होते; त्यांनी महाराजांना जवळ बोलावून त्यांच्या कानात काही सांगितले तेव्हा पासून महाराजांच्या बाल वृत्तीत व बाह्यवर्तनात फरक झाला. 

महाराजांचे नाव शंकर असूनही श्री गंगाधर महाराज त्यांना रामजी म्हणून संबोधू लागले. तेव्हा पासून महाराज रामजीच झाले. राजाराम पंतांची बदली पेण ला झाली अन महाराज पेण मुक्कामी आले. तिथे दिवसेंदिवस मंदिरात रहाणे, कथा कीर्तनात रंगुनी जाणे, पालखी समोर लोळणे, उंच उड्या मारणे असे भक्तीचे प्रकार दिसू लागले. एकदा भगवंताच्या चिंतनात असताना महाराजांच्या कानात एक मंजुळ आवाज कानी पडला " मुंबईत श्री बालमुकुंदस्वामी आहेत; त्यांच्याकडे तू जा कृतार्थ होशील" असे ऐकताच महाराजांना गुरू दर्शनाचा ध्यास लागला. ती संधी लवकरच चालून आली. महाराज मामानं सोबत मुंबईत गुरूंच्या भेटीला आले. 

आत्म्याचे परमात्म्या सोबत मिलन व्हावे तसे सद्गुरू अन सतशिष्याचे मिलन घडले. 

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । 

तेथेचि जिव्हाळा तेथे बिंबे ।। 

शिष्याची आस ही गुरूंना लागलेली असते. श्री सद्गुरू बाल मुकुंद स्वामींनी महाराजांना योगाभ्यासासाठी हिमालयात नेले १०-१२ वर्ष तपसाधना करवुन त्यांनी पूर्ण गुरू कृपेचा प्रसाद दिला व आपल्या कडील सर्व श्री महाराजांना देऊन त्यांना "राममारुती" हे नामभिदान दिले. या नावात "नाम व नामी" हा अतूट सबंध दाखविला आहे. "राममारुती" या नावात "राम" हे नाम आहे आणि "मारुती" हे नामी म्हणजे नाम घेणारा आहे. तसेच देव आणि भक्त असाही अतूट सबंध इथे दिसून येतो.  श्रीबालमुकुंद स्वामींनी श्री राम मारुती महाराजांना आपल्या कडील सर्व योग दिक्षा देऊन योगी स्थितीला नेऊन ठेवले; त्यात उपजत भक्तीचा अखंड ठेवा घेऊन आलेल्या श्री राममारुती महाराजांनी अविरत प्रयत्नांनी, साधनेने परमसुख अशी सहजवस्थेतील समाधी स्थिती प्राप्त केली. ते सतत अजपा-जपात श्रीराम नामात रत असत.

श्रीराम नामा बद्दल असे म्हणतात

 राम एवं परब्रह्म राम एवं परम तप:। 

राम एवं परम तत्व श्रीरामो ब्रह्म तारकम।। 

श्रीराम या पदाने परब्रह्म अभिप्रेत आहे. या पासून होणारा प्रणव मोक्षदायी व तत्वमसि रूप आहे. 

"र" कार हे तप्तदवाच्य परमेश्वर,  "म" कार हे त्व पदवाच्य जीव आणि "आहेस" हा अर्थ ज्या पदाने होतो ते अस्तिपद म्हणजे "अ" होय. 

राम या नावात "र" कार हे अग्निबीज आहे. हे मनोमलाच नाश करते. 

"अ" कार हे सूर्य बीज आहे हे तम म्हणजे अज्ञानाचा नाश करते. 

"म" कार चन्द्र बीज हे त्रिविध ताप हरण करून शीतलता उत्पन्न करते. 

रकार वैराग्य हेतू, अकार हा ज्ञान हेतू,व मकार हा भक्ती हेतू 

ह्याचमुळे हे राम नाम वैराग्य, ज्ञान व भक्ती प्राप्त करून देते.  

रामनामा सोबत आता मारुती या नामा बद्दलही माहिती घेणे क्रमप्राप्त आहेच. 

मारुती हे दास्य भक्तीचे सर्वोच्च स्थान होय. ब्रम्हचारी, प्रतापी, बुद्धिवान, ज्ञानी व आदर्श राम भक्त आणि दास म्हणजे "श्रीमारुतीराय". असे म्हणतात की राम- रावण युद्धात विश्रांतीच्या काळातही श्रीमारुतीराय श्रीरामचिंतनरत असत. रोमारोमात श्री राम असलेले श्रेष्ठ भक्त श्री मारुती रायांना श्रीरामानी चिरंजीव पद दिले होते. श्रीमारुतीराय हे रुद्रावतार होते. 

अश्या नाम श्रीराम व नामी श्री मारुती राय ह्या दोघांचे नाव धारण करणारे म्हणजे "श्री राममारुती महाराज"

श्रीराम मारूती माऊली करी कृपेची साऊली या भजन नामस्मरणाने महाराजांची कृपा आम्हा भक्तांवर सदैव राहो.

 श्री राम मारुती महाराजांना "गोविंद रामा गोपाळ रामा" हे भजन नामस्मरण खूप आवडायचे. 

महाराजांच्या उत्सवात नवमीच्या दिवशी म्हणजे प्रयाण काळीच्या दिवशी वातावरण अष्टसात्विक भाव जागृत करून भक्तास शाश्वत-अशाश्वत गोष्टींची जाणीव करून देणारे असते. प्रयाण काळीच्या भजनानंतर समाधीवरील सर्व दिवे मालवतात. गाभाऱ्यात समाधी जवळ निरांजनी लावतात. जितकी वर्ष तितक्या निरंजन लावतात. धूप घालून महाराजांच्या समाधीवर बरोबर सव्वा पाच वाजता राम मारुती माऊली करी कृपेची साऊली ह्या गजरात गुलाल व फुले उधळली जातात. समाधीवर एक ईश्वरीय वातावरण अनुभवयास मिळते. सगळेच या मंत्रमुग्ध वातावरणात तल्लीन होऊन जातात.


प्रयाण काळानंतरची पालखी

 या संस्थेचे संस्थापक श्री शिरीष गडकरी काका यांच्या आणि इतर मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक जण महाराजांच्या चरणी आपली सेवा वाहून कृपेचा आशिर्वाद घेत असतात. आमच्या प्रधान घराण्यावर महाराजांच्या  कृपेची साऊली अखंड राहो अन त्यांची सेवा आमच्या कडून सदैव होत राहो हीच प्रार्थना. 

माझ्या आई-वडिलांना आणि बहिणीला या उत्सवात मंदिरात राहून  सेवा अर्पण करण्याची संधी मिळाली. तसेच माझे काका आजोबा-आजी अजूनही हा उत्सव वयोमानानुसार आणि तब्येती नुसार आता जसा जमेल तसा साजरा करतात. आमच्या कडे श्री राम मारुती महाराजांच्या उत्सवात लोणी-साखरेचा नेवैद्य दाखवला जायचा. घरात नऊ दिवस खूप प्रसन्न वातावरण असायचे. महाराजांची आरती आणि भजन नाम स्मरण "गोविंद रामा गोपाळ रामा" हे रोज म्हंटलं जायचे. 

राम मारुती महाराजांची आरती 

जय देव जय देव श्री राम मारुती राया  

ओवाळू आरती तुजला गुरुवर्या (धृ)

कायस्थ प्रभू ज्ञाती घेऊन अवतार राम मारुती नामे सगुणी संचार 

ब्रम्हाचर्य व्रत अखंड साचार श्वासोश्वासी राम मंत्र उच्चार (१)

बाल मुकुंद जाता कैवल्य धामी भाषा त्याज्ली वाणी अर्पियली नामी 

शिव शिव विठल मारुती जय जय श्रीराम 

सहजावस्थी ओमकार उमटे सप्रेम (२)

कीर्तन भजना रंगी प्रेम अनिवार आनंदे डुल्लत देह विसर 

हुंकार उड्डाणे घेउनी अपार दासा भास्वीला हा मारुती अवतार (३)

निजदासा दावूनिया नाव भक्ती सार ज्ञानामृत पाजुनिया नेले त्या पार 

शांती सुख आनंद जेथे अपार तया स्थानी नेऊन केले त्या स्थिर (४)

भाद्र कृष्ण नवमी अठराशे चाळीस शनिवारी गार्गी निजधामी वास 

आरती ओवाळी रेमे हा दास दर्शन देऊनी तया पुरवावी आस (५)

श्री च्या चरित्रा मधून कै. गुप्ते (कुलाबकर) लिखित 


"गोविंद रामा गोपाळ रामा"



Shri Sant Ram Maruti Maharaj Samadhi Sanstha Kalyan

Ram Maruti road,
Ram Maruti Chowk,
Kalyan West - 421 301
Tel: 0251-2207002 / 2201112
Email: info@rammarutimaharaj.org
URL: www.rammarutimaharaj.org

 


शिक्षक.... मनातले

                                                

               गुरू ब्रम्हा गुरू विष्णु गुरू देवो महेश्वरा  

गुरू साक्षात परब्रम्ह तस्मिये श्री गुरवे नमः 

आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन निमित्त लिहाव म्हणून माझ्या नेहमीच्या जागी बसले, वही ,पेन,माझे डेस्क आणि गरम चहाचा कप; सुरवात नेहमी सारखीच सुचली...

आयुष्याचा ग म भ न गिरवायला ज्यांनी पहिले शिकवले ते म्हणजे माझे आई-वडील, काका-काकी, आज्जी-आजोबा यांना माझ्या कडून मानवंदना. खर तर हे नमन मी मनात रोजच करत असते. तसेच माझे सगळे शिक्षक; अगदी मोन्तेसारी पासून ते लास्ट एअर Bsc पर्यंतच्या सगळ्याच टीचर्सना मनापासून मानवंदना. 

सर्वात पहिले आपले गुरु,शिक्षक म्हणजे आई-वडील. त्या नंतर शिक्षक हेच आपले गुरू असतात; शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्य, सामाजिक बांधिलकी, शिस्त, एकमेकांना साहाय्य करणे तसेच एकमेकांच्या साहाय्याने काही कामे करणे, सामुहिक बळाचे महत्व आणि एकात्मता. या सर्वच गोष्टी आपण शालेय जीवनात शिकत असतो. ज्याचे सर्व श्रेय फक्त आपल्या शिक्षकांनाच जाते. आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. 

आपण पाहुयात या दिवसाची सुरुवात कुठून आणि कशी झाली. 




डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. १९६२  मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. साधरण विसाव्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. भारतामध्ये सर्वात आधी १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. आपल्याकडे जरी हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. पाच ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन असतो. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. 

आज गुरु-शिष्य नात्याचे संदर्भही बदलले. मात्र अद्याप बदलले नाही ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करताना आपल्या विद्यार्थ्याला यशोशिखरापर्यंत पोहचविण्याचे शिक्षकांचे ध्येय . याचा अर्थ असा होत नाही की पूर्वीचे शिक्षक दर्जेदार नव्हते. संस्कारक्षम पिढी घडविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी आवश्यक अध्यापन पद्धतीचा त्यांनी स्वीकार केलेला असावा आणि त्यात काही गैरही नव्हते . समाज व विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून शिक्षकाच्या भूमिका सद्यस्थितीला बदलत आहेत . मात्र आजही एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे या नात्याचे माहात्म्य, त्यातला जिव्हाळा. याच निमित्ताने  गुरू-शिष्याच्या नात्याचे विविध धागे उलघडण्याचा हा प्रयत्न.

आपल्याला शिक्षणाचे महत्व अगदी पुरातन काळा पासूनच माहित आहे. द्रोणाचार्यांच्या गोष्टी आपण लहानपणा पासूनच एकत आलोय; त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या गोष्टी हि आपण एकल्या ,वाचल्या आहेतच. प्रत्येक गुरु-शिष्यात आपण एक आदरयुक्त भीती किवा शिस्त, दरारा पहिला आहेच. या शिक्षकांमुळेच वक्तशीरपणा हि अंगिकारला जायचा. गुरुबंधून मध्ये हि एक चढाओढीची  चुरस असायची. 

त्यानंतर "छडी लागे छम छम विद्या येई घम घम" असे हि विद्यार्थी अन शिक्षकांचे नाते पहिले गेले. आमच्या काळात  शिक्षक म्हटले की आठवते ती त्यांची छडी! विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आदर तर होताच पण तेवढीच भीतीही असायची. शिक्षकांसमोर बोलायचे कसे हा मोठा प्रश्न असायचा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मर्यादेतच राहावं अशी त्याकाळच्या शिक्षकांची भूमिका असायची. शिक्षकांना विद्यार्थ्यांनी प्रत्युत्तर करता कामा नये. असं कोणा विद्यार्थ्यांकडून झालंच की मग त्या विद्यार्थ्यांची खैर नसायची. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक आदरयुक्त अंतर होतं.

याच वेळेस Learn with Fun आणि Play way Method या प्रकारच्या पद्धती अवलंबल्या गेल्या. ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक या नात्यातील जवळीक आणि मैत्री वाढू लागली . विद्यार्थी आपल्या मनातील प्रश्न आणि रोजच्या व्यवहारातील शंका हि शिक्षकां समोर मांडू लागले. शिस्त आणि जिव्हाळा यातील समतोल व्यवस्थित सांधला जाऊ लागला. त्यानंतर आलेल्या संगणक युगानेहि शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडवले. शिक्षकांनाही याचे वेगळे प्रशिक्षण घेणे गरजेचे होऊ लागले. मुलां मधील Creativity पालक आणि शिक्षकां समोर येऊ लागली.

आजची शिक्षण पद्धती प्रचंड चुरशीची आणि स्पर्धात्मक झाली आहे. एकसुरी अभ्यास, पुढे मुलाला/मुलिला इंजिनियरिंग/मेडिकलला घालायचे. (त्याच्या खालची कोणतीही पदवी खालच्या दर्जाची मानली जावी बहुतेक) एम बी ए, परदेशी पोस्ट ग्रॅज्युएशन करता यावं म्हणून पालक मुलांना आत्ता पासून त्या भयंकर 'रॅट रेस' मध्ये अक्षरश: ढकलून देतात. कारण आजच्या मार्कांवर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. पुढच्या सगळ्या अ‍ॅडमिशन्स अवलंबून आहेत. पण या अशा 'बर्डनसम' पालकांच्या वागण्यामुळे मुलांचं निरागस भावविश्व कुठे तरी लोप पावत चाललंय. तसेच काही पालक तर मुलांवर Extra Activities च्या नावा खाली वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेण्यास भाग पाडत असतात. त्यामुळे त्याचे हि मुलांवर असलेले दडपण शिक्षकांना दिसून येत असते.

 आत्ताच्या या लॉकडाऊनच्या काळात तर प्रत्येक स्तरावर सर्वच अचानकपणे बदलून गेले. मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आधी शिक्षकांची तारांबळ उडाली. कारण अचानक समोर आलेले हे एक प्रकारचे चलेंज होते; नव्हे  अजूनही आहेच. प्रथम स्वतःची गुगल मीट साठी तयारी आणि नंतर विद्यार्थ्यांना सिलाबस प्रमाणे एक एक धडे पूर्ण करून घेणे हे सगळे सोपं नाही. प्रत्येक वेळी घरी असताना ऑनलाईन क्लास्सेस ची वेळ साधणेहि कठीण असायचे. तरीही यात विद्यार्थी आणि शिक्षक यातील दुवा जास्त घट्ट होत जात आहे असेच दिसते. आता संगणकाची जागा मोबाईल आणि स्मार्टफोन घेत आहेत. निरनिराळ्या Aaps वरून विद्यार्थ्यंना आणि पालकांना सगळ्याच विषयांचे प्रशिक्षण घेता येऊ लागले आहे. यामुळे शिक्षकांनाही रोजच्या रोज या सगळ्या गोष्टींचे updates ठेवणे आणि त्या अनुषंगाने त्या त्या विषयांची माहिती मिळवणे गरजेचे झाले आहे. आता कित्येक गोष्टींचे प्रोजेक्ट्स तयार करणे आणि विद्यार्थ्यानकडून करून घेणे ह्याही गोष्टी शिक्षक अगदी सहजरीत्या करत आहेत.


शिक्षक आपल्याला योग्य ज्ञान देतात, मार्ग दाखवतात आणि समाजातील एक जबाबदार व्यक्ती बनवतात. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा महत्वाचा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून त्यांना भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपण सर्वानीच आपल्या शिक्षकांना मानवंदना दिली पाहिजे.

तसेच इथे अजून एक नमूद करावेसे वाटते ते म्हणजे आपण स्वतः सुद्धा स्वतःचे शिक्षक असतो. अनेक प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला कसं सावरायचे, खंबीरपणे कसे उभ रहायचे. वाईट मार्गाने न जाता चांगल्या मार्गावर कसे चालायचे हे लहानपणी शिकलेले असतोच पण त्यावर कायम कसे रहायचे, कोणत्याही लोभात,मोहात न अडकता निर्मळ आयुष्य कसे जगायचे हे प्रत्येक वेळी आई-वडील आणि गुरु शिकवत नसतात ते आपल्याला आपलेच अनुभवातून शिकायला लागते. आपल्या आयुष्यभरात जे जे लोक भेटतात ते ते आपल्याला काहीना काही चांगल्या गोष्टी शिकवून जात्तात. त्या सर्वांनाच माझी आजच्या शिक्षक दिनी मानवंदना


आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा



शिक्षकदिन


श्रीरंग विद्यालय (इंग्रजी माध्यम)


 गुरू ब्रम्हा गुरू विष्णु गुरू देवो महेश्वरा  I

गुरू साक्षात परब्रम्ह तस्मिये श्री गुरवे नमः II

सर्वात पहिले आपले गुरु,शिक्षक म्हणजे आई-वडील. त्या नंतर शिक्षक हेच आपले गुरू असतात; शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्य, सामाजिक बांधिलकी, शिस्त, एकमेकांना साहाय्य करणे तसेच एकमेकांच्या साहाय्याने काही कामे करणे, सामुहिक बळाचे महत्व आणि एकात्मता. या सर्वच गोष्टी आपण शालेय जीवनात शिकत असतो. ज्याचे सर्व श्रेय फक्त आपल्या शिक्षकांनाच जाते. आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. 

आपण पाहुयात या दिवसाची सुरुवात कुठून आणि कशी झाली. शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. साधरण विसाव्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. भारतामध्ये सर्वात आधी १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. आपल्याकडे जरी हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. पाच ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन असतो. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. 


डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. १९६२  मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांचा जन्म मद्रासजवळील तिरुराणी येथे झाला. ते ब्राम्हन कुळातील असल्याने त्यांच्या घरात नेहमी धार्मिक विधी केला जात असे. त्या धार्मिक वातावरणातच ते लहानाचे मोठे झाले. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. 'तत्त्वज्ञान' हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी 'वेदांतातील नीतिशास्त्र' या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला. एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वत:ची सार्‍या जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळे पार परदेशा‍त त्यांची प्रशंसा झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठातही ते 'नीतिशास्त्र' या विषयाचे प्राध्यापक होते.

आपल्याला शिक्षणाचे महत्व अगदी पुरातन कला पासूनच माहित आहे. द्रोणाचार्यांच्या गोष्टी आपण लहानपणा पासूनच एकत आलोय; त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या गोष्टी हि आपण एकल्या ,वाचल्या आहेतच. प्रत्येक गुरु-शिष्यात आपण एक आदरयुक्त भीती किवा शिस्त, दरारा पहिला आहेच. या शिक्षकांमुळेच वक्तशीरपणा हि अंगिकारला जायचा. गुरुबंधून मध्ये हि एक चढाओढीची  चुरस असायची. 

त्यानंतर "छडी लागे छम छम विद्या येई घम घम" असे हि विद्यार्थी अन शिक्षकांचे नाते पहिले गेले. आमच्या काळात  शिक्षक म्हटले की आठवते ती त्यांची छडी! विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आदर तर होताच पण तेवढीच भीतीही असायची. शिक्षकांसमोर बोलायचे कसे हा मोठा प्रश्न असायचा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मर्यादेतच राहावं अशी त्याकाळच्या शिक्षकांची भूमिका असायची. शिक्षकांना विद्यार्थ्यांनी प्रत्युत्तर करता कामा नये. असं कोणा विद्यार्थ्यांकडून झालंच की मग त्या विद्यार्थ्यांची खैर नसायची. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक आदरयुक्त अंतर होतं.

आजची शिक्षण पद्धती प्रचंड चुरशीची आणि स्पर्धात्मक झाली आहे. एकसुरी अभ्यास, पुढे मुलाला/मुलिला इंजिनियरिंग/मेडिकलला घालायचे. (त्याच्या खालची कोणतीही पदवी खालच्या दर्जाची मानली जावी बहुतेक) एम बी ए, परदेशी पोस्ट ग्रॅज्युएशन करता यावं म्हणून पालक मुलांना आत्ता पासून त्या भयंकर 'रॅट रेस' मध्ये अक्षरश: ढकलून देतात. कारण आजच्या मार्कांवर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. पुढच्या सगळ्या अ‍ॅडमिशन्स अवलंबून आहेत. पण या अशा 'बर्डनसम' पालकांच्या वागण्यामुळे मुलांचं निरागस भावविश्व कुठे तरी लोप पावत चाललंय. तसेच काही पालक तर मुलांवर Extra Activities च्या नावा खाली वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेण्यास भाग पाडत असतात. त्यामुळे त्याचे हि मुलांवर असलेले दडपण शिक्षकांना दिसून येत असते.


    






आज गुरु-शिष्य नात्याचे संदर्भही बदलले. मात्र अद्याप बदलले नाही ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करताना आपल्या विद्यार्थ्याला यशोशिखरापर्यंत पोहचविण्याचे शिक्षकांचे ध्येय . याचा अर्थ असा होत नाही की पूर्वीचे शिक्षक दर्जेदार नव्हते. संस्कारक्षम पिढी घडविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी आवश्यक अध्यापन पद्धतीचा त्यांनी स्वीकार केलेला असावा आणि त्यात काही गैरही नव्हते . समाज व विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून शिक्षकाच्या भूमिका सद्यस्थितीला बदलत आहेत . मात्र आजही एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे या नात्याचे माहात्म्य, त्यातला जिव्हाळा. याच निमित्ताने  गुरू-शिष्याच्या नात्याचे विविध धागे उलघडण्याचा हा प्रयत्न.

भारतीय समाजव्यवस्थेची बिघडलेली घडी व्यवस्थित बसविण्यासाठी तत्कालीन शिक्षकांनी अंगीकारलेली पद्धती त्या काळाला साजेशीच होती किंबहुना ती त्या काळाची गरजच होती. परंतु आता समाजाच्या व देशाच्या गरजा बदलत आहेत. आजच्या विद्यार्थ्यांकडून देशाच्या अपेक्षा वाढल्या आलेत. विद्यार्थ्यामधून कारकून निर्माण करण्यापेक्षा शास्त्रज्ञ ,उद्योजक घडविण्याचे ध्येय आजच्या शिक्षण पद्धतीने ठरवून दिले आहे यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकाचे निरसन लहान वयातच होणे अनिवार्य आहे , त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी त्यांच्या सर्व प्रश्नांची उकल त्यांना होणे आवश्यक आहे .शिक्षकांशी त्यांचे वर्तन जर मित्रत्वाचे असेल तरच आपल्या सर्व शंकाचे निरसन ते करून घेऊ शकतात. यासाठीच बदलत्या काळाबरोबर शिक्षकांनीही बदलाव लागत आहे. 

याच वेळेस Learn with Fun आणि Play way Method या प्रकारच्या पद्धती अवलंबल्या गेल्या. ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक या नात्यातील जवळीक आणि मैत्री वाढू लागली . विद्यार्थी आपल्या मनातील प्रश्न आणि रोजच्या व्यवहारातील शंका हि शिक्षकां समोर मांडू लागले. शिस्त आणि जिव्हाळा यातील समतोल व्यवस्थित सांधला जाऊ लागला. त्यानंतर आलेल्या संगणक युगानेहि शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडवले. शिक्षकांनाही याचे वेगळे प्रशिक्षण घेणे गरजेचे होऊ लागले. मुलां मधील Creativity पालक आणि शिक्षकां समोर येऊ लागली. 


आत्ताच्या या लॉकडाऊनच्या काळात तर प्रत्येक स्तरावर सर्वच अचानकपणे बदलून गेले. मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आधी शिक्षकांची तारांबळ उडाली. कारण अचानक समोर आलेले हे एक प्रकारचे चलेंज होते; नव्हे  अजूनही आहेच. प्रथम स्वतःची गुगल मीट साठी तयारी आणि नंतर विद्यार्थ्यांना सिलाबस प्रमाणे एक एक धडे पूर्ण करून घेणे हे सगळे सोपं नाही. प्रत्येक वेळी घरी असताना ऑनलाईन क्लास्सेस ची वेळ साधणेहि कठीण असायचे. तरीही यात विद्यार्थी आणि शिक्षक यातील दुवा जास्त घट्ट होत जात आहे असेच दिसते. आता संगणकाची जागा मोबाईल आणि स्मार्टफोन घेत आहेत. निरनिराळ्या Aaps वरून विद्यार्थ्यंना आणि पालकांना सगळ्याच विषयांचे प्रशिक्षण घेता येऊ लागले आहे. यामुळे शिक्षकांनाही रोजच्या रोज या सगळ्या गोष्टींचे updates ठेवणे आणि त्या अनुषंगाने त्या त्या विषयांची माहिती मिळवणे गरजेचे झाले आहे. आता कित्येक गोष्टींचे प्रोजेक्ट्स तयार करणे आणि विद्यार्थ्यानकडून करून घेणे ह्याही गोष्टी शिक्षक अगदी सहजरीत्या करत आहेत.



शिक्षक आपल्याला योग्य ज्ञान देतात, मार्ग दाखवतात आणि समाजातील एक जबाबदार व्यक्ती बनवतात. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा महत्वाचा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून त्यांना भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपण सर्वानीच आपल्या शिक्षकांना मानवंदना दिली पाहिजे.

आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा





ओणाम

 


मला या सणाबद्दलची खास आस्था म्हणजे आमच्या शेजारीच दोन मल्याळम family राहायच्या त्यांच्या मुळेच हा सण कसा साजरा करतात हे कळायचे. त्यांच्या त्या टिपीकल केरळी पांढर्या आणि सोनेरी बोर्डरच्या साड्यांचे तसेच अबोली अन मल्लिगे चे लांबलचक गजरे, कपाळावरचे गंध, कानातील मोठे झुमके गळ्यातील लक्ष्मी हार आणि पोवळ्याचे दागिने. त्यांचे सकाळीच लवकर उठून अयप्पा मंदिरात जाणे आणि दिवसभर आपल्याकडे जसे भजन - गाणी सणाच्या दिवशी लावली जातात तशी गाणी लावली जायची. लहानपणी त्यातील काही ओळी अर्थ न समजताच पाठ होऊन गेल्या होत्या. त्यांचे फराळाचे पदार्थ आणि दुपारचे केळीच्या पानावरील खास जेवण मला फार आवडायचे. त्यामुळे या सणाबद्दल आज थोडे लिहावेसे वाटले.

केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या उत्सवाने सुरू होते. ओणाम म्हंटल कि आठवत ते बोटीच्या शर्यती, पुकालाम म्हणजे मोठ्या मोठ्या फुलांच्या रांगोळ्या, विविध रंगांची फुलांनी सजवलेल्या या रांगोळ्या प्रत्येकाच्या दारा समोर दिसतात. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवातील १० वा दिवस तिरूवोणम सगळ्यात धुमधडाक्याने साजरा केला जातो. ओणम उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात येतो.


ओणम हा सण १९६० पासून केरळ सरकार राज्यपातळीवर साजरा करू लागले आहे. या महिन्यात हा ‘पर्यटन सप्ताह’ आखला जातो. संपूर्ण राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जातात. यानिमित्त विविध क्रीडाप्रकारांचे आयोजन केले जाते. ज्यात धाडसाची गरज असते असे पुरुषांचे खेळ- म्हणजे तळप्पंतू कळी (बलापाठोपाठ त्याचा कासरा धरून वेगाने धावणे), वळ्ळम्कळी (सरोवरे आणि नदीपात्रातील बोटींच्या शर्यती), पुलीकळी (वाघाच्या सोंगांचा खेळ) हे खेळ खेळले जातात. तर महिला कईकोट्टी कळी आणि तुंबी तुल्लाल (एक-दुसरीला टाळ्या देत फेर धरून केले जाणारे नृत्य) खेळतात.


दहाव्या दिवशी म्हणजे तिरूओणमच्या दिवशी लवकर उठून स्नान केल्यावर नवे कपडे घालून देवदर्शन करण्याची लोकांमध्ये लगबग असते. या सणाचे मुख्य आकर्षण असते मेजवानी. नाश्त्याला केरळमध्ये खास मिळणारी केळी उकडून खायला दिली जातात. त्याबरोबरच पिकलेल्या केळ्यांसह पापडम्चा खासा फराळ असतो. जेवणातील मुख्य पदार्थाबरोबर हेही पदार्थ वाढले जातात. या दिवसांत कोणाही मल्याळी माणसाच्या घरात पाहुणे म्हणून गेलो कि  कुरकुरीत खाऱ्या केळ्याच्या चिप्सबरोबर कॉफीच्या कपाने तुमचे मनापासून स्वागत होईल.

पूर्वीच्या काळी गावांत काही ठिकाणी झाडावर झोपाळे बांधले जात. हे झुले सुंदर फुलांनी सजवले जात. नाटकं, संगीत, जलसे यांचा या दिवसांत नुसता जल्लोष असतो. ओणमला चिकणमातीपासून अंडाकृती आकाराच्या विष्णूच्या मूर्ती बनवल्या जातात. तांदळाच्या पिठीचा वापर करून त्यावर नक्षी काढली जाते. माडाच्या काडय़ा या मूर्तीना टोचून त्यावर सुरेख फुलं खोचली जातात. अशा सजवलेल्या मूर्ती अंगणात, फुलांच्या रांगोळीच्या मधे ठेवल्या जातात. त्या दिवशी या देवाला तीन वेळा नवेद्य दाखवला जातो.


या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रह्लादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे. सण साजरा करण्यामागे केरळीय जनतेच्या मनात एक भावना आहे. असे म्हणतात की, केरळीय जनतेने बळीराजाच्या काळात सुवर्णयुग अनुभवले.

त्याकाळी राज्यात सर्वत्र सुख-शांतता नांदत होती. जनता प्रामाणिकपणे व्यवहार करीत असे. सर्वत्र सुबत्ता होती. दानशूरपणाबद्दल तिन्ही लोकांत प्रसिद्ध पावलेल्या बळीराजाला लोक खूप मान देत. त्याच्या दारी आलेला याचक विन्मुख होऊन कधीच माघारी जात नसे. राजाचा सर्वत्र उदोउदो चालला होता. राजाच्या पुण्याईने इंद्राचे आसन डळमळू लागले बळीराजाचे प्रस्थ एवढे वाढलेले पाहून इंद्र व इतर देव घाबरले. इंद्राच्या मनात मत्सर जागृत झाला. बळीला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी मग देवांनी विष्णूला साकडे घातले. विष्णूने देवांची ही विनंती मान्य केली. 

बळीराजाचे महत्त्व कमी करण्यासाठी त्याच्या दानशूरपणाचा फायदा घेण्याची युक्ती विष्णूने योजली. त्याने वामनाचे रूप घेतले आणि तो बळीराजाच्या दारी याचक म्हणून उभा राहिला. राजाने विष्णूला एक साधारण अतिथी समजून त्याची यथासांग पूजा केली. त्यास काय भिक्षा पाहिजे, म्हणून विचारणा केली. बटूच्या रूपातील विष्णूने ‘मला पाय ठेवायला फक्त तीन पावलं जमीन पाहिजे,’ अशी मागणी केली. बळीने जरी वामनरूपातील विष्णूला ओळखले नाही तरी राजाच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या गुरूने- शुक्राचार्याने अंतज्र्ञानाने विष्णूला तात्काळ ओळखले आणि राजाला दानाचे उदक सोडण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण राजा आपला धर्म कसा सोडणार? आता तर वचन दिले गेले होते. दानाचे उदक सोडल्यावर मात्र वामनाने आपले भव्य रूप प्रकट केले आणि सहज एका ढांगेत स्वर्गलोक व्यापला, दुसरे पाऊल पृथ्वीवर टाकले. आता आणखी कुठेच जागा न उरल्याने ‘तिसरे पाऊल कोठे ठेवू?’ असा प्रश्न त्याने बळीला केला. कुठेच जागा न उरल्याने बळीने नम्रपणे आपले मस्तक पुढे केले; आणि वामन रुपी अवतार घेतलेल्या विष्णूनी त्याला पातळ लोकात ढकलून दिले.

तरीही बळीराजाची भक्ती लक्षात घेऊन विष्णूने त्याला दोन वर दिले. एक- पाताळलोकाचे सार्वभौमपद त्याला बहाल केले. दुसरे- त्याच्या दरबारात द्वारपाल म्हणून स्वत: उभे राहण्याचे काम विष्णूने आनंदाने स्वीकारले. बळीचे त्याच्या जनतेवर असलेले प्रेम लक्षात घेऊन त्याला वर्षांतून एकदा तिरूओणमच्या दिवशी पृथ्वीलोकातील आपल्या प्रिय प्रजेला भेटण्याची परवानगीही दिली. त्या दिवशी बळीराजा आपल्याला भेटायला येतो, या समजुतीने ‘आम्ही तुझ्या राज्यात सुखी, आनंदी आहोत, आमची भरभराट झाली आहे,’ हे दर्शविण्यासाठी हा ओणम उत्सव मल्याळी लोक हर्षोल्हासाने साजरा करतात. 

शेवटच्या दिवशी घरोघरी मेजवान्या केल्या जातात. या दिवशी गावांत सजवलेल्या हत्तीची मिरवणूक काढली जाते. आपल्याकडे जसे होळीच्या दिवसांत सोंग घेऊन भिक्षा मागितली जाते, तद्वत केरळमधील काही खेडय़ांत ओणमच्या दिवसांत बळीराजाचे काल्पनिक रूप घेऊन मुलं दारोदारी फिरतात व भिक्षा मिळाल्यावर आशीर्वाद देतात. केरळमध्ये पूजनीय असलेल्या वामनाचे ‘त्रिक्काकरा’ हे मंदिर कोची शहरानजीक आहे. 

दहाव्या दिवशी मंदिर आवारातील ओणमचा ध्वज उतरवण्यात येतो. ध्वज उतरवण्याचा पहिला मान कोचीपासून १२ कि.मी.वरील त्रिपुण्णित्तुरा येथील देवळाला जातो. त्रिपुण्णितुरा ही पूर्वी केरळची राजधानी होती. येथील मंदिरातील ध्वज खाली आणल्यावरच सर्व ठिकाणचे ध्वज खाली आणले जातात.

हि माहिती मी वेगवेगळ्या लिंक्स वरून गोळा केली आहे आणि एकत्रित पणे तुमच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

!!!! HAPPY ONAM !!!!




 

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...