चंपाषष्ठी-येळकोट येळकोट जय मल्हार




मासांना मार्गशीर्षो ऽ हम्’ या वचनाने गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा मागेपुढे मृगशीर्ष नक्षत्र असते. केशव ही त्या महिन्याची अधिदेवता आहे. त्याच महिन्यात वद्यपक्षात धनुर्मासास सुरुवात होते. मकरसंक्रांतीपर्यंत रोज सूर्योदयाबरोबर देवाला आणि सूर्याला गूळपोळी, खिचडी, बाजरीची भाकरी-लोणी असा नैवेद्य दाखवतात व सर्वजण सकाळीच भोजन करतात.

मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे. ‘मल्लारी मार्तंड भैरव’ हे त्याचे संस्कृत नाव. या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की, धनगर, रामोशांपासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरांत त्याची उपासना प्रचलित आहे.

खंडोबाचे नवरात्र माझ्या माहेरी काकांकडे जवळपास शंभराहून अधिक वर्ष बसवले जाते. त्यामुळे या नवरात्राची आणि माझी ओळख माझ्या जन्मापासूनची आहे. त्यांच्या कडे खंडोबाचे टाक असल्याने ह्या नवरात्रातील सहा दिवस अश्विन महिन्यातील नवरात्रा इतकेच मनोभावे केले जाते. 

खंडोबाचे दर्शन मी पाहियांदा अष्टविनायक ट्रीप सोबत केले. जेजुरी गडावरील परिसर आणि प्रसन्न वातावरण न विसरण्या सारखे आहे. गड चढायला कठीण असला तरी मध्ये मध्ये बसण्याची सोय अतिशय उत्तम आहे. ठीक ठिकाणी हळदीचा भंडारा विकायला ठेवलेला असतो. जेजुरी हे गांव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांत असणार्‍या राममंदिरांत एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्‍या ६३ ओर्‍या आहेत.

अनवाणी पायाने गड चढल्याने पायाचे तळवे वर पोहोचे पर्यंत हळदीने पिवळे झालेले असतात. मंदिरात गाभाऱ्यात आणि सर्व सभोवताली हळदच हळद उधळलेली असते. आमचे देवाचे दर्शन अतिशय सुंदर झाले. हळदीचा भंडारा घेऊन आणि कपाळावर हळदीचा मळवट भरून आम्ही प्रसन्न मनाने देवाच्या आवारात जप करत होतो त्यावेळी काही जुन्या आठवणी आम्हा दोघांना एकदम आठवल्या आणि एकाच वेळी आम्ही दोघ एकमेकांनकडे पाहून हसलो. ती आठवण अशी होती कि दरवर्षी आम्ही शिर्डीला जातो. तेव्हा बाबांच्या दर्शना नंतर सहज मागच्या रस्त्यांनी फिरयला गेलो असताना साधारण ४ ते ५ किलोमीटर वर एक खंडोबाचे मंदिर आहे असे आम्हाला तिथल्या ग्रामस्थांनी सांगितले आणि आम्ही तिथे दर्शन घेण्यास गेलो. दर्शन खूप सुदर झाले. आम्हा दोघा उभयतांना ते मन्दिर फार आवडले. आरती आणि प्रसाद घेतला आणि आम्ही हॉटेल रूम वर परतलो. आता हे आमचे मनाशी पक्के झाले होते कि जेव्हा जेव्हा बाबांच्या दर्शनाला यायचे तेव्हा तेव्हा या मंदिराला हि येऊन खंडोबाचे दर्शन घ्यायचे. 

पुढच्या वर्षी आम्ही परत बाबांना भेटायला शिर्डीला निघालो मनात पक्के होते बाबांचे दर्शन झाले कि खंडोबाचे दर्शन घेऊन पुढे शनि-शिंगणापूर आणि भीमाशंकर या ठिकाणी जायचे. खूप गर्दी असल्याने बाबांच्या दर्शनाला वेळ लागला, पुढे शनि-शिंगणापूर आणि भीमाशंकरला जाण्यासाठी कार बुक केली होती, उशीर व्हायला लागल्याने आम्ही खंडोबाचे दर्शन न घेता पुढे जायचे ठरवले. पण मग दोघांच्याही मनात काय आले कलेच नाही आम्ही गाडी परत फिरवली आणि त्या मंदिरात गेलो. जणू काही आमच्याच साठी देव आरतीला थांबले होते आम्ही मंदिरात प्रवेश करतो न करतो तोच तिथल्या गुरुजींनी आम्हाला थेट गाभाऱ्यात नेले आणि आरतीचे ताट आमच्या हातात ठेवले. आम्ही हि मग वेळकाळ बाजूला ठेवून मनोभावे आरती केली, प्रसाद घेतला. आणि प्रसन्न मनाने पुढील प्रवासाला सुरवात केली. थोड्यावेळाने माझ्या व्हॉटसएपवर चंपाषष्ठीचे महत्व यावर एक मेसेज आला आणि मला आश्चर्य वाटले कि त्या दिवशीच चंपाषष्ठी होती. आम्हाला खंडोबाच्या आरतीचा लाभ मिळाला आणि तोही आम्ही पुढील द्र्शालाला वेळ होत होता म्हणून ते दर्शन टाळून पुढे जात असताना आम्हला परत बोलवले गेले आरती आमच्या कडून करून घेतली देवांनी. आम्हा दोघांना भरून पावल्याचा आनंद मिळाला आणि तेव्हाच आम्ही जेजुरीच्या दर्शनाला येऊ असे खंडोबाला सांगितले. 

जेजुरी मंदिर परिसर 

कुलदैवत खंडोबाचे नवरात्र...

नमो मल्लारीं देवाय भक्तानां प्रेमदायिने ।

म्हाळसापतीं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः ।।

मल्लारीं जगतान्नाथं त्रिपुरारीं जगद‌्गुरूं ।

मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् ।।

खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण "सदानंदाचा येळकोट’ किंवा "येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात, ताम्हण उचलताना प्रत्येक वेळी भंडारा भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात. दिवटी-बुधली घेऊन आरती केल्यानंतर देवळाच्या दिशेने चार पावले जाऊन देवाला ओवाळतात व पुन्हा भंडारा उधळतात. नंतर दिवटी दूधाने शांत करतात. नैवेद्य झाल्यावर कुत्र्यासही घास देतात. चातुर्मासात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना, नंदादीप, खंडोबाची पूजा, मल्हारी माहात्म्याचा पाठ, एकभुक्त राहणे, शिवलिंगाचे दर्शन, सवाष्ण-ब्राह्मण भोजन, भंडारा उधळणे इत्यादी गोष्टी करतात. चातुर्मासात वर्ज्य केलेले वांगे चंपाषष्ठीपासून खाण्यास सुरुवात करतात. 

चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥

॥ चंपाषष्ठी चा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥

खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व आहे. त्यातील काही सौम्य नवस असे- मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. दीपमाळा बांधणे. मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे. पायर्‍या बांधणे, ओवरी बांधणे. देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठरावीक दिवशी देवदर्शनास जाणे. पाण्याच्या कावडी घालणे. उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या-मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे, यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे. तळी भरणे, उचलणे, दही-भाताची पूजा देवास बांधणे. पुरण-वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांना भोजन घालणे. कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे-भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.

मणीसूर-मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यापूर्वी श्रीशंकराने ‘मार्तंड भैरव’ अवतार धारण केला. त्या युद्धात विजयासाठी त्याच दिवशी सप्तर्षींनी एक प्रतिष्ठान स्थापले व त्यावर ते रोज एक माळा चढवत होते. सरतेशेवटी शंकराचा विजय झाला. म्हणून देवांनी मार्तंड भैरवावर भंडारा उधळला, त्‍यावर चंपा फुलांची (चाफ्याच्या फुलांची)  वृष्टी केली तो दिवस शुद्ध षष्ठीचा होता. म्हणून चंपाषष्ठीला नवरात्र उठते अशी कथा त्यामागे सांगितली जाते.

खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत , मार्तंडभैरव, किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात.

स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा वध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले. हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले. खंडोबाची वेशभुषा: साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेष असतो. भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ति होय. हळदपूड, सुक्या खोबर्‍याच्या वाट्या एकत्र करुन तो प्रसाद व” येळकोट येळकोट जय मल्हार ” हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात, की ‘ हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल.

खंडोबाचा टाक 

खंडोबाच्या हातांतील वस्तु: खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो.

 खंडोबारायाची पाच प्रतीके

१) लिंग : हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते.

२) तांदळा : ही एक प्रकारची चल शिळा असून, टोकाखाली निमुळती होत जाते.

३) मुखवटे : हे कापडी किंवा पिटली असतात.

४) मूर्ती : या उभ्या, बैठ्या, घोड्यावर. तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात.

५) टाक : घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा.

 खंडोबारायाचे संबंधित दिन विशेष

रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबाभक्तांची श्रद्धा आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बारा प्रसिद्ध स्थाने

महाराष्ट्र :

१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी

२) निमगाव

३) पाली-पेंबर सातारा

४) माळेगाव

५) सातारे (औरंगाबाद)

६) शेंगूड (अहमदनगर)

७) नळदुर्ग (धाराशिव-उस्मानाबाद)

८) वाटंबरे

 कर्नाटक :

१) मैलारपूर-पेंबर (बिदर)

२) मंगसुळ्ळी (बेळगाव)

३) मैलारलिंग (धारवाड)

४) देवरगुडू (धारवाड)

५) मण्मैलार (बळ्ळारी)

  खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते. देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी.

कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करतांना सुगंधि फुले, गुलाल, व भंडार वहावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत. पूजा करतांना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत.

पत्री : पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी.

देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावेत. देवासमोर वाटींत दूध ठेवावे. त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.

देवाजवळ अखंड तेला-तूपाचा नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात.

सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.

"येळकोट येळकोट जय मल्हार"

3 comments:

  1. खूप छान सविस्तर अभ्यासपूर्ण विवेचन

    ReplyDelete
  2. खूप छान. जेजुरी डोळयासमोर उभी राहिली.

    ReplyDelete
  3. खूपच रंजक आणि अभ्यास पूर्ण माहिती. धन्यवाद.

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...