मसाल्याचा मसला

 


एकदा दुपारी डोळा लागला. स्वयंपाक घरातुन हळूहळू कुजबुज ऐकू येऊ लागली.; कळेच ना हा काय आवाज  आहे. मग मी गपचूप उठले अन कानोसा घेऊ लागले पण नीटसं काही ऐकू येईना; थोडी पुढे गेल्यावर समजलं शेल्फ वरच्या मसाल्याच्या बाटल्यामधून आवाज ऐकू येत होते. प्रत्येक मसाला आपापल्या परीने आपण कसें महत्वाचे आहोत हे सांगत होते. 

हिंग म्हणे माझे फायदे अनेक आहेत..मोहरी जिरं लगेच स्वतःचे महत्व पटवून देत होते. ते पाहिल्यावर हळद - तिखटाच्या अंगात संचारलेच चुरचुरू बोलू लागले. तुम्ही तर आहेतच पण आम्हीपण काही कमी नाही. कोणीच थांबत नव्हते. हे पाहून धने म्हणाले थांबा थांबा आपण यावर तोडगा काढू. प्रत्येकाला वेळ देऊ अन प्रत्येकाचे महत्व ऐकू. हे ऐकताच काळीमिरी, लवंग, दालचिनी, बडीशेप, चक्रीफुल, जायपत्री, मायपत्री, दगडीफुल, मोठी वेलची, छोटी वेलची, शहाजीर, ओवा सगळेच पुढे आले. तीळ आणि खसखस पण धडपडत पोहोचल्या.

अहो हे बघता आश्चर्य वाटले आणि कुतूहलाने मी सगळं नीट ऐकू लागले. प्रत्येकाला पाच मिनिटं मिळतील स्वतःचे महत्त्व, उगमस्थान, फायदे हे सगळं सांगण्यासाठी; धणेनी असे म्हंटल्यावर आता कोण पहिलं बोलणार?? हिंग म्हणाले माझाच नंबर पहिला हवा कारण मीच सगळ्यात आधी फोडणीत घातला जातो. सगळ्यांचे एकमत झाले आणि आता हिंग खुशीत पुढे आणि आपले महत्व सगळ्यांना सांगू लागले.


नमस्कार मी हिंग सांगू इच्छितो माझी माहिती आणि फायदे 

फे. फेटिडा, फे. ॲलियासिया, फे. नार्थेक्स, फे. फेटिडिस्सिमा, फे. ॲसाफेटिडा इ. या वनस्पती पासून  हिंग हा पदार्थ मिळतो. लॅटिन शब्द फेरूला म्हणजे वाहक आणि ॲसाफेटिडा यामधील ॲसा म्हणजे चीक (क्षीर) व फेटिडा म्हणजे उग्र वास होय. रंगावरून हिंगाचे प्रमुखदोन प्रकार पडतात : (१) काबुली सफेद हिंग व (२) लाल हिंग.

आपण भारतीय आणि काही मोजकेच देश जेवणात हिंग वापरतो. युरोपियन आणि अमेरिकन लोकांना हिंगाचा वास उग्र वाटतो तसेच भारतातही ईशान्य-पूर्व राज्यात पण जेवणात हिंग वापरत नाहीत. १६ व्या शतकात मुघलांनी हिंग आपल्या कडे आणून स्वयंपाकात रुजवला असे म्हणतात. पण आपल्या आयुर्वेदात हिंगाचा औषध म्हणून वापर केला जातो. प्राचीन संस्कृत संहितांवरून लक्षात येते की, हिंग भारतात फार पूर्वीपासून वापरात असावा. हिंगाचा तीव्र वास इतर वासांना दडपून टाकतो म्हणून संस्कृतमध्ये त्याला हिंगू असे म्हणतात. 



रोजच्या आहारात लागणारे हिंग आपल्या भारतात एक ग्रॅमही पिकत नाही. आपली कोणतीच फोडणी हिंगा शिवाय पूर्ण होत नाही. हजारो वर्षे आपल्या कडे हिंग अफगाणिस्तान, इराण आणि उबेकिस्तान या देशातून मागवतो. जगात पिकणाऱ्या एकूण हिंगा पैकी ४ ग्रॅमच हिंग आपणच वापरतो.

सध्या बाजारात हिंग म्हणून जी पावडर मिळते ती म्हणजे गव्हाच्या पिठात मिसळलेला ७०:३० हिंग असतो. हिंग हा झाडाच्या खोडातून पाझरणारा एक प्रकारचा डिंक आहे. त्यात गन्धकाचे प्रमाण अधिक असल्याने तो खास गंध त्या डिंकाला येतो. खलबत्यात कुटून तो इतर पिठात मिसळून वापरला जातो.

 या पिकाची लागवड कशी करावी याबद्दल आपल्या कडे शास्त्रशुद्ध माहिती नव्हती त्यामुळे आपल्याकडे पीक येत नव्हते पण २०१६ पासून CSIK सेंटर ऑफ सैंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चची एक शाखा इन्स्टिट्यूट ऑफ हिमालियन बायो रिसर्च टेक्नॉलॉजी हिंग तयार करण्याचा प्रयत्न करत होते.

 गेल्या ३० वर्षात हिंगाचे बीज कोणीही आणले नाही. भारतात एसाफोटीडा फेरूला ही रोपे नाहीत. हिंगाची रोपे उगवली की काही दिवसातच जमिनीत गडप होतात. नंतर कालांतराने ती परत जमिनीवर येतात. या रोपांची वाढ फक्त बर्फामुळे हवेत जे बाष्प तयार होते त्यावरच होते. इतर पिकांच्या सारखे त्याला पाणी देता येत नाही. रासायनिक खतांचा वापर करता येत नाही.

 फे. फेटिडा ही १.५–२ मी. उंचीची ओषधी वनस्पती मूळची इराण व अफगाणिस्तानातील आहे. हिची व इतर जातींची सामान्य शारीरिक लक्षणे अंबेलिफेरी कुलातील इतर वनस्पतींप्रमाणे (शेपू, कोथिंबीर, गाजर इ.) आहेत.  हिची पाने सु. ४५ सेंमी. लांब, संयुक्त, फार विभागलेली, तळाशी खोडास वेढणारी, एकाआड एक, मोठी फुलोरा चवरीसारखा फुले लहान, द्विलिंगी, नियमित व पंचभागी नर फुलोरा व फुले हिरवट पिवळसर आणि मादी फुलोरा व फुले हिरवट पांढरी फळे अंडाकृती, सपाट, पातळ व लालसर तपकिरी असून त्यामध्ये दुधी रस असतो. तडकल्यावर त्यांचे दोन फलांश बारीक दांड्यावर काही वेळ लोंबत राहतात. परागण कीटकांमार्फत होते. ही वनस्पती सावलीत वाढत नाही. 

फे. फेटिडा या जातीची जाड लठ्ठ मुळे (१२–१५ सेंमी. व्यास) साधारणपणे चार वर्षांनी हिंगाकरिता योग्य होतात. फुले येण्यापूर्वी मार्च-एप्रिलमध्ये खोड कापून काढल्यावर राहिलेल्या मुळातून दुधी चीक येतो, तो हवेत सुकून घट्ट व राळेसारखा लालसर तपकिरी बनतो आणि पुढेतो काळसर होतो, हाच हिंग होय. सुकलेल्या हिंगामध्ये २५–६०% चीक व ५–३०% फेरूला अम्लाची संमिश्र कार्बोहायड्रेटे असतात. हिंग एकदा काढून घेतल्यानंतर मुळाला जखम करून पुन्हा तो जमा करतात याप्रमाणे तो चीक बाहेर येण्याचे थांबेपर्यंत (सु. ३ महिने) हिंग जमा करतात.  


 हिंग केवळ पदार्थांचा स्वाद वाढत नसून त्याचे अनेक फायदे आहेत. पाहू त्यातून 7 अद्वितीय फायदे:

वरणा-भाजीला हिंगाची फोडणी देण्याने पोटासंबंधी होणार्‍या रोगांची शक्यता कमी होते. पचन कमजोर असल्यास याच्या चूर्णाचे सेवन फायदेशीर ठरेल. पोटात गॅस असल्यास ताकाबरोबर हिंग घेतल्याने आराम पडतो.


 उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरेल. अधिक ढेकर किंवा मळमळ होत असेल तर मॅश केलेल्या केळात चिमूटभर हिंग टाकून सेवन करावे. आराम पडेल.

छातीत कफ जमल्यास हिंगाचे लोशन लावल्याने फायदा होईल. यासाठी पाण्यात हिंग घोळून लेप तयार करावे. हे लावल्याने कफ विरघळून बाहेर पडेल.

 मेमरी कमजोर झाल्यावर 10 ग्राम शेकलेल्या हिंगाला पादरं मीठ आणि 80 ग्राम बाय-बडंगसह दळून दररोज थोड्या मात्रेत पाण्यासोबत सेवन करावे.

 जर आपल्या कमी ऐकायला येत असेल तर बकरीच्या दुधात हिंग घासून कानात 2 थेंब टाका आणि कापसाचा गोळा लावून झोपून जा. सकाळी उठून कान स्वच्छ करा. काही दिवस ही प्रक्रिया केल्याने स्पष्ट ऐकायला येईल.

टाचांना भेगा पडत असल्यास, कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावावे.

 भारतीय जेवणात स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी हिंगाची फोडणी दिले जाते. हिंगाचा सुवास तेज आणि जेवण्याची इच्छा जागृत करणारा असतो. आयुर्वेदात देखील याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. आपण दररोज चिमूटभर हिंग वापराल तर अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकेल. हिंग पोट, लिव्हर आणि डोळ्यासाठी फायदेशीर ठरतं. जाणून घ्या रोज हिंगाचे सेवन केल्याने आरोग्यावर काय प्रभाव पडेल.

हिंग पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज हिंगाचे सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या जसे अपचन, गॅस सारख्या समस्या दूर होतात. याने पोटात गॅस, पोटातील किडे, मरोड आणि पोटासंबंधी सर्व वेदनांपासून मुक्ती मिळते.

हिंगात रक्त पातळ करण्याचे गुण असतात. म्हणून हे ब्लड प्रेशरच्या आजाराने त्रस्त लोकांसाठी फायदेशीर आहे. याने नसांमध्ये बल्ड क्लॉटिंग सारखी समस्या होत नाही ज्याने ब्लड प्रेशर अनियंत्रित होण्यापासून मुक्ती मिळते.

दमा, जुनाट खोकला, दातदुखी, डांग्या खोकला, अपचन व काही मेंदूच्या विकारांवर हिंग गुणकारी आहे. तसेच तो उत्तेजक, वायुसारक व आचके बंद करणारा आहे. हिंगामध्ये असणाऱ्या कुमारीन या रसायना-मुळे रक्त पातळ होते. तसेच तो पशुवैद्यकातही उपयुक्त आहे. अत्तरे व सौंदर्यप्रसाधनांतही त्याचा वापर केला जातो. यूरोप व अमेरिकेत स्वादा-करिता व सुगंधी द्रव्यांत तो वापरतात. हिंग आतड्यांतील हानीकारक सूक्ष्मजंतूंची वाढ रोखतो. इन्फ्ल्यूएंझा व स्वाइन फ्ल्यू  यांसारख्या रोगात हिंग नैसर्गिक विषाणुप्रतिरोधी औषध म्हणून काम करतो. तंत्रिका तंत्रात तो आकडीरोधक म्हणून देखील काम करतो, तसेच नियमित सेवनाने हिवतापासारख्या रोगाचा प्रतिरोध करता येतो. आयुर्वेदा त वात व कफाचे संतुलन ठेवण्यासाठी तसेच वातदोषासाठी हिंग अत्युत्तम औषध असल्याचे सांगितले आहे.  

असा मी मसाल्याच्या डब्ब्यातला आणि प्रथम फोडणीत वापरला जाणारा बहुगुणी हिंग.

आता दुसरा नंबर मोहोरीने लावला; उद्या पाहू त्याची माहिती आणि महत्व.


 


4 comments:

  1. आजपर्यंत अशी माहिती वाचनात आली नव्हती.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  2. अशी माहिती आजपर्यंत वाचनात आली नाही
    धन्यवाद

    ReplyDelete
  3. *हिंग भारतात पिकत नाही ?*मग तो येतो तरी कुठून ?* रोजच्या जेवणात वापरतो त्याला *अस्सल हिंग* का म्हणता येणार नाही ?

    आश्चर्य वाटेल, पण आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो तो *हिंग अगदी एक ग्रॅमही भारतात पिकत नाही.* आपली कुठलीच फोडणी हिंगाशिवाय पूर्ण होत नाही, पण.. हिंग काही भारतात पिकत नाही. हजारो वर्षे आपण बाहेरच्या देशांतून म्हणजे अफगाणिस्तान, इराण, उझबेकीस्तान अशा दूरवरच्या देशांतून हिंग मागवतो. जगात पिकणार्‍या एकूण हिंगापैकी ४% हिंग आपणच वापरतो. दरवर्षी एकूण १२०० टन हिंग आयात करण्यासाठी आपण १३० कोटी डॉलरचा खर्च करतो.

    या हिंगाची एक गंमत अशी आहे की भारतासारखे मोजकेच देश हिंगाचा वापर पाककृतीत करतात. युरोपियन अणि अमेरिकन लोकांना तर हिंगाचा वाससुद्धा नकोनकोसा वाटतो. *त्यामुळे हिंग त्यांच्याकडे 'डेव्हिल्स डंग' या नावाने ओळखला जातो.* भारतात ईशान्य-पूर्व राज्यांत पण हिंग जवळजवळ वापरला जात नाही. असं म्हणतात की १६ व्या शतकात मोगलांनी पहिल्यांदा हिंग आपल्याकडे आणून स्वयंपाकात रुजवला. पण या दाव्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही कारण *आयुर्वेदात हिंग औषध म्हणून वापरला जातो*. सध्या आपल्याला बाजारात जो हिंग मिळतो *ती पावडर म्हणजे खरा हिंग नव्हे.* ती पावडर म्हणजे गव्हाच्या पिठात ७०:३० प्रमाणात मिसळलेला हिंग. तर असा हा आपल्या अन्नातला महत्वाचा घटक भारतात पिकतच नाही. पण आता एक चांगली बातमी अशी आहे की भारतात हिंगाची रोपे तयार करून त्याची योग्य पध्दतीने वाढ करण्याचे तंत्र भारतीय कृषीतज्ञांनी विकसित केले आहे.

    हिंग हा वनस्पतीच्या खोडातून पाझरणारा एक प्रकारचा डिंक आहे. त्यात गंधकाचे प्रमाण असल्याने तो खास गंध त्या डिंकाला मिळतो. सुकल्यावर हा डिंक गर्द तपकिरी रंगाचा होतो. हा डिंक असल्याने त्याची पावडर करणे कठीण असते. त्याला खलबत्त्यात घालुन तासनतास कुटावे लागते. त्यानंतर मैदा आणि इतर साधा नैसर्गिक डिंक घालून कुटल्यावर आपण वापरतो तशी हिंगाची पावडर तयार होते.

    पण मुळात प्रश्न असा आहे की हिंग आपल्याकडे का पिकत नाही?? महत्वाचे कारण असे की हिंगाची लागवड कशी करावी यावर शास्त्रशुध्द मार्गदर्शन कुठेच उपलब्ध नाही. म्हणून आपल्या शास्त्रज्ञांना या वनस्पतीची अ‍ॅग्रोटेक्नॉलॉजी विकसित करावी लागली.

    २०१६ पासून (CSIR) सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीअल रिसर्चची एक शाखा इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायो रिसोर्स टेक्नीलॉजी हिंग वनस्पतीची रोपे तयार करण्याचा प्रयत्न करत होती. भारतात हिंगाची रोपे उपलब्ध असल्याचा अनेकांचा दावा आहे, पण ती रोपे म्हणजे खरा हिंग अ‍ॅसाफोटीडा फेरुला नाहीत. हिंगाचे बीज गेल्या ३० वर्षांत भारतात कोणीही आणले नाही. दुसरे असे की इराण-अफगाणिस्तान हे देश युध्दात इतके गुंतलेले आहेत की त्यांच्याकडून काही मदत मिळण्याची अपेक्षाच नाही.

    हिंगाची रोपे उगवली की काही दिवसातच ती जमिनीत गडप होतात आणि नंतर बर्‍याच कालांतराने वर येतात. दुसरे असे की या रोपांची वाढ फक्त बर्फामुळे हवेतून जे बाष्प मिळते त्यावरच होते. इतर पिकांसारखे पाणी देता येत नाही. रासायनिक खतांचा वापर करता येत नाही. थोडक्यात हिमालयाच्या परिसरातच हिंगाचे पिक घेणे शक्य आहे. हिमालयन बायो रिसोर्स टेक्नीलॉजीने एकूण ५०० हेक्टर जमिनीवर हिंगाची शेती केली आहे. सोबत त्या भागातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. सोबतच 'टिश्यू कल्चर' सारखे तंत्र वापरून मोठ्या प्रमाणात या वनस्पतीची रोपे उपलब्ध होतील याची तयारीही चालू आहे. हे सर्व यशस्वी होण्यासाठी चार-पाच वर्षांचा कालावधी जाईल, पण त्यानंतर अफगाणिस्तानच्या दर्जाचा हिंग भारतात उपलब्ध होईल अशी खात्री शास्त्रज्ञांना आहे.

    सध्या बाजारात १०० ग्रॅम हिंगाचा भाव रुपये ३०० ते १००० इतका आहे. हे लक्षात घेता एक नवे 'कॅश क्रॉप' म्हणजेच नगदी पीक शेतकर्‍यांना मिळून थोड्याच वर्षांत जगभरात भारतीय हिंगाचा घमघमाट पसरला असेल!

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...