अश्विन पौर्णिमेची रात्र कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे हि म्हणतात. चांगल्या आरोग्यासाठी कोजागिरीच्या रात्री व्रत केले जाते. कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरते आणि को जागती? असा प्रश्न विचारते आणि जो जागा असतो त्याला वैभवप्राप्ती मिळते अशी आख्यायिका आहे.
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.
सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।
परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।
भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।
ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।[९]
या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.
पौराणिककथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ) भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे.
या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.
कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात.
कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते.
मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते.
हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते.
राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात.
हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.
ओडिशामध्ये, शरद पौर्णिमेला 'कुमार पौर्णिमा' असे म्हणतात.या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात. या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते.
कोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक 'लोख्खी पुजो' असे म्हणतात. या दिवशीच्या लोख्खी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात. नारळात साखर, दुध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केले जातात.
तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंदराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा करतात.
शरद पौर्णिमा अत्यंत श्रेष्ठ तिथी आहे. हा दिवस कोजागरी व्रत या रुपात देखील साजरा केला जातो. हा दिवस अत्यंत शुभ आणि सकारात्मक असून या दिवशी पूजा करुन मोठमोठाले संकट देखील दूर होतात असे मानले गेले आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाला परमार्थाच्या अंगाने महत्वाचं स्थान आहे. कारण तिथे तुम्हाला दिव्यत्वाचे स्मरण साधण्याचा अभ्यास करता येतो. कोजागिरी म्हटली कि सर्वजण दांड्या वैगेरे खेळायला जमतात. चंद्राकडे पाहून तुम्हाला स्वरूप चंद्राचा अभ्यास करता आला पाहिजे. चंद्रप्रकाशात चंद्राकडे पाहता पाहता, चंद्र आणि तुम्ही, एकरूप होऊन जा. इथे चंद्रप्रकाशाबरोबर चैतन्याचे स्मरण करता आले पाहिजे.
!!!!!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!



रम्य ते बालपण आणि त्या आठवणी.
ReplyDeleteतितकीच छान माहिती
👌👌👌
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteखूप छान जूण्या आठवणी 👌👌
ReplyDelete