कान्हा


 

कान्हा

विष्णूचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्णावतार...

देवरूपातून मानवी रूप धारण केले अन अधर्मचा विनाश करण्यासाठी घेतलेला हा पूर्णवतार. शक्ती, सौंदर्य, वैभव आणि सद्गुण यांचा समसमान मिलाप म्हणजे श्रीकृष्ण. कुशल राजनीती, महान तत्ववेता, समाजरक्षक अन समाजकल्याण करणारा, दुर्जनांचा विनाशक, अन्याया विरुद्ध लढणारा अन अर्जुनाला गीता सांगणारा ही श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये आहेत.श्रीकृष्ण एकाचवेळी इच्छा, क्रिया अन ज्ञान या तिन्ही शक्ती स्तरांवर कार्य करतात. म्हणूनच त्यांना पूर्णवतार म्हंटले आहे. 

भारतात सर्वत्र कृष्णाची स्थाने आहेत. गोकुळ, वृंदावन, मथुरा, द्वारका आणि जगन्नाथपुरी ही तीर्थक्षेत्र;  केरळ मधील गुरुवायूर मंदीर आणि कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिर ही जागृत देवस्थान आहेत.  

श्रावणातील शुक्लपक्षातील अष्टमीला मध्यरात्री  श्रीकृष्ण जन्म झाला. हा दिवस गोकुळाष्टमी म्हणून साजरा केला  जाते. हा वासुदेव सुत देवकीनन्दन जन्माला आणि यशोदेकडे गोकुळात वाढला याह्या हि अनेक कथा आपल्याला माहिती आहेत. 

फुलांनी सजवलेला पाळणा आणि श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या सर्व गोष्टी त्यादिवशी वाहिल्या जातात जसे... तुळस, कृष्णकमल, केवडा, चाफा इत्यादि सुवासिक फुलं, चंदनाचे गधं किंवा अत्तर. दही-पोह्यांचा काला, सुंठवडा, शेवग्याच्या पाल्याची भाजी, मटकीची उसळ, थालीपीठ अन त्यावर लोणी, खीर याचा नेवैद्य असतो. काही जण छप्पन भोग दाखवतात. याचे मुख्य कारण म्हणजे यशोदा माई त्यांना दिवसातून आठ वेळा जेवण खाऊ घालीत असे;  जेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळी वर उचलून धरला होता तेव्हा सात दिवस ते भोजन न करता उभे राहिले होते. जेव्हा गोवर्धन पर्वत खाली ठेवला तेव्हा गावकऱ्यांनी आणि यशोदा माईने छप्पन भोजनाचा भोग श्रीकृष्णाला खाऊ घातला. त्यामुळे हीच प्रथा पुढे सुरू राहिली.


श्रीकृष्णाला प्रिय अश्या अनेक गोष्टी आहेत जसे की मोरपीस, बासरी, कमळ. ही प्रत्येक गोष्ट त्यांच्या सोबत का आहे याची कथा आहे. 

विविधतेत एकता कशी टिकवून ठेवायची याचं प्रतीक म्हणजे मोरपीस.  जीवन अनके अनुभवांनी भरलेले असते. मोरपिसातील गडद-हलके रंग दर्शवतात की आयुष्यात अनेक वेळा असे गडद-हलके अनुभव येत असतात आपण न डगमगता त्यातून आनंदाने मार्ग काढायचा असतो. 

बासरी ही आतून पोकळ असली तरी त्यातून निघालेली धून मनाला आनंद देते. अश्याच प्रकारे आपली वाणी मधुर शब्दांची असावी आणि मन आतून शुद्ध अन मोकळे असावे. बासरी जशी वाजवल्या शिवाय वाजत नाही. तसेच गरज नसेल तेव्हा बोलणे अनुचित आहे. 

कमळ पवित्रतेचे प्रतीक आहे. चिखलात राहूनही स्वतःचे सौंदर्य ते स्वतः जपते तसेच आपल्या भोवतो अनेक वाईट गोष्टी असतात तरी त्याचा परिणाम आपल्यावर होऊन न देता आपले स्वच्छ व्यक्तिमत्त्व टिकवून ठेवणे हे आपल्याच हातात असते. 


तसेच श्रीकृष्णाचे बंधू बलराम हे शेषनागाचे अवतार घेऊन पृथ्वीवर आले. श्रीकृष्णाला प्रिय मोर आणि शेषनाग एकमेकांचे वैरी असूनही शत्रू अन मित्र यांना एकत्र कसे आणायचे हा विरोधाभास असूनही त्यात कसे जगायचे हे श्रीकृष्णाने आपल्याला शिकवलं आहे. 

श्रीकृष्णाने  मित्र, भाऊ, सखा, प्रियकर, तत्ववेता, मार्गदर्शक, रक्षक अश्या अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. तसेच शृंगार, सौंदर्य, नृत्य-गायनाची आवड असलेलं, रासलीला खेळणारे, गोपिकां मध्ये रमणारे अशीही ओळख आपल्याला मुरली मनोहराची आहेच. जिथे कान्हा जाईल तिथे तिथे एक आंनदी, उत्साही अन प्रसन्न वातावरण निर्माण होते.


राधा-कृष्ण यांच्या प्रेमाची अनेक कथा अन प्रतीक आहेत. रुक्मिणी सोबत विवाह होऊनही राधाकृष्ण असेच म्हटले जाते याची ही कथा आहे. राधा, रुक्मिणीच्या शिवाय अजून एका नावाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे मीरा; माधवांच्या भक्तीत लीन झालेल्या मीराबाई ची भक्ती गीते प्रसिद्ध आहेत. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोई किंवा ऐसी लागी लगन मीरा हो गयी मगन अशी गीतं प्रसिद्ध आहेत.


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ 

अर्थ  जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, 

तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. 

सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी 

आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.  











महाभारतात अधर्माचा विनाश करण्यासाठी श्रीकृष्णाची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. स्वतः अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले अन त्यांना स्वतःच्या आप्तजनां सोबत लढताना आत्मबळ वाढविण्यास मार्गदर्शन केले. गीतेचे सार सांगितले आणि विश्वविराट रूप धारण करून जगाची उत्पत्ती अन विनाश माझ्यातूनच होतो याची प्रचिती पार्थास दाखवून दिली. श्रीकृष्णाने अर्जुनास दाखविलेले विश्व विराट रूप अजूनही आठवले कि या अवताराची प्रगल्भता लक्षात येते. श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव शारंग आणि मुख्य आयुध चक्राचे नाव सुदर्शन तसेच गदेचे नाव कौमोदिकी आणि शंखाचे नाव पांचजन्य हि सर्व आयुध  महाभारतातील युद्धात वापरली गेली. 

कृष्णाच्या बाल-लीलांन पासून ते रास-लीलांन पर्यंतच्या सर्व कथा आपल्याला माहितीच आहेत. तसेच महाभारत घडताना हि अनेक लहान मोठ्या कथा आपल्याला माहित आहेत. 

मला उलगडलेला कान्हा जेव्हा महाभारत हे वाचले आणि टीव्ही वर पहिले तेव्हा पासून कृष्ण हे व्यक्तिमत्व अतिशय उत्कंठा लागून राहिली होती. मग काही पुस्तके वाचली तसे तसे जे उलगडत गेले ते अवर्णनीय आहे. म्हणूनच आज या कृष्ण जन्माच्या निमित्ताने थोड लिहिण्यास धजावले. असाच सखा, मित्र, मार्गदर्शक, आपल्याही आयुष्यात असावा असे वाटू लागले. आपल्या कोणत्याही अध्यात्मिक पुस्तकात शेवटी कृष्णार्पणमस्तु असेच लिहिलेले आहे. कारण ज्याने निर्माण केले त्यातच विलीन व्हावे. जे कर्म करु ते कृष्ण चरणी अर्पण करावे. 

आपल्या सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा


9 comments:

  1. परत परत वाचले. अतिशय अभयासपूर्ण लिहिले आहे.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. खरंच खूप छान लिहिलं आहेस सोनाली
    खूप वेगळी माहितीही मिळाली।
    सुप्रिया

    ReplyDelete
  3. खूप छान लेखनशैली. चांगली माहिती दिलीत. हृदयातुन लिहिले आहे हे जाणवते. धन्यवाद

    ReplyDelete
  4. सुंदर लिहिले आहेत, कृष्ण नव्याने उमगला आज.

    ReplyDelete
  5. छान माहिती आहे ही 👌🙏

    ReplyDelete
  6. अतिशय सूंदर लिखाण सोनाली.क्रुष्णजन्माचे सार विवेचन
    मार्मिकपणे विदीत केले आहेस.धन्यवाद.

    ReplyDelete
  7. मस्त,छान लिहिलंय!

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...