आजचा दिवस दहावा
इतके दिवस गणपती बाप्पाच्या आठवणी, अनुभव, माहिती यांचा संग्रह तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज मी ज्या बाप्पा बद्दल माहिती देणार आहे तो आहे 'विश्वविनायक'
आपण महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेल्या विश्वविराट रूपा बद्दल ऐकले आहे; पण गणपतीचे विश्वविनायक ह्या रूपा बद्दल मी तरी कधी ऐकले नव्हते. मला जे कळले तेच तुमच्या पर्यंत पोहोचवते आहे. असे म्हणतात, जेव्हा एखाद्या दैवताला प्रकट व्हायचे असते तेव्हा तो कोणाला तरी दृष्टांत देतो, स्फुरतो, संकेत देतो किंवा साक्षात्कार देतो आणि त्या व्यक्ती मार्गे आपल्या इतर भक्तां पर्यंत पोहोचतो. तसेच या विश्वविनायकाचे आहे. माझ्या शालेय काळातील मित्र श्री. दिलीप वैती यांनी ही विश्वविनायकाची कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचे काम त्यांनी केले.
बुद्धीची अन विद्येची देवता आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजेच गणपती; या गणपतीचा वरद हस्त लाभलेलं हे व्यक्तिमत्त्व अगदी तुमच्या आमच्या सारखं साधं आयुष्य जगत आहेत. साधी सोपी राहणी आणि आयुष्याच्या अनुभवातून मिळालेल्या शिकवणीतून तावून सुलाखून निघाल्याने आजही त्यांचा साधेपणा आम्हा सगळ्यांनाच खूप भावतो. दिलीप यांच्याकडे जवळपास ७०० ते ८०० गणपतीची वेगवेगळी रूप असलेल्या मूर्ती आहेत. अगदी अर्धा इंचा पासून ते चार-साडे चार फूट उंचीचे गणपती आहेत. जवळपास ८०० ते १००० गणपतीची चित्र त्यांनी काढली असतील.
एखादी कला अंगिकरणे म्हणजे त्या कलेची साधना करावी लागते. तिची आराधना करणे गरजेचे असते. जो पर्यंत ते आपल्या नसानसांत भिनत नाही, श्वासात मिसळत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व येत नाही. इथे असेच दिसते;ज्या गणपती मूर्ती दिलीपकडे आहेत ते त्यांची जोपासना करतात म्हणजेच त्या सगळ्या मूर्त्यांची स्वछता केली जाते;धुवून पुसून स्वच्छ करून त्या परत जागच्याजागी ठेवल्या जातात. असे साधारणपणे महिन्यातुन दोनदा केले जाते. दिलीप यांची गणपतीची आस्था जसजशी वाढू लागली तसे त्यांचा त्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलत गेला किंवा जास्त प्रगल्भ होत गेला. जे बाप्पा आधी मूर्ती रूपात साकारले जायचे ते आता त्यांना कणाकणात दिसू लागले. प्रत्येक गोष्टीत जसे; पानात, फुलात, प्राण्यात, भाजीपाल्यात अगदी वस्तूत सुद्धा त्यांना बाप्पा दिसतो आणि त्याचं स्मरण करून कागदावर आकारले जाते. ही रोजची रूपं आम्हाला मॉर्निंग मोरया या टायटल खाली पहायला मिळतात. साधारण दीड वर्ष झाले असेल या त्यांच्या उपक्रमाला आणि या ७००-८०० गणपतीचा एक संग्रहच तयार झाला आहे. अशा साधनेचा सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असते. तेच आम्ही सगळे पहातोय. या त्यांच्या बाप्पांच्या प्रत्येक मूर्तीची आठवण आणि त्यांना आलेली प्रचीती ऐकण्या सारखी आहे.
२००२ मध्ये त्यांना साईबाबा मंदिर शिर्डी येथील बाबांच्या सिंहासनाचे डिझाईन करण्याचा योग्य जुळून आला. एकविरा आई आणि हिंगलाई देवी च्या मंदिरातील नक्षीकामाचे डिझाईन रेखाटण्याचा योग्य जुळून आला. त्यांच्या कडून अनेक शाळांमध्ये चित्रकलेचे उपक्रम राबविले गेले. शाळांच्या भिंतीवर बोधप्रद चित्र काढून ती सुशोभित करणे तसेच सुकलेली वाळलेली वृक्ष ही रंगवून सुशोभित करण्याचे उपक्रम केले. अनेक उद्यान त्यांनी अशाच प्रकारे सुशोभित केली आहेत.
विश्वविनायक ही संकल्पना २०१० मध्ये त्यांना स्फुरली; तेव्हा गणपतीची १०८ नावं, १०८ गणपतीची चित्र काढणे, गणपतीचीच गाणी आणि त्यावर नृत्य आणि त्यावेळात गणपतीची मूर्ती साकारणं; हे या संकल्पनेचे स्वरूप होते. हे सत्यात साकारणं सोप नव्हते. अवघ्या दोन ते तीन तासात २७ x ८० फुटाच्या कॅनव्हास वर फक्त सात ते आठ चित्रकारांनी ही गणपतीची १०८ रूपं चित्रित केली त्यावर रंग दिले आणि तिथल्या प्रेक्षकांना हे सगळं अदभुत याची देही याची डोळा पहाता आले.
विश्वविनायक या संस्थेने अनेक उपक्रम राबविले आहेत. दिलीप वैती, केदार पाटील, जानकी वैद्य, शेखर केदारे आणि अर्चना वैती हे या संस्थेचे संस्थापक किंवा प्रमुख खंदक आहेत. तसेच आता हा विनायकाचा परिवारही वाढत जात आहे, अनेक जण यात निस्वार्थी पणे जुडला जात आहे.
२०१४- २०१८ या काळातील गणपती उत्सवात चेंबूर सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणपती उत्सवात डेकोरेशन करण्याचा योग्य आला. त्यात खूप मोठया आणि मान्यवर व्यक्तीच्या संपर्कात येण्याची संधी मिळाली. २०१५ मध्ये शिक्षकदिना निमीत्त एका शाळेत अपंग मुलां करता काही स्पर्धांचे आयोजन केले गेले होते तिथे सिंधुताईना भेटण्याची संधी मिळाली. अनेक मान्यवर व्यक्तीच्या संपर्कात असूनही आपलं साधेपणा कसं जपावे हें दिलीपच्या बोलण्या वागण्यातुन दिसतंच. कलेचा अभ्यास करून ती योग्य प्रकारे साकारणे तिला आकारणे आवश्यक असते तसेच त्याला बोलकं करणे त्यात चैतन्य निर्माण करून सादर करणे ही खरी कला असते. याचा प्रत्यय आम्हाला वारंवार येतोच.
दिलीप यांच्या कडे ११९ वर्ष घरच्या गणपतीची स्थापना केली जाते. वेगवेगळ्या संकल्पनानी सजावट केली जाते, गेली चार वर्ष पुस्तके, धान्य, झाडे आणि वस्त्र असे लोक उपयोगी वस्तूनी सजावट केली गेली. याच वस्तू नंतर गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटल्या जातात. अनेक वेळा अनेक ठिकाणी कलेचे लाईव्ह सादरीकरण करण्यात आले. त्याचे अनेक प्रसारमाध्यमानी प्रसारण केले. दिलीप यांना अनेक पुरस्काराने सन्मानितहि करण्यात आले आहे.
आत्ताच्या या आपल्या धकाधकीच्या आयुष्यात कुठे तरी मनशांती हवी असूनही मिळत नाही आणि थोडीफार लाभली तरी त्याचा आस्वाद हवा तसा घेता येत नाही. आपण आपल्या पासूनच निसर्गाला दूर करून बसलोय. सारे काही आपल्या समोर असते अगदी जवळ तरीही ते अंधुक,धूसर झालेले आहे. ती धूळ हलकेच झटकणे गरजेचे असते; आणि मग आपल्याला ज्या देवाच्या सानिध्यात रमायचे असते तो आपल्या समोर निसर्ग रुपात दिसू लागतो.
पंचमहाभूतानि तयार झालेला हा निसर्ग म्हणजेच आप, तेज,वायू,जल आणि अग्नी यात गणपती बाप्पाची अनेक रूपे याच तत्वात विलीन होऊ इच्छित आहेत. जास्तीत जास्त निसर्गाच्याच जवळ जाऊ इच्छितय.
वसुंधरेचा गंध, फुलांचा रंग, पाण्याचा निखळ खळखळाट, सळसळता वारा आणि सूर्याचे लख्ख तेज. या सगळ्यांनी मिळून तयार झालेल्या बाप्पांच्या प्रतिमा आपल्या समोर आणण्याची संकल्पना या विश्वविनायक संस्थेने योजली आहे. विश्वविनायक आता खर्या अर्थाने विराट रूप घेण्यास तयार आहेत. कार्याला सिद्धीस नेण्यास विश्वविनायक समर्थ आहेच. त्या सोबतच आम्हा सर्व मित्र परिवाराच्याहि खूप खूप शुभेच्छा या संस्थेला आणि खास करून आमच्या मित्राला म्हणजेच दिलीप वैती यांना आहेत.






खूपच छान माहिती आहे आपल्या प्रवासाची, बाप्पा सदैव आपल्याला प्रेरित करत राहणार आणि आपल्याकडून हे ईश्वर सेवेचे योगदान असेच निरंतर सुरू राहावे अशी मनोकामना. जय गणेश!
ReplyDeleteVery nice 👌
ReplyDeleteBappa Morya
ReplyDeleteतुमचे अनुभव, आणि देव निसर्ग मधेच आहे हे तुमचे मत तुम्ही छान मांडले आहे. तसेच श्री दिलीप वैती व तुमच्या सर्व मित्रांना शुभेच्छा.
ReplyDeleteखूपच प्रशंसनीय
ReplyDelete"विश्वविनायकाच्या" प्रेरणेमुळे आज जे morning morya पाहायला मिळत आहे त्या मागची कथा आज कळली .. धन्यवाद आणि श्री दिलीप वैती यांना सादर प्रणाम
ReplyDeleteसुरेख लेख व माहिती.दिलीपजींचे काम अद्भुत आहे.विनायकाचा वरदहस्त लाभलेल्या या अवलियाला सादर प्रणाम🙏
ReplyDelete