गणपती बाप्पा मोरया
आजचा दुसरा दिवस असला तरी सुरुवात मी काल पासूनच करणारे कारण बाप्पा बद्दल सांगण्या सारखे इतके आहे की काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या...
जसे की पहिल्याच दिवशी पूजा करताना बाप्पाला अनेक पत्री वाहिल्या जातात पण देवावर दुर्वांकुर न चुकता वाहतो, गजाननाला अनेक सुगंधी पुष्प वाहिली जातात जसे केवडा, चाफा, गुलाब पण लाल जास्वंदी आवर्जून वाहिली जाते. जेवणात नेवैद्या साठी अनेक पदार्थ असतात पण मोदकाचे मात्र खास आकर्षण असते. या प्रत्येक गोष्टीच्या आवर्जून करण्यापाठी काही कारण आहेत हे मला जेंव्हा कळलं तेव्हा ते शेयर करावेसे वाटले; पाहूया ती काय आहेत
गणरायाला बुद्धीचं दैवत मानलं जातं. विघ्न हरण करणाऱ्या गणपतीच्या स्थापनेच्या दिवशी २१ प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात. निसर्गाची ओळख करुन घेऊन निसर्गरुपी परमेश्वराच्या अधिक जवळ जाणे, हाच या विधीमागील उद्देश असावा.
दुर्वा या दाह शमनकारक आहेत...असे म्हणतात की एकदा युद्धात गजाननाने अंगलासुर राक्षसाला गिळून टाकले आणि त्याच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली तेव्हा बाप्पानी दुर्वांचा रस प्यायल्याने तो दाह शमला तेव्हा पासून गजाननाच्या डोक्यावर दुर्वांकुर वाहिले जातात.
तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
त्या २१ याच मात्रेत असतात याला अजूनही एक कारण आहे. ते म्हणजे; आपल्या आयुष्यात असलेले षड्रीपु म्हणजे; काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि मोह; यांची निर्मिती जिथून होते ते म्हणजे पाच पाच च्या समूहात असणारे प्रपंच जसे की पंचज्ञानेंद्रिये, पंचप्राण, पंचमहाभूते, पंचकर्मेंद्रिये आणि पंचतन्मत्रा या समूहाचे संकलन/ नियंत्रण जे करतात ते अंतचतुष्ट म्हणजे मन, बुद्धी, चिंता अन अहंकार. हे अंतचतुष्ट सत्व, रज आणि तम या त्रिगुणात्मक तत्वावर अवलंबून असतात. हे त्रिगुण तत्व म्हणजे द्वैत; म्हणजेच भक्त आणि भगवंत म्हणजेच मूळमाया जी गणेश रूप आहे... या सर्वांचे एकत्रितपणे गणित केले तर बेरीज २१ येते आणि म्हणून गजाननाच्या पायी किंवा डोईवर २१ दुर्वा वाहिल्या जातात.
दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. पचनशक्ती वाढवणे, ऍसिडिटी कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे असे अनेक गुण आहेत.
दुर्वा चढवताना या मंत्राचा करा जाप
ॐ गणाधिपाय नमः, ॐ उमापुत्राय नमः, ॐ विघ्ननाशनाय नमः, ॐ विनायकाय नमः
ॐ ईशपुत्राय नमः, ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः, ॐ एकदन्ताय नमः, ॐ इभवक्त्राय नमः
ॐ मूषकवाहनाय नमः, ॐ कुमारगुरवे नमः
जास्वंद - असे म्हणतात की जास्वंदी या फुलांत सत्व आणि रज हे गुण असतात, या फुलांच्या पाकळ्या सकारात्मक तत्वाचे प्रतिनिधित्व करतात आणि हे फुलं स्वस्तिका सारखं दिसत म्हणून हे फुल गजाननाला आवर्जून वाहिले जाते. लाल रंग वातावरणातील पवित्रके मूर्तीकडे जास्त आकृष्ट होतात. मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले अर्पण करावे.
शमी पत्र - शमीमध्ये अग्नीचा वास आहे. पांडवांनी आपली शस्त्रे तेजस्वी राहावी म्हणून शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली. शमीत अनेक देवतांचा वास असल्याचे मानले गेले आहे. शमी अर्पित केल्याने वास्तू दोष देखील दूर होतात.
मोदक - २१ दुर्वाप्रमाणेच २१ मोदकांचा नैवेद्य दाखवतात. मोद म्हणजे आनंद. आनंदप्रदान करणारी शक्ती. मोदक ज्ञानाचे प्रतीक आहे. मोदकाच्या टोकाप्रमाणे आपले ज्ञानसुद्धा थोडे आहे असे वाटते पण अभ्यास करू लागल्यावर समजते की खूप मोठे आहे. मोदक गोड तसाच ज्ञानाचा आनंदही गोड असतो. हातात मोदक म्हणजे आनंद प्राप्त करण्याची शक्ती. म्हणून याला ज्ञानमोदक देखील म्हणतात. नारळ आणि गूळ हे स्निग्धता अन ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे या दिवसात मोदकाचा प्रसाद दाखवला जातो.
गणपती बाप्पाची मुळ आरती
एका मित्राने पाठवली आहे .विचार केला की आजच्या योग्य वेळी इतरांनाही सांगावी म्हणून येथे पोस्ट केली आहे. मी सुद्धा ही आरती पहिल्यांदाच वाचत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो
ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात
पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे
ती खालिलप्रमाणे आहे
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
॥ जय ० ॥ ७ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥
================================================================
आज ऋषीपंचमी - भाद्रपद शुद्ध पंचमी
हे व्रत सर्व पापांचा नाश करणारे व्रत आहे. या दिवशी सप्तऋषी चे पूजन केले जाते.
(कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री)
या दिवशी बैलाच्या कष्टाने उगवलेले अन्न प्राशन करीत नाहीत. तर स्वकष्टाने काढलेले अन्न सेवन करावे असे या व्रतात म्हंटले आहे. त्यामुळे यादिवशी श्रावण घेवडा, माठ भेंडी दोडका अश्या भाज्या केल्या जातात.
आजच्याच दिवशी गजानन महाराजांचा समाधी दिवसहि असतो.
अश्याच काही अजून आठवणी आणि माहिती उद्याच्या दिवशी देईन
क्रमश


खूप छान उद्बोधक माहिती
ReplyDeleteखूप छान👌👌
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteगणपती बाप्पा मोरया
ReplyDeleteखूप छान..
ReplyDeleteखूप छान माहिती लिहिलीय,अगदी संग्रही ठेवण्यासारखी!मस्त!
ReplyDeleteसात कडव्यांची आरती प्रथम पाहायला मिळाली .. धन्यवाद !!
ReplyDeleteमाझ्या ब्लॉगवर याचा संदर्भ ठेवीन संकेतस्थळा जोडून.
खूप सुंदर माहिती..बाप्पांच्या आरतीची न वाचलेली कडवी वाचून छान वाटलं.. लिखाणासाठी शुभेच्छा👍
ReplyDeleteThank you for sharing the reasons and science behind the sanskars.
ReplyDeleteThank you for sharing the reasons and science behind the sanskars.
ReplyDelete