राखी पूर्णिमा / रक्षाबंधन


राखी पूर्णिमा / रक्षाबंधन 





श्रावण महिन्यातील पूर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि राखीपूर्णिमा साजरी केली जाते. बहीण-भावाच्या नात्याचा हा सण. सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व असलेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या अनेक पौराणिक कथा आहेत.

त्यातील पहिली म्हणजे बळीराजा आणि बटुक वामन अवताराची, 
दुसरी कथा आहे श्रीकृष्ण आणि द्रोपदीची,
तिसरी कथा आहे इंद्रदेव आणि शुची यांची.

रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते. 

विधीचा प्रयोग असा- सूर्योदयी स्नान करतात. उपाकर्म करून ऋषींचे तर्पण करतात अपराह्नकाळीं राखी तयार करतात. तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थातच राखी तयार होते. मग तिची पूजा करतात. नंतर पुढील मंत्राने ती राखी मंत्री राजाला बांधे.  

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: । 
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ॥ 

(अर्थ- महाबली दानवेद्र बळी राजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे, तू चलित होऊ नकोस.) यावरून मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते.

या श्रावण पौर्णिमेला 'पोवती पौर्णिमा' असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती (नऊ धाग्यांची जुडी) करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात. 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:| 
यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:|’

 ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान- सन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणी पासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न ह्या सनाद्वारे केला जातो. 

राखी म्हणजे राखणे, रक्षा म्हणजे रक्षण करणे; कोणत्याही सबळ शक्ती कडून म्हणजेच धाडसी, कर्तबगार व्यक्ती कडून अबलाची झालेली सहाय्यता हाच या रक्षाबंधनाचा अर्थ आहे. या सणाचे आधार स्तंभ म्हणजे निस्वार्थी प्रेम अन विश्वास. 

आताच्या काळात शिष्य; गुरूंना  राखी बांधतात; तसेच ज्या मुलींना भाऊ नसतो त्या वडिलांना राखी बांधतात, काही स्त्रिया आपल्या पतीलाही राखी बांधून हा सण साजरा करतात. एकूणच जो आपले रक्षण कर्ता आहे त्याला नमन केले जाते आणि त्याचे आभार मानले जातात. 
काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधतात. 

माझ्या मते आपण स्वतः सुध्दा वेळोवेळी आपली रक्षा करत असतो, आपले विचार, वागणे, संगत, आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टी, वाईट मार्ग असे सगळेच अडसर आपल्या आयुष्यात येत असतात त्यातून प्रत्येकाला गुरुजनांचा सल्ला मिळतोच असे नाही, त्यावेळी आपण स्वतःच स्वतःचे रक्षण करीत असतो .त्यामुळे आपले मन विचलित न होऊन देता आणि कोणत्याही वाईट मार्गाचा अवलंब न करता स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी अन  ही राखी स्वतःला ही बांधावी. 

तुम्हा सर्वाना राखी पौर्णिमेच्या 
हार्दिक शुभेच्छा


6 comments:

  1. Chaan mahiti amchykade povati pornima mhantat

    ReplyDelete
  2. छान माहिती मिळाली.👌

    ReplyDelete
  3. छान माहिती 👌👌

    ReplyDelete
  4. चांगली पारंपरिक सणाची माहिती मिळते आहे👍

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...