मनुष्य स्वभावाचा एक अतिशय महत्वाचा पैलु म्हणजे त्याचा "मी" पणा.
मी आणले, मी दिलं, मी दाखवलं, मी समजावलं, मी आहे म्हणून, मी नसते तर, माझ्या मूळे, मला वाटतं, मला पाहिजे, मला आवडतं. या अश्या अनेक गोष्टी आहेत, जिथे आपण आपल्यालाच महत्वाचे ठरवत असतो.
मानवी जन्म म्हंटला की त्याला भावनांनी परिपुर्ण बनवले असते. त्यात राग, लोभ, मोह, प्रेम, इर्षा अश्या अनेक प्रकारच्या भावना असतात. या भावनेचे प्रमाण प्रत्येक व्यक्ती मध्ये कमी-जास्त असते. याच प्रमाणामूळे मग प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाच्या बनतात. काही प्रेमळ, काही रागीट तर काही लोभी असतात.
अश्याच प्रकारे मनुष्याला अजून एक भावना दिलेली असते आणि ती म्हणजे कौतुकाची अपेक्षा. कुठलेही काम केले की आपल्याला त्याची कोणीतरी दखल घेतली आणि त्याची पोचपावती दिली की एक हुरूप आल्या सारखं वाटतं. पुढे पाऊल टाकण्याची हिम्मत येते. आपल्याला आपल्या जन्मदात्या आई-वडीलां कडून चांगल्या गोष्टींची दाद कायम मिळालेली असते तसेच चुकीच्या गोष्टीं सुद्धा कशा टाळायच्या हे त्यांच्या कडूनच समजावले जाते. आपले शिक्षकही आपल्या पाठीवर कौतुकाची, शाब्बासकीची थाप देतात किंवा चुकलं तर धपाटे घालतात. कळत नकळत आपल्याला या गोष्टींची सवय लागून जाते. काहीही नवीन केलं की आपल्याला कोणीतरी त्याची दखल घेऊन कौतुक करावे ही नकळत अपेक्षा लागून रहाते. आई-वडील आणि आपले शिक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप आपल्याला जो आत्मविश्वास निर्माण करते तो कायमस्वरूपी आपल्या सोबत राहतो.
आयुष्यात जसे जसे आपण पुढे सरकत जात असतो तसे तसे अनेक निरनिराळ्या स्वभावाची व्यक्तिमत्त्व आपल्याला भेटत असतात. त्यांच्या कडूनही शिकण्या सारखं खूप काही मिळतं. अनुभवातून आपलंही एक वेगळं रूप, वेगळं व्यक्तिमत्त्व घडत असते. प्रेम, राग, लोभ, इर्षा, मोह या सर्व भावना आपण दुसऱ्याच्या पहात असतो आणि त्या आपल्या व्यक्तिमत्वातही फरक करत असतात. मनुष्य स्वभावाचा आणखी एक पैलु म्हणजे एखादया व्यक्तीवर किंवा गोष्टी वर हक्क दाखवणे. ही वस्तू माझी आहे; याला हात नको लावू किंवा ही व्यक्ती माझीच आहे आणि त्यातच गुंतून रहाणे. आपली जागा, आपल्या वस्तू, आपली माणस यावर आपण हक्क दाखवायला सुरवात करतो. हा मोह असतो; ज्यात अडकलो की आपण बाहेर पडू शकत नाही. याचा आपल्या स्वतःलाच काही काळाने त्रास होऊ लागतो.
आयुष्याच्या वाटेवर चालताना आपण या सगळ्या स्वभावांना सामोरे गेलेलो असतो आणि हे सर्वच पैलु आपल्यातही आहेत ही जाणीव झालेली असते. एकूण काय तर आपल्याला आपल्यातील चांगल्या-वाईट स्वभावाची पूर्ण कल्पना असते. कितीही आव आणला तरी एखादया बद्दलचा द्वेष, मत्सर आपण स्वतः पासून लपवू शकत नाही. हा अतिशय नॉर्मल माणसाचा स्वभाव आहे. या गोष्टी दुसऱ्या समोर एक मुखवटा घालून लपवू शकतो पण स्वतःला सगळे स्पष्ट दिसत असते. गरज असते ती स्वतःला बारकाईने अभ्यास करण्याची, स्वतःतील गुण-दोष ओळखायची आणि त्यावर सुधार करायची. आपण सहज म्हणून जातो मी बदलली आहे, आधी पेक्षा कमी रागीट झालीये किंवा आता मी कशातच गुंतून रहात नाही; मी माझ्या स्वतःत रमते. हो काही प्रमाणात खरंही असते हे... पण काही वेळा आपल्या कडून याचा नुसताच आव आणला जातो.
यातूनच अडखळत, शिकत असताना कधी कधी यातून बाहेर पडले पाहिजे असे वाटू लागते. व्यवहारिक आयुष्यात आपण यातुन बाहेर पडू शकत नाही. कित्येक लोकं देवासाठी केलेले जप सुध्दा मोजुन करतात. असो; फार खोलात नाही जात,
पण अध्यात्मिक उन्नतीची आस लागली किंवा त्यातील आंनद घेण्याची आतुरता लागली की मात्र या सर्व गोष्टी क्षुल्लक वाटू लागतात. कुठलीही गोष्ट केली की ती ईश्वर चरणी अर्पण करण्याची आस लागते.
"इदम न मम",
"नेकीं कर और दर्या मे डाल" किंवा
"फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केले पाहिजे" ही भावना निर्माण होते.
याच भावनेने जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करतो त्याच वेळी जिवा-शिवाची गांठ बांधली जाणार आहे हे लक्षात येते. यासाठी आपली मानसिकता बदलणे गरजेचे असते.
यासाठीच ईश्वर चरणी प्रार्थना कराविशी वाटली...
"मी" पण माझे हरवू दे;देवा!! माझे मी पण हरवू दे !!!

अप्रतिम. यापेक्षा सर्वसामान्य माणूस काही लिहू शकत नाही.
ReplyDeleteSurekh 👍👍lekh bhavanamka
ReplyDeleteखरंच समर्पण भाव असणे अत्यंत आवश्यक... त्यातूनच अप्रतिम कलाकृती निर्माण होत असते.
ReplyDeleteखूप छान... लिहित रहा.
ReplyDeleteफार सुंदर लिहिलं आहेस. खूप प्रगल्भ विचार.
ReplyDeleteखुप सुंदर 👌....
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteखूपच छान आकलन
ReplyDeleteसुंदर!!!!!